संपादकीय : पाऊस किती हा पडतो?

मोजता येणे हे एकूणच शिक्षणातील महत्त्वाचे कौशल्य आहे.
Rain
Rainsakal

मोजता येणे हे एकूणच शिक्षणातील महत्त्वाचे कौशल्य आहे. विशेषतः विज्ञान समजणे, समजावून सांगणे, यात तर त्याचे स्थान कळीचे ठरते. यासंदर्भात आठवण होते ती ‘भवताल’ या संस्थेने केलेल्या पाऊस मोजण्याचा उपक्रमाची. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक गरजेचा आहे. असा पर्जन्यमापक सोप्या पद्धतीने कसा बनवता येतो याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी याचे इच्छुक व्यक्तींना प्रशिक्षण दिले. पाऊस मोजण्यासाठीच्या उपक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारपेक्षा जास्त व्यक्तींनी नावे नोंदवली. या लोकांना प्रशिक्षण देऊन एकेक गटाबरोबर काम करण्यासाठी शंभर स्वयंसेवक तयार केले. १६ जूनपासून पाऊस मोजायला सुरुवात झाली. जवळपास १६० जणांच्या नोंदी सातत्याने पावसाळ्यात येत राहिल्या. या नोंदी योग्य प्रकारे पाठवण्यासाठी भवतालच्या वेबसाईटमध्ये योग्य ते बदल करावे लागले. मग त्याचे संकलन केले. (Sakal Marathi Editorial Article)

ही एका प्रयोगाबद्दलच्या उपक्रमाची छोटीशी सुरुवात आहे. अभिजीत घोरपडे यांच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम. असे उपक्रम चालू राहिले, तर अनेकांना प्रयोग करण्याची गोडी लागेल. हळूहळू या आकडेवारीचा अर्थ लावायलाही ही माणसे शिकतील.याचा पुढचा टप्पा म्हणजे सामान्य माणसे, आपल्या परिसराकडे निरीक्षणाच्या, मोजमापाच्या दृष्टीने पहायला लागतील. महाराष्ट्रभरातून लोकसहभागातून विज्ञान, ज्ञान, शिक्षण असे स्वरूप मिळवता येईल मोठ्या प्रमाणावर नोंदी झाल्या की, एकूण हंगामात किती पाऊस पडला, ढगफुटीसारख्या घटनांमध्ये कमी दिवसात जास्त पाऊस कसा पडला, तर रोज थोडा तुरळक पाऊस पडण्याचे दिवस किती आणि कोणते. अशा अनेक प्रश्नांना उत्तरे मिळतील.

स्वतःच या मोजमापात सहभागी असल्याने या शिक्षणाबद्दल सहभागींना आत्मीयता वाटेल.कदाचित काहीजणांना या माहितीचा वापर करून काही कृती करता येईल का असाही विचार करता येईल. म्हणजे, यातले काही पाणी साठवता येईल का, ते पाणी रोजच्या वापरात आणता आले, तर नळकोंडाळ्यातून होणारी पाण्याची मागणी काही अंशी यातून पुरवता येईल का, असे मुद्दे सुचू शकतात. त्यातून नवे उपक्रम सुचतील. निष्क्रिय माहितीतून केवळ व्यासंग वाढेल, पण सक्रिय सहभागातून शहाणपण येते. यः क्रियावान् सः पंडितः। असे त्यामुळेच म्हणतात.

बिनभिंतीच्या शाळेत शिकणाऱ्या समुहाची निर्मिती करता येईल, या अर्थाने ‘भवताल’च्या या उपक्रमाचे महत्त्व मोठे आहे. गेल्या दशकापासून ज्ञानसंरचनावाद याचे महत्त्व शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. तर गेली ४०-५० वर्षे जाणीव जागृतीतून परिवर्तन हेही समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जेव्हा वेगवेगळ्या वयोगटाचे विद्यार्थी एकत्र शिकतात, तेव्हा ते एकेकट्याने शिकण्यापेक्षा जास्त प्रभावीपणे शिकू शकतात, या सगळ्याचा औपचारिक शिक्षणामध्येही फायदाच होतो, असेही शिक्षणतज्ज्ञांनी दाखवून दिले आहे. पाऊस मोजण्याच्या या उपक्रमातून अशा अनेक अंगांना सहजी स्पर्श होतो.

पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जणांनी यात सहभाग घेतला. ज्यांनी भाग घेतला, त्यांनी पुढल्या वर्षीसुद्धा अशा मोजण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवली आहे. ज्यांना सातत्याने नोंद ठेवणे जमले नाही, त्यांनी यावर्षी सातत्य दाखवण्याचा निर्धार केला, तर ज्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होता आले नाही, त्यांनी यावर्षी तरी वाढता सहभाग घ्यायचा ठरवले आहे. अर्थातच अशा विस्तारणाऱ्या उपक्रमांना सहभागी, स्वयंसेवक यांची गरज लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com