आनंद, शोधायचा तरी कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rss Mohan Bhagwat dream of united India students JNU Hanuman Chalisa
आनंद, शोधायचा तरी कुठे?

आनंद, शोधायचा तरी कुठे?

भारत ‘विश्वगुरू’ होण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच अखंड भारताचे स्वप्नही बोलून दाखवले. येत्या दहा-पंधरा वर्षांत ते साकार होईल, असा विश्वास ते व्यक्त करतात. देश सुजलाम सुफलाम व्हावा, देशात रामराज्य साकारावे, अशी उद्दिष्टेही सांगितली जातात. पण प्रश्न असा आहे, की एकीकडे असे चित्र उभे केले जात असताना देशभरातील सध्याच्या वास्तव स्थितीवर नजर टाकली तर काय दिसते? ‘काय खावे आणि काय खाऊ नये’, यासाठी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांची माथी भडकवली जातात. कोणी कोणता पेहराव करायचा, काय वाचायचे, यावर निर्बंध आणण्याची भूमिका घेतली जाते. मशिदीत लावल्या जाणाऱ्या भोंग्याच्या आवाजाला विरोध म्हणून ‘हनुमान चालिसा’ वाचून त्याला तेवढंच आवाजी प्रत्युत्तर द्यायचे, असे प्रकार सुरू आहेत. हे धर्मांचे ठेकेदार संबंध देशातील मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. हा राजकीय सूडप्रवास आणि त्यातून तयार होणारी सामाजिक अस्वस्थता ही चिंतेची बाब आहे. आक्रसणाऱ्या रोजगारसंधी, वाढती महागाई यासारख्या समस्याही आहेतच. या पार्श्वभूमीवर भारत किती आनंदी आहे, याविषयीचं वास्तव समोर आलं आहे. ते नक्कीच विचार करायला लावणारं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या १८ मार्च २०२२ रोजी जाहीर झालेल्या जागतिक आनंद निर्देशांकात (‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’) भारताचे स्थान १३६वे आहे. हा ‘आनंद निर्देशांक’ काढण्यासाठी वेगवेगळे निकष विचारात घेतले जातात. सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास, प्रामाणिक सरकारे, सुरक्षित वातावरण, निरोगी जीवन, नैसर्गिक व शहरी वातावरण इत्यादी घटकांचा विचार होतो. हे सगळे एकत्रित केल्यानंतर आपल्या आनंदावर त्याचा कसा परिणाम होतो, सामाजिक विश्वासाच्या वातावरणामुळे अडचणींचे ओझे कसे कमी होते, या बाबी त्यात नोंदवल्या जातात. वैयक्तिक कल्याण, ‘जीडीपी’चा स्तर, आयुर्मान आणि जीवनमान उंचावण्याचा यात समावेश असतो. गणितीय सूत्राच्या आधारे हा अहवाल तयार होतो.

प्रयत्न झाले, पण...

२०२२च्या या अहवालाने कोरोनाच्या अंधारकाळातील सगळ्याच देशांसाठी प्रकाशकिरण दाखवला आहे. साथीच्या रोगामुळे केवळ वेदना आणि दु:खच नाही, तर आश्वासक सामाजिक वतावरण, परोपकारातही वाढ झाली आहे. रोग आणि युद्धाच्या आजारांशी लढताना आनंदाची सार्वत्रिक इच्छा आणि एकमेकांच्या मदतीसाठी एकत्र येण्याच्या व्यक्तींच्या क्षमता, जिद्द या काळात मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. त्याची नोंद या अहवालात आहे. जगाप्रमाणेच भारतही या प्रकाशवाटेचा सांगाती आहे. मात्र, अन्य प्रगत आणि गरीब देशांच्या तुलनेत आपले प्रयत्न खुजे ठरले. कदाचित पायाभूत सुविधांचा अभाव असावा. या आनंद निर्देशांकात फिनलॅँड गेल्या पाच वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क, स्वित्झर्लंड, आईसलॅँड, नेदरलँड, नॉर्वे, स्वीडन, लुक्सेमबर्ग, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया हे आनंदी असलेले पहिले दहा देश आहेत. ऑस्ट्रेलिया ११व्या, इस्त्रायल १२व्या, जर्मनी १३, कॅनडा १४, ब्रिटन १७ व्या तर अमेरिका १९व्या स्थानावर आहे. शेजारी पाकिस्तान भारतापेक्षाही ३३ रँक पुढे असून आनंद क्रमवारीत जगात १०३ व्या स्थानावर आहे. फ्रान्स, तैवान, संयुक्त अरब आमिराती, सौदी अरेबिया, स्पेन, इटली, सिंगापूर, ब्राझिल, मेक्सिको, पनामा, पोलंड, रुमानिया, कुवैतची नोंद पहिल्या ५०मध्ये आनंदी देश म्हणून झाली. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात दु:खी देश असून १४६व्या शेवटच्या स्थानावर आहे.

गेल्या काही वर्षात भारत महाशक्तिमान होत असल्याचे सारखे बिंबवले जाते. यासाठी पौराणिक आणि ऐतिहासिक दाखले देतांनाच हिरव्या, निळ्या, भगव्या आदी वेगवेगळ्या रंगात, छावण्यांत ध्रुवीकरण करीत राहणाऱ्यांना आपण जगात नेमके कुठे आहोत, याची या अहवालाच्या निमित्ताने ओळख होण्याची गरज आहे. देशातील आजचे सर्वसामान्य चित्र असे आहे की, घरात सगळे सदस्य एकत्र असूनही त्यांच्यात ‘संवाद’ नाही. कोरोनामुळे देशात आर्थिक आणीबाणी येईल या भीतीने आपल्या परिवाराचे भविष्य सुखावह होणार की नाही, असे प्रश्न लोकांपुढे आहेत. यामुळे जीवनातील व्यक्तिगत आनंद संपुष्टात आला आहे. कोणाचा तरी द्वेष करण्याची, अमानुष पद्धतीने व्यक्त होण्याची दुर्बुद्धीही काहींमध्ये दिसून येते. अनेकांच्या मनाचा ताबा व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरने मिळवला आहे. क्लेश, भय, दहशत, धर्मांधता आदी गोष्टींचे बीजारोपण या माध्यमातून झाले आहे. आरोप- प्रत्यारोपाने शांतता कशी मिळेल?.

कोरोनाकाळात देशातील आरोग्य स्थितीची कशी वाताहत झाली हे जगाने पाहिले. शिक्षणाची दुरवस्था झाली आहे. गेल्या २५ वर्षात लाखो सरकारी पदे नष्ट करण्यात आलीत. पदवी आहे; परंतु नोकरी नाही. त्यामुळे तरुणांच्या पदरी नैराश्‍य आहे. काय विडंबन आहे बघा! आता सरकार एकाचवेळी दोन पदव्या द्यायला निघाले आहे. कुठे गेली गांधीजींची `नई तालिम’?. आर्थिकदृष्टया स्वतंत्र असण्यात माणसांचे स्वास्थ्य असते. तो कुटुंबाचे पालनपोषण व्यवस्थितपणे करू शकतो. ‘आमच्यासाठी काही करता येत नसेल तर निदान आम्हाला त्रास देऊ नका, शांततेत जगू द्या’, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण तीही पूर्ण होत नाही. आरोग्य, शिक्षण याला प्राधान्य हवे. रोजगाराला चालना मिळावी. महागाई नियंत्रणात आणणे गरजचे आहे. परदेशातून आणलेले डांबर रस्त्यावर ओतून रस्ते तयार केले, असे मिरवले जाते. किती काळ या रस्त्यांचे कौतुक सांगायचे. या रस्त्यांवरून अर्थव्यवस्था धावायला पाहिजे. ती दूरवर दिसत नाही.

माणसाला माणसासारखे वागवावे

दक्षिण आफ्रिका आणि नेल्सन मंडेला यांनी जगाला ओळख करून दिलेल्या ‘उबुंटू’मध्ये माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे हे वास्तव मांडण्यात आले आहे. प्रेम, सत्य, शांतता आणि आनंद ही उबुंटूची बलस्थाने आहेत. मागे असलेल्यासाठी थांबणे आणि त्याला सोबत घेऊन सरतेशेवटी ‘आम्ही सर्व जिंकलो’ हा स्पर्धेतील एकत्रित आनंद व्यक्त करताना सामुदायिक दायित्व व मानवीयतेचा वास्तववादी अर्थ ‘उबुंटू’मध्ये उलगडतो. ‘आय अ‍ॅम बिकॉज वुई आर’ ही भावना यामागे अभिप्रेत आहे. आपण मात्र अमेरिकनकी आणि युरोपीय जीवनशैली अंगीकारली. जागतिकीकरणाच्या रेट्यात जीवन आत्मकेंद्री केले. खूप पैसा मिळवायचा हे तरुण पिढीचे लक्ष्य ठरले. जीवनाची सर्वसमावेशकता टांगणीस ठेवून अतिरेकी गरजा वाढविल्या. संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितले, ते संपूर्ण जीवसृष्टीसाठी होते. ‘भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें॥’ हे आम्ही विसरुन त्यांची शिकवण केवळ संदर्भ ग्रंथापुरती मर्यादित ठेवली. ‘मी आणि माझं’ ही अतिमहत्त्वाकांक्षा आता बदलावी लागेल.

आपण आनंददायी जीवन जगू, अशी हिंमत देणारेही लोक देशात आहेत. दिल्ली सरकारने या दिशेने एक पाऊल टाकले. ‘हॅपिनेस क्लास’च्या माध्यमातून केजरीवाल आणि सिसोदिया यांनी केलेला प्रयोग जगात चर्चेचा विषय ठरला. चांगली पिढी निर्माण व्हावी, तणावमुक्त होऊन विद्यार्थ्यांना आनंदाने जगता यावे, ही त्यामागची संकल्पना आहे. दिल्लीच्या शाळांमध्ये कोविड काळापासून ‘आनंद अभ्यासक्रम’ सुरु झाला. जीवन सुंदररीत्या जगता येऊ शकते, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. पालकही यात सहभागी होत आहेत. ज्या समाजमाध्यमांचा वापर काहींनी द्वेषासाठी केला, तिचा वापर विधायक कायार्साठीही होऊ शकतो हे केजरीवालांनी दाखवून दिले. त्यांनी दाखविलेली विधायक सर्जनशीलता निराशेचे मळभ दूर करू शकते.

- विकास झाडे

Web Title: Rss Mohan Bhagwat Dream Of United India Students Jnu Hanuman Chalisa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top