शिक्षण सर्जन : दुर्गम भागातील सुगम धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kamble

कोरोना काळात भीतीमुळे हजारो मुले दोन वर्षे शिक्षणापासून वंचित राहिली. घरांच्या चार भिंतींच्या आत ती कोंडली गेली होती.

शिक्षण सर्जन : दुर्गम भागातील सुगम धडे

कोरोना काळात भीतीमुळे हजारो मुले दोन वर्षे शिक्षणापासून वंचित राहिली. घरांच्या चार भिंतींच्या आत ती कोंडली गेली होती. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीदेखील अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीसारख्या दुर्गम तालुक्यात तर ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणींचे डोंगर उभे राहत होते. यावर मात करण्याचे आव्हान जिल्‍हा परिषदेच्या विद्यामंदिर कांटे येथील प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे यांनी पेलले आणि मुलांपर्यंत शिक्षण पोचविले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांमध्ये व्यवहार ज्ञान रुजविण्याचा प्रयत्न केला. निसर्ग संवर्धनाच्या हेतूने निसर्गाबरोबर शिक्षण देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या विचारकक्षा रुंदावण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. त्यांच्या या कामाची दखल ‘युनिसेफ’च्या फ्‍लीप बुकमध्येही घेतली गेली आहे.

कांबळे यांनी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नवे देण्याचा प्रयत्न केला. ‘शिक्षण आपल्या दारी’ उपक्रम राबवताना त्यांनी संपूर्ण पाठ्यक्रम डिजिटल बॅनरवर घेतला. त्या माध्यमातून वाड्या, वस्‍त्यांवर शिक्षण पोचविले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रम राबवला. घरोघरी पुस्‍तके पोच करून मुलांना वाचनाची आवड लावली. वाचलेल्या पुस्तकांचे टिपण काढून त्यावर चर्चा घडवल्या. त्याला समाजप्रबोधनाचीही जोड दिली.

मुलींच्या मासिक पाळी व्यवस्‍थापनाबाबत सातत्याने विविध शाळांमध्ये जाऊन शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. त्यासाठी ‘कळी खुलताना’ या माहितीपटाची निर्मिती करून तो शाळा-शाळांमध्ये जाऊन दाखविला. त्या माहितीपटाच्या माध्यमातून मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागृतीचे काम केले. हा संवेदनशील विषय सोपा करून त्याबाबत मार्गदर्शन केले. मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करून आरोग्याविषयी शिक्षण दिले. हे सर्व करतानाच ‘उंच भरारी’, ‘किशोरवयीन मुलींच्या संरक्षण व महिला सक्षमीकरणासाठी नारी’ हे लघुपट तयार केले. ते शाळांतून दाखवत जागृतीचे काम सुरू ठेवले. गाव कोरोनामुक्‍त करण्यासाठी ‘विळखा’ नावाच्या लघुपटाद्वारे कोरोनाबाबत जागृती आणि उपाययोजना सुचविल्या. कांबळे हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाठ्यपुस्तकाशिवायही जग आहे आणि तेथे जगताना चौफेर आकलन, सर्वसमावेशक विचार करण्याची वृत्ती आणि त्याला अभ्यासाची जोड द्यावी लागते, हे बालमनात रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुर्गम भागात विकास पोचण्यास विलंब होतो. त्यातून मुलांपर्यंत नवे शिक्षण पोचणे आणखी अवघड असते. याची जाणीव ठेवून खेडोपाडी जाऊन ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षणाबरोबरच स्वतःच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजातील अनेक चालीरीती, व्यसनाधीनता, किशोर वयातील समस्या यांवर प्रबोधनात्‍मक फिल्‍म तयार करून ते सातत्याने जागृतीचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Sadanand Patil Writes Online Education Anil Kamble Inaccessible Part

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top