क्रीडा क्षेत्र बदलाच्या ‘ट्रॅक’वर

a s ketkar
a s ketkar

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना स्पर्धकाने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचा निकष योग्य आहे. तो लक्षात घेतला तर अनेक खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट झाली. त्यातही लहान खेळाडू अधिक चमकले, ही या स्पर्धेची मोठी कमाई!

जा कार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १५ सुवर्णपदके मिळविली. ही कामगिरी सर्वोत्तम कामगिरीच्या म्हणजे १९५२ मधील पहिल्या आशियाई स्पर्धेतील कामगिरीच्या तोडीची आहे. यंदा १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० ब्राँझ अशी ६९ पदके मिळाली. पहिल्या स्पर्धेतील सुवर्णपदकांची बरोबरी करायला २०१८ वर्ष उजाडावे लागले. पण उगाच तेव्हा आणि आता अशी तुलना करण्यात अर्थ नसतो. कारण काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात. देशाची परिस्थिती, राहणीमान, सुविधा, अर्थसाह्य इत्यादी प्रत्येक काळातील कामगिरीचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करणेच योग्य ठरते.

भारताने आयोजिलेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेच्या वेळी देशाची लोकसंख्या ४० कोटींच्या आसपास होती. आज ती १३० कोटींच्याही पुढे आहे. पहिल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा पदके जिंकण्यासाठी खेळल्या गेलेल्या खेळांची संख्याही जवळपास तितकीच, म्हणजे तिपटीने वाढली आहे. (त्याबरोबरच तेवढी जास्त पदके उपलब्ध झाली आहेत.) त्यातील अनेक खेळ नव्याने समाविष्ट केलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय पथकातील खेळाडूंची संख्याही मोठी होती. त्या तुलनेत पदकांची मोजणी करायची आणि त्या प्रमाणावर यश ठरवायचे काय? कारण तेव्हा प्रथमच ही स्पर्धा होत असल्याने सहभागी देशांची संख्या दोन डझनही नव्हती. यंदा ५६ देश होते आणि त्यातील फक्त आठ देशांना एकही पदक मिळालेले नाही.

कोणत्याही स्पर्धेतील कामगिरीचे मूल्यमापन पदकांच्या वा विजयांच्या संख्येवर करण्यात चूक होते. कारण खेळाचा मुख्य हेतू स्पर्धकांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी, हा तर असतोच; पण त्याचवेळी त्यांच्यावर जबाबदारी असते वैयक्तिक कामगिरी सुधारण्याची. तसे झाले तरच स्पर्धेत भाग घेण्याचे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हणता येईल. त्यामुळे स्पर्धक खेळाचा आनंद लुटण्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठीच खेळत असल्याचे सिद्ध होते. अनेक खेळाडूंना अगदी ऑलिंपिकमध्येही सर्वोत्तम कामगिरी नोंदण्यात अपयश आले, तर त्यांच्या चेहऱ्यावर ओढूनताणून आणलेले हास्य दिसते. तरीही ‘या पदकाचे मोल मोठे आहे,’ असे ते म्हणतात. याचा अर्थ खऱ्या खेळाडूला पदक मिळाले म्हणजे सारे काही संपले असे वाटत नाही. मायकेल फेल्पससारख्या जलतरणपटूचे उदाहरण बघा. तो चार ऑलिंपिकमध्ये तेवीस सुवर्णपदकांसह २७ पदके मिळवतो. चौथ्या ऑलिंपिकचा अपवाद सोडता त्याची कामगिरी काहीशी सुधारत जाते आणि खरोखरच मौजेसाठी तो चौथ्या ऑलिंपिकमध्ये सहभागी झाला तरी अनेक पदके मिळवतो. पण त्याचा विक्रम मागे टाकणाऱ्या सिंगापूरच्या १५ वर्षांच्या स्कूलिंगचे अभिनंदन करताना तो म्हणतोः आता मी निवृत्त व्हायला मोकळा झालो. जलतरणाचे भवितव्य सुरक्षित आहे.

मूल्यमापन करताना स्पर्धकाने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचा निकष सर्वांत योग्य आहे. या निकषावर अनेक भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली झाली. पूर्वीच्या तुलनेत आता खेळाडूंचे प्रशिक्षण व सरावासाठी अनेक सुविधा आहेत. खेळाडूंच्या प्रगतीचे लक्ष्य समोर ठेवून काही गटांनी आर्थिक आणि प्रशिक्षणाच्या साह्याच्या योजना आखल्या आहेत. जरूर तेथे परदेशी प्रशिक्षक असतात आणि स्पर्धांच्या अनुभवासाठी, तसेच प्रशिक्षणासाठीही खेळाडूंना परदेशी पाठविण्यात येते, हे योग्यच आहे. कारण देशात त्यांना काहीच स्पर्धा नसेल, तर त्यांचा कस लागणार कसा? प्रशिक्षकांनाही स्पर्धांसाठी पाठवण्यात येत असल्याने खेळाडूंचे मनोधैर्य वाढण्यास, त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत होते. बदलत्या वातावरणात वेगळ्या प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाताना खेळाडूंना प्रशिक्षकांची मोठीच मदत होते. एक बाब बऱ्याच खेळाडूंच्या पथ्यावर पडली. या स्पर्धेआधी राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या. त्यातही भारतीय खेळाडूंची कामगिरी बरी म्हणावी अशी होती. त्यामुळे त्या स्पर्धेतील जे खेळ जाकार्तामध्ये झाले, त्या खेळातील स्पर्धकांना तसा फायदाच झाला. कारण ते तयारीत होते. काही खेळ वगळले गेले होते, तर काही नव्याने समाविष्ट झाले होते. त्यातही भारताने माफक यश मिळवले. लहान खेळाडूंनी चांगली चमक दाखवली. पथकातील ५७० खेळाडूंमध्ये त्यांची संख्या दोनशेहून जास्त होती. ॲथलेटिक्‍समध्ये या वेळीही आपल्याला १९ पदके मिळाली. मात्र अनेकांनी अपेक्षा फोल ठरवल्या, तर बीज, सेपक टकरा, वुशू अशा काही स्पर्धांत अनपेक्षित यशही मिळाले. एकंदरीत भारताचे यश मर्यादितच असले, तरी भावी काळात त्यात मोठी सुधारणा होण्याची चिन्हे लहान वयाच्या खेळाडूंमुळे दिसत आहेत ही या स्पर्धेची कमाई !

आता पुढे काय असा प्रश्‍न चाहत्यांना पडतो. खरे तर सर्वजण आता ऑलिंपिक पदक, असे उत्तर देतात. अर्थात, त्यात चूक काहीच नाही. पण त्यासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि त्या त्या खेळाच्या संघटना काय करणार हे महत्त्वाचे. म्हणून यशाचा उत्सव साजरा करण्यात वेळ घालवून चालणार नाही. बक्षिसांच्या रकमांमध्ये आणि सत्कार समारंभातही गुंतून चालणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंची निवड. ती त्यांची कामगिरी, कुवत, वय आणि कष्ट घेण्याची तयारी पाहून व्हावी. दोन वर्षे हा काळ वाटतो तेवढा प्रदीर्घ नाही आणि प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखलेला असला, की दोन वर्षे कशी जातील ते कळणारही नाही. खेळाडूला सर्वोत्तम कामगिरी ऑलिंपिकमध्ये नोंदवता यावी या दृष्टीने प्रशिक्षणाची आखणी करायला हवी. सुदैवाने ऑलिंपिक स्पर्धा शर्यतींच्या तारखाच नाही, तर वेळाही खूप आधी जाहीर करण्यात येतात. त्याला अनुसरून सरावाचा कार्यक्रम आखायला हवा. त्याच्या आधी वा नंतर कामगिरीचा कळसाध्याय येऊन उपयोग नाही. अर्थात, ही जबाबदारी प्रशिक्षक आणि संघटनेची. संघटनांतील वाद मिटले तर त्याचा फायदा खेळाडूंना होईल.

खेळाडूंचे काम म्हणजे चित्त एकाग्र करून सराव करणे, ध्येय सतत समोर ठेवणे, कोणतीही बाब प्रशिक्षकांपासून लपवून न ठेवणे. त्यांचा सल्ला, अगदी सरावापासून खाणे, पिणे, पूरक व्यायाम, विश्रांती व झोपेचेही वेळापत्रक त्यांना आखावे लागेल तेही ऑलिंपिक कार्यक्रम डोळ्यांपुढे ठेवून. देशांतर्गत महत्त्वाच्या स्पर्धा ऑलिंपिक कार्यक्रमानुसारच घेणे म्हणजेच खेळाडू सरावासारखा ऑलिंपिकमध्ये उतरेल.  मनोभूमिका योग्य प्रकारची होण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेणे या गोष्टी खेळाडूंनी विसरून चालणार नाही. सांघिक स्पर्धातील खेळाडूंनी शक्‍यतो एकत्र सराव करावा आणि जास्तीत जास्त सामन्यांचा त्यात समावेश असावा, म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणते डावपेच आखावे लागतात ते त्यांना कळून चटकन अमलात आणता येईल. या वेळी हॉकीत प्रथमपासून आक्रमक खेळून सतत हल्ले करण्याचे धोरण यशस्वी ठरले; परंतु हे हल्ले थोपवण्याचे तंत्र प्रतिस्पर्ध्यांनी वापरले, तेव्हा पर्यायी योजना आपल्याकडे नव्हती. त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. हे लक्षात घेता आता ऑलिंपिक पात्रता फेरीत संघाला कसून प्रयत्न करावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com