मराठी : एक फॉरेन लँग्वेज!

नअस्कार! आमच्या पुण्यात कुणालाही विचारा की बुवा, शनवारवाडा सोडून काय आहे तुमच्या गावात बघण्यासारखं?
मराठी : एक फॉरेन लँग्वेज!
मराठी : एक फॉरेन लँग्वेज!Sakal

नअस्कार! आमच्या पुण्यात कुणालाही विचारा की बुवा, शनवारवाडा सोडून काय आहे तुमच्या गावात बघण्यासारखं? लोक फर्गसन रोडकडे बोट दाखवतील. तिथं वाडेश्वर, रुपाली आणि वैशाली ओळीनं उभे आहेत. त्यांच्यासमोर चहाटळ (पक्षी : चहा पिणारे) लोकांची टोळकीही उभी आहेत. ही टोळकी ‘वा. रु. वै.’च्या स्थापनेच्या आधीपासून उभीच होती, असंही कुणी सांगेल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, आणि चक्क फूटपाथ बदला. पलिकडल्या बाजूला रम्य वृक्षराजींमध्ये आमची ‘रानडे इन्स्टिट्यूट’ उभी आहे. तिथं मराठी नावाची फॉरेन लँग्वेज कानावर पडेल.

रानडे इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस ही पुण्यनगरीचं भूषण आहे. काही नतद्रष्ट लोक केवळ गाड्या (पक्षी : मोटरसायकली नि स्कूटरी) पार्क करायला इथं येतात. पण ते जाऊ दे. पुण्याचं भूषण असलेल्या या भव्य वास्तूमध्येही अनेक भूषणास्पद गोष्टी होत्या आणि अजूनही आहेत. त्यापैकी एक- आमच्या विद्यार्थीप्रिय मॅडम प्रा. डॉ. नीती बडवे!!

‘रानडे’मध्ये अनेक परकीय भाषा शिकवल्या जातात. त्यात आपली मराठीसुध्दा आहे! आता संघर्षतुम्ही म्हणाल, ‘‘इश्श, मराठी का पर्कीय?’’ तर आम्ही सांगू की, या इमारतीच्या आवारात ती परकीयच!! आमच्या डॉ. नीतीताई इथं चटपटीतपणे वावरायच्या, तेव्हा आसपासचे फिरंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांना ‘गुटेन मॉर्गेन’, ‘गुटेन टाग’ किंवा ‘बाँ ज्यु’ असं विश करायचे. नीतीताई त्यांना दटावून म्हणायच्या, ‘अंहं, म्हणा, शुभ सकाळ, शुभ दिवस, किंवा नअस्कार!!’

परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवून त्यांनी इतकं पारंगत केलं की विचारु नका! त्यांचे विद्यार्थी तीन महिन्यात फाडफाड मराठी बोलायला लागतात, असा त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या हाताखाली मराठी शिकून शिकून तयार झालेला एक जर्मन विद्यार्थी परत बर्लिनला गेला, तर त्याला तिथे पुन्हा जर्मन भाषा शिकावी लागली, अशी वदंता आहे.

नीतीताईंनी ‘लर्निंग मराठी ॲज फॉरेन लँग्वेज’ ही आपलं वैयक्तिक मिशन मानलं, आणि विद्यार्थ्यांना मात्र जर्मन, हिंदीसुद्धा शिकवलीन!! काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कागदी होड्या करता येतात, तर काही लोकांना खूप भाषा येतात. डॉ. नीतीताई त्यांपैकीच (होड्या नव्हे, भाषा!) मराठीचा अभ्यास सोपा जावा म्हणून त्यांनी कोविडकाळात ‘अनंत अक्षरे’ नावाची ग्रंथमालिकाच लिहायला घेतली. त्या मालिकेतली तीन पुस्तकं नुकतीच त्यांनी हातावेगळी केली. जानेवारीत नितीन प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली...

पुस्तकांची नावं वाचलीत तरी मराठी भाषा अजून अभिजात का झाली नाही? याचं आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. नावच बघा- ‘भाषेकडे बघताना...’, ‘मराठी भाषेकडे बघताना...’ (खुलासा : बघणे हे क्रियापद कायम असलं तरी ही दोन्ही पुस्तकं वेगळी बघावी लागतात! असो.) आणि तिसरं, ‘बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे...’ (खुलासा : प्रत्येक टायटलमध्ये तीन टिंबं कायम आहेत. पुन्हा असो.) या तिन्ही पुस्तकांची मुखपृष्ठ डॉ. नीतीताईंनीच केली आहेत, असं म्हणा. म्हंजे असं की भाषा शिकवता शिकवता त्यांनी काही म्युरल्स केली. (खुलासा : त्यांना चित्ररंगांची भाषाही येते!) तीच सुंदर म्युरल्स इथं मुखपृष्ठावर आली आहेत.

ही तिन्ही पुस्तकं मराठी वाचकांसाठीच लिहिण्यात आली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. वाचताना ‘मजा येते’ असा अभिप्राय वाचकांकडून मिळतोय. मजेखातर मीही वाचून बघणार आहे. उद्या ‘मराठी अँज फॉरेन लँग्वेज ऑनर डे’ आहे. त्यानिमित्तानं तरी वाचायलाच हवीत. येस ऑर नो?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com