अग्रलेख : ना आब, ना अब्रू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

ब्रिटनची सध्याची दुरवस्था, ट्रम्प यांचा अहंकार आणि राजकीय संवादाची घसरती पातळी याचा प्रत्यय ई-मेल फुटीच्या प्रकरणात आला. 

'ब्रेक्‍झिट'च्या मुद्द्यावर धड पुढेही जाता येत नाही आणि मागेही अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या ब्रिटनची सध्याची अवघडलेली स्थिती आणि कुठल्या देशात कोणाच्या हाती सत्तेच्या चाव्या असाव्यात, याविषयी ढवळाढवळ करण्याचा जणू आपला निसर्गदत्त हक्क आहे, हा अमेरिकी अध्यक्षांचा दर्प या दोन्हीं गोष्टींचे ढळढळीत दर्शन 'ई-मेल' फुटण्याच्या ताज्या प्रसंगातून घडले.

वास्तविक परराष्ट्र खात्याशी संबंधित संवादव्यवहारात गोपनीयतेचे संकेत कटाक्षाने पाळले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने ही काळजी घेतली जातेच; परंतु शिष्टाचाराचा भाग म्हणूनही त्याला महत्त्व असते. या प्रकरणात त्या सगळ्यालाच सुरुंग लागलेला दिसतो. घडलेला प्रसंग वरकरणी साधा असला, तरी त्यातून उमटलेले साद-पडसाद आणि समोर आलेली माहिती सध्याच्या एकूण राजकीय संस्कृतीवर प्रकाश टाकत असल्याने त्याची दखल घ्यायला हवी.

ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत सर किम डॅरोक यांनी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराविषयी मतप्रदर्शन करणारे जे 'ई-मेल' आपल्या सरकारला पाठवले होते, त्यात एकूणच अमेरिकी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर शेलक्‍या शब्दांत टिप्पणी केली होती. "हे प्रशासन सुरळीतपणे चालविले जाईल, यावर आपल्याला (ब्रिटनला) विश्‍वास ठेवता येणार नाही. हे प्रशासन अकुशल, राजनैतिकदृष्ट्या किचकट, बिनभरवशाचे, मतभेदांमुळे ग्रासलेले आणि निव्वळ हास्यास्पद बनलेले असे आहे,' हे त्यांचे मतप्रतिपादन ब्रिटनच्या सरकारला पाठविलेले होते. त्यातील भाषा कठोर आहे, हे खरेच असले तरी यात काही धक्कादायक किंवा वेगळे घडले आहे, असे नाही.

आपल्या सरकारला संबंधित देशाची, तेथील धोरण-कार्यपद्धती आदींविषयी मिळणारी माहिती एवढेच नव्हे, तर आपली मते कळविणे हे राजदूतांचे कामच आहे. हे केवळ ब्रिटनच्या राजदूताने केले असे नाही. वेगवेगळ्या देशांचे राजदूत आपल्या देशाच्या सरकारला माहिती पाठवितात, एवढेच नव्हे तर आपली मतेही स्पष्टपणे कळवितात. किंबहुना त्यांच्याकडून तसे अपेक्षितच असते. त्यामुळे ही टिप्पणी धक्कादायक नसून, त्या माहितीला पाय फुटणे आणि ती ब्रिटनमधल्याच वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणे हे धक्कादायक आहे. माहितीची गोपनीयता राखण्यात तेथील प्रशासनाला आलेले हे धडधडीत अपयश आहे.

अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील घनिष्ठ संबंध लक्षात घेता त्यात निर्माण झालेला ताण यानिमित्ताने समोर आला. त्यातही ब्रिटनची सध्याची अवस्था किती नाजूक झाली आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते. केवळ सामरिकच नव्हे, तर आर्थिक, राजकीयदृष्ट्याही ब्रिटन अमेरिकेवर खूपच अवलंबून आहे. अमेरिकेबरोबरच्या संबंधात ब्रिटनचे दुय्यमत्व जगजाहीर आहे. रासायनिक अस्त्रांचे कारण देऊन इराकवर हल्ला करण्याचा जॉर्ज बुश यांच्या निर्णयाला "मम' असे म्हणणाऱ्या ब्रिटनवर त्या वेळीही जगभरातून टीका झाली होती आणि आजही होते. आंतरराष्ट्रीय राजकारणातील ब्रिटनची स्वायत्त ओळख फिकट होत असल्याचे ते ठळक चिन्ह होते. ती घसरण थांबलेली नाही. त्यामुळेच एकीकडे राजदूताने त्याचे कर्तव्य बजावले, असे सांगतानाच दुसरीकडे ब्रिटन सरकारने ट्रम्प यांची माफीही मागितली. 

या सगळ्या प्रकारावरील ट्रम्प यांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर जागतिक महासत्तेचा अध्यक्ष इतक्‍या सवंग पद्धतीने व्यक्त कसा काय होतो, हा प्रश्‍न कोणाला पडू शकेल. 'ई-मेल'चा तपशील फुटल्यानंतर ट्रम्प अर्थातच खवळले आणि त्यांनी ब्रिटनच्या राजदूताची संभावना 'महामूर्ख' अशी केली. केवळ राजदूतावरच ते घसरले असे नाही, तर त्यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांनाही लक्ष्य केले. "ब्रेक्‍झिटच्या संदर्भात कशा रीतीने वाटाघाटी व्हाव्यात, या दृष्टीने मी थेरेसा मे यांना सांगितले होते. त्यांनी काहीही केले नाही, त्या सपशेल अपयशी ठरल्या. पंतप्रधानपदावरून त्या जात आहेत, हे चांगलेच आहे,' अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी उधळली. नंतरही 'ट्विट' करण्याचा त्यांनी सपाटाच लावला.

'अमेरिकेतील ब्रिटनचा सध्याचा राजदूत मूर्ख आहे. मी त्यांना ओळखत नाही; पण त्याच्याविषयी या भागात फार चांगले मत नाही', असे "ट्‌विट' त्यांनी केले. त्याबरोबरच, 'आम्ही या पुढे त्याच्याशी व्यवहार करणार नाही. पण ब्रिटनला लवकरच नवीन पंतप्रधान मिळेल ही चांगली बाब आहे,' असेही ट्रम्प यांनी लिहिले. ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या रूपाने नवा पंतप्रधान येणार आहे आणि नवा राजदूतही आपल्याच मर्जीतील असेल, अशी जणू ट्रम्प यांना खात्रीच आहे, असेच त्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. अशी आदळआपट करणारा प्रतिसाद हा आत्मविश्‍वासदर्शक नसून त्याचा अभाव दर्शवतो. 'अमेरिका फर्स्ट'चा नारा देत ट्रम्प देशांतर्गत 'मतदारसंघा'ला आकृष्ट करण्याची धडपड करीत असले, तरी विविध घटकांमध्ये त्यांच्याविषयी अविश्‍वास निर्माण होत आहे.

विविध देश; अगदी ब्रिटनसारखा मित्रदेशही त्याची धोरणे आणि कारभाराविषयी कमालीचा साशंक आहे. त्यांच्या कारभारात धोरणात्मक सुसंगती नसल्याचे आणि त्यांच्या लहरीपणाचे दर्शन अनेक निर्णयांवरून येत आहेच. पण आत्मपरीक्षणाला प्रवृत्त होतील तर ते ट्रम्प कसले? एकूणच त्यांचा अहंकार, ब्रिटनची सध्याची दुरवस्था आणि राजकीय संवादाची घसरलेली पातळी यांचाच प्रत्यय या प्रकरणातून आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Editorial on Brexit Donald Trump and latest Email leak case