Tiware Dam
Tiware Dam

अग्रलेख : व्यवस्थेचे तडे

मुंबई आणि पुणे परिसरातील पावसाचे थैमान हळूहळू कमी झाले असले, तरी राज्यभरात अन्यत्र पावसाचा जोर कायम आहे आणि पावसाच्या या तडाख्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून त्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. या आपत्तींसाठी मुसळधार पावसाकडे बोट दाखविण्यात येत असले, तरी हे सारे जीव समाजात फोफावलेल्या 'चलता है' वृत्तीचे बळी आहेत.

दुर्घटना मुंबईतील असो की पुण्यातील की चिपळूणजवळील तिवरे धरणाची, त्यातून समोर येणारे भयावह वास्तव स्पष्ट दिसत असतानाही त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. आला दिवस पुढे ढकलण्याची आपली वृत्तीच या दुर्घटनांना कारणीभूत आहे. खरे तर तिवरे धरणाच्या मुख्य दरवाजापाशीच मोठे खिंडार पडल्याचे वृत्त 'सकाळ'ने दीड महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. हे वृत्त तपशीलवार होते आणि त्यात या धरणाला धोका असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तरीही, त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी पाहणीचा सोपस्कार पार पाडण्यापलीकडे काहीही केले नसल्याचे आता उघड झाले आहे.

इसवी सन 2000 मध्ये बांधलेल्या या धरणाचे बांधकाम काय लायकीचे होते, ते चार-सहा वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले होते. या धरणाच्या भिंतीतून सतत गळती होत होती आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणावर कमी होत होता. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्यानंतर काही आमदारांनी त्याची पाहणी केली आणि त्यांनी पाटबंधारे खात्याकडे त्याबाबत आवाजही उठविला होता. दापोली लघु-पाटबंधारे क्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या या धरणाच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तर बेपर्वाई दाखवलीच; पण या आमदारांनीही हे प्रकरण सरकारदरबारी नीट लावून धरले नाही. त्यामुळे चिपळूण परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या शोकांतिकेस सामोरे जावे लागले आहे. 

अर्थात, शासकीय बेपर्वाई आणि बेफिकिरीचे हे एकमेव उदाहरण नाही. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हे धरण दुथडी भरून वाहू लागले, तेव्हा तेथे पर्यटनासाठी आलेल्यांनी ही खबर परिसरातील ग्रामस्थांना दिली. त्यानंतर तासाभरातच हे धरण फुटले. या दुर्घटनेनंतरच्या अवघ्या 18 तासांत मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील धामणा धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असून, या धरणालाही धोका निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या धरणालाही धोका असल्याचे वृत्त 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'साम' या वृत्तवाहिनीने दिले होते. मात्र, त्यानंतरही केवळ एकच अधिकारी तेथे येऊन पाहणी करून गेला, असे सांगण्यात येते.

आता तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मात्र तेथे जिल्हाधिकाऱ्यांपासून अधिकाऱ्यांचे ताफे दाखल झाले आहेत. याचा अर्थ प्रकरण गळ्यापर्यंत येईतो आपण सारेच कमालीचे बेफिकीर असतो, यापलीकडे दुसरे असू शकत नाही. गेल्या काही दशकांत पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम ही खाती म्हणजे चरण्याची कुरणे झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या दोन खात्यांवरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप अनेकदा झाले आहेत आणि त्या त्याप्रकरणी डझनावारी चौकशी समित्या नेमल्या गेल्या. मात्र, कोणत्याही प्रकरणात कोणालाही जरब बसेल अशी कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच हा सारा खेळखंडोबा 'कालच्या पानावरून पुढे सुरू' किंवा 'आजचीच गोष्ट उद्या पुन्हा' या न्यायाने सुरू आहे. 

आताही तिवरे धरणफुटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रश्‍न हा आहे, की धोक्‍याची माहिती समोर आल्यानंतरही सरकार डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ का राहिले? प्रश्‍न एका तिवरे धरणफुटी दुर्घटनेचा नाही. पुणे परिसरात इमारतींच्या संरक्षक भिंती कोसळून ज्या काही दुर्घटना घडल्या, त्यांबाबतही तक्रारी केल्या गेल्या होत्याच. तेव्हाही काही ठोस कारवाई झाली नाही.

राज्याच्या राजधानीत दर पावसाळ्यात पाणी तुंबणे, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडणे आणि रोज पायाला चाके लावल्यागत पळणारी मुंबई पायात बेड्या घातल्याजोगी ठाणबंद होऊन जाणे, हे आता नित्यनेमाचे झाले आहे. त्यामुळेच बहुधा सारेच खापर निसर्गाच्या अनियमित, तसेच बेभरवशाच्या चक्रावर फोडण्याचा उपाय राज्यकर्ते, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत आणि नोकरशहांनी करण्याचा रिवाज पाडला आहे. त्याला कारण ही बेफिकीर, बेजबाबदार मनोवृत्ती आहे. हे चित्र बदलावयाचे असेल, तर सरकार आणि नोकरशाही यांना या 'चलता है' या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे कठीण काम करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com