
शंकर टेमघरे
महाविष्णूचा अवतार।
सखा माझा ज्ञानेश्वर।।
असे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन संत सेना महाराज करतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती।
देह कष्टविती परोपकारी।।
असे संतांचे वर्णन संत तुकाराम महाराज करतात. संत नेहमी परोपकारासाठी जगले. ते समाजहितासाठी आपले जीवन वाहत असतात. अध्यात्म आणि ज्ञानग्रहणाचा अधिकार ठराविक वर्गाकडे होता. विठ्ठलपंत कुळकर्णी यांनी विवाहानंतर आलेल्या विरक्तीवरून संन्यास घेतला. मात्र, गुरूआज्ञेनंतर पुन्हा संसार केला. त्यानंतर संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि आदिशक्ती मुक्ताई यांचा जन्म झाला. त्यामुळे धर्ममार्तंडांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना देहान्त प्रायश्चित्त घेण्यास भाग पाडले. या कथित धर्ममार्तंडांनी त्यांच्या अपत्यांना धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला नाही. चारही भावंडांचा अतोनात छळ केला. गावाबाहेर काढल्याने चारही भावंडे आळंदीबाहेर सिद्धबेटात राहू लागली.