Sadanand Date : अनुभवी, धाडसी अधिकाऱ्याचा गौरव

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकपदी सदानंद दाते यांची झालेली निवड ही आतापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी दाखवलेल्या कौशल्याची पोचपावती म्हणावी लागेल.
Sadanand Date
Sadanand Datesakal

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकपदी सदानंद दाते यांची झालेली निवड ही आतापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी दाखवलेल्या कौशल्याची पोचपावती म्हणावी लागेल. महाराष्ट्रात त्यांनी विविध पदांवर काम करताना मिळालेली अनुभवाची शिदोरी त्यांना नवीन जबाबदारी पार पाडायला निश्‍चित उपयोगी पडू शकते.

मृणालिनी नानिवडेकर

मुं बईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावर परकी भूमीवरुन झालेले आक्रमण होते. त्याला परतवून लावल्यानंतर सुरक्षा यंत्रणेत बदल करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) हीदेखील त्याचाच एक भाग. या हल्ल्याला परतवून लावण्यात मोलाची कामगिरी पोलिस अधिकारी सदानंद दाते यांनी बजावली होती. त्यांचीच नेमणूक या ‘एनआयए’च्या महासंचालकपदी होणे हा स्वागतार्ह योगायोग आहे. दातेंची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता शांतपणे परिस्थिती हाताळत त्यातून व्यवस्थात्मक बदल घडवण्याचे कौशल्य यांची दखल घेत ही निवड झाली आहे.

दिल्लीत महाराष्ट्रातील सनदी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. माधव गोडबोले, राम प्रधान, दत्ता पडसलगीकर, ज्युलिओ रिबेरो यांच्या मालिकेत आता सदानंद दाते यांचे नाव सामील झाले आहे. भंडाऱ्याचे पोलिस प्रमुख या नात्याने नक्षलवादाची समस्या हाताळण्यापासून तर मुंबईत आर्थिक गुन्ह्यांची उकल करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारी तपास पथकापर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नक्षलवादाच्या आव्हानावर मात करण्यापासून ते मुंबई पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) असे सगळे अनुभव त्यांना ‘एनआयए’च्या महासंचालकपदाची जबाबदारी देण्यापूर्वी निश्‍चितच विचारात घेतले असणार.

अनुभवाची मोठी शिदोरी

सदानंद दाते मुंबईत काम करत असताना २६/११चा हल्ला झाला. खरे तर त्यांच्याकडे त्यावेळी जबाबदारी होती ती मध्य मुंबईची. पण कार्यक्षेत्राचा विचार न करता त्यांनी घरालगतच्या पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथून बंदूक, दारुगोळा घेत ते दक्षिण मुंबईच्या परिसरात पोहोचले. कामा रुग्णालय परिसरात शिरलेल्या अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांपासून उपचार घेत असलेल्या बालक आणि महिलांचे संरक्षण करण्यासाठी दाते काही तास झुंजत होते. त्यावेळी कसाबने एका व्यक्तीचा ढालीसारखा वापर करत दातेंना टिपायचा प्रयत्नही केला. जखमी झाल्यानंतर त्याही स्थितीत ते झुंज देत राहिले.

Sadanand Date
Pune Crime News : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला अटक

या हल्ल्याच्या घटनेनंतर दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘फोर्स वन’चे दाते प्रमुख होते. नंतरची काही वर्षे त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. छत्तीसगडच्या परिसरात माओवाद्यांशी दोन हात करण्यासाठी तेथील स्थानिक भाषा अवगत असणाऱ्या तरुणांची जवान म्हणून भरती करण्याच्या प्रस्तावापासून ते त्या भागाच्या विकासाला चालना देणे असे विविधांगी प्रयत्न त्यांनी केले. महाराष्ट्रात परतल्यानंतर कोरोना काळात त्यांना नव्या पदावरील नियुक्तीसाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर मीरा-भाईंदर या नवनिर्मित पोलिस आयुक्तालयाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

आयुक्तालयात पोलिस नागरिक संवादावर विशेष भर दिला. हा दृष्टिकोन संपूर्णत: वेगळा होता. ‘एनआयए’च्या महासंचालकपदी नियुक्त होण्यापूर्वी ते महाराष्ट्रात दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते. ठाणे-भिवंडी परिसरातील पडघा येथे ‘इसीस’ने सुरू केलेल्या कारवायांचा तपास लावून ते त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नेस्तनाबूत केले. या कारवायांचा मागोवा घेण्यासाठी ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’ने संयुक्तरित्या केलेली कारवाई समन्वय आणि सहकार्याचे आदर्श उदाहरण मानले जाते. केंद्र आणि राज्ये यांच्यात विविध पक्षांची, विचारांची सरकारे असताना ‘एनआयए’ला मोठ्या कुशलतेने आपली कामगिरी पार पाडावी लागते. गुन्हेगारी कृत्यांचा छडा लावावा लागतो. अशा स्थितीत दाते यांची संयत भूमिका निश्‍चितच मदतकारक ठरू शकते.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत प्रशासकीय सेवेचे क्षेत्र निवडलेल्या सदानंद दाते यांना वाचन, अभ्यासाची विलक्षण आवड आहे. फुलब्राईट स्कॉलरशिप अंतर्गत त्यांनी अमेरिकेत जावून तेथील ‘व्हाईट कॉलर्ड’ गुन्हेगारीचा अभ्यास केला. पोलिस कल्याण निधीतून कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लावला आहे, त्यांच्या हाताखालील कर्मचारी त्यांचा त्याबाबत आदराने उल्लेख करतात. पोलिस वर्दीतल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेले पुस्तक ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ वाचकप्रिय आहे.

जगावर दहशतवादाची छाया अधिकाधिक गडद होत आहे. जम्मू-कश्मीरमधील घुसखोरी, पंजाबसारख्या राज्यातला अमली पदार्थाचा व्यापार, ईशान्येतील राज्यांतील उलथापालथी यांसह अनेक आव्हाने आहेत. अशा वेळी देशांतर्गत तसेच सीमेपलीकडून देशाच्या सुरक्षेसमोर आव्हान ठरणाऱ्या कारवायांचा नि:पात करणे फार महत्त्वाचे आहे. ते हाताळण्यासाठी मराठी अधिकाऱ्याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या महासंचालकपदी नेमले जाणे, ही अभिमानाची बाब आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com