Dhing Tang : निर्बंधांची ऐशीतैशी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग
Dhing Tang : निर्बंधांची ऐशीतैशी!

ढिंग टांग : निर्बंधांची ऐशीतैशी!

पुनश्च एकवार काढ्याचे दिवस आले असून हेही दिवस (अंगावर ) काढले जातील, याची खात्री वाटते. काढा, वाफ आणि क- जीवनसत्त्वाच्या गोळ्या यांचे नियमित सेवन करीत हे दिवस काढावेत, असे नागरिकांना नम्र आवाहन आहे. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठी रोगराई प्रतिबंधक कायद्याअन्वये नवी नियमावली जारी करण्यात आली असली तरी निरक्षर असल्याप्रमाणे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले असून पहिल्या लाटेचे वेळी नाक्या-नाक्यावर पोलिस बांधवांनी दंडुक्याच्या साह्याने निर्बंधांची अंमलबजावणी करुन दाखवत जनता कर्फ्यू यशस्वी केला होता, याचे स्मरण करुन देणे येथे इष्ट ठरावे. उगीचच गर्दी करणाऱ्या अनेक सभ्य नागरिकांना त्याकाळात खुर्चीवर बसता येणे कठीण झाले होते, हे आठवावे.

निर्बंधांची पायमल्ली अशीच सुरु राहिल्यास पोलिस, नियती आणि कोरोना संयुक्तपणे कारवाई करतील, याकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यात येत आहे. गेल्या काही दिवसातील निरीक्षणे आणि आगामी काळातील सूचना पुढीलप्रमाणे :

१.कापडी मास्क की एन-९५ मास्क? असा एक नवा राजकीय वाद उकरुन काढून सर्वांची मास्कटदाबी करण्याचा प्रयत्न दिसतो. मास्क साडीला मॅचिंग असावा असे काही राजकीय पुढाऱ्यांचे म्हणणे आहे तर अन्य काही नेते एन-९५ मास्क वापरा, असे सांगत आहेत. एन- ९५ मास्क बव्हंशी पांढरा असतो, त्यामुळे नेतेमंडळींना आपोआप मॅचिंग होतो, हे त्याचे गुपित आहे.

२. हपिसात जावे की जाऊ नये? असा आणखी एक वाद रंगू लागला आहे. बहुतेकांना घराबाहेर राहावयाचे आहे, आणि त्याचवेळी कामही टाळायचे आहे. हे कसे जमावे?

३. उपाहारगृहांमध्ये पन्नास टक्के क्षमतेनेच गिऱ्हाईके बसवावीत, असा नियम आहे. तथापि, काही ठिकाणी उपहारगृहांमध्ये तीनशे टक्के उपस्थिती असल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ, प्रत्येक भरलेल्या टेबलाशी वेटिंगमध्ये दोन जण उभे असलेले दिसले.

४. एक जण टेबलाशी बसून जेवत असताना त्याच्या ताटात (वरुन) लक्ष ठेवत उभे राहू नये. ते असभ्य आहे. ‘लौकर आटपा ना’, ‘इथेही कोबीच का, च्यामारी, कठीण आहे…’, ‘एक्सट्रा चपाती आता घेऊ नका हो’, ‘राहू द्या आता शेवटचा भात’ वगैरे उद्गार काढून भोक्त्यास हैराण करु नये.

५. डोसा, मसालेडोसा, उत्तप्पा, टमाटो आमलेट आदी तवाकुलोत्पन्न पदार्थ खाण्यासाठी काटेचमच्यांचा वापर अनेकदा वेळखाऊ ठरतो, याची नोंद घ्यावी.

६. उपाहारगृहातील वॉशबेसिनशी उभे राहून वाईटसाइट आवाज काढणे आरोग्यास अतिशय अपायकारक आहे.

७. उपाहारगृहाबाहेर ‘आसनक्षमता, सध्या भरलेली टेबले व उपलब्ध खुर्च्या’ यांचा फलक लावणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ : आसनक्षमता : १६ , भरलेली टेबले : २, उपलब्ध खुर्च्या : आठ’ असे लिहावे. तसेच कुठले पदार्थ उपलब्ध नाहीत, तेही लिहावे. जेणेकरुन गर्दी टळेल. उदाहरणार्थ : टेबलाशी बसल्यावर ‘वडा गरम नही है’ असे सांगू नये. गिऱ्हाईक इडलीवर भागवते.

८. मद्यगृहातील माणसे मोजण्यासाठी शुध्दीवर असलेला माणूस नेमावा. अन्यथा कारवाई करणेत येईल.

९. उद्वाहनात (पक्षी : लिफ्ट) बोलताना (मास्क काढून) ‘थयथयाट’, ‘थुलथुलीत, थालीपीठ, ‘तुला काय माहीत?’, ‘श्रीमंत’, आदी तालव्य शब्दांचे उच्चार टाळावेत.

१०. उपाहारगृहामध्ये गिऱ्हाईके टेबलाशी येऊन बसली रे बसली की लागलीच पायाखालील फरशी पुसावयास माणूस पाठवल्यास उपाहारगृहाच्या चालकावर कठोर कारवाई करणेत येईल.

…‘नीट वागाल, तर नीट जगाल’ हे जीवनाचे सर्व्हायवल-सूत्र आहे, ते तोंडपाठ करावे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :articleEditorial Article
loading image
go to top