संपादकीय : खगोल विज्ञानाची प्रयोगशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 खगोल विज्ञानाची प्रयोगशाळा

संपादकीय : खगोल विज्ञानाची प्रयोगशाळा

लहानपणी सर्वांचाच लाडका असलेल्या चांदोबासोबत खगोलातील रहस्य उलगडून विद्यार्थ्यांपुढे मांडणारी खगोल विज्ञान प्रयोगशाळा साकारली ती अकोला जिल्ह्यातील ‘विश्वभारती विज्ञान केंद्रा’चे संचालक प्रभाकर दोड यांनी. खगोलासोबत भूगोलाचे प्रत्यक्ष दर्शनही सरांच्या विज्ञान केंद्रातून विद्यार्थ्यी अनुभवत आहेत. विश्वभारती विज्ञान केंद्राची स्थापना सन २००१ मध्ये अकोला-वाशीम महामार्गावर झाली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविताना अनेक प्रयोग करणारे सर निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांसोबत या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जुळले आहेत. ‘विश्वभारती’ हे विज्ञान केंद्र अकोला-वाशीम महामार्गावर मौजे शिर्ला अंधारे येथील शिवारात दोन हेक्टर जमिनीवर विस्तारले आहे. कार्यकुशलता, कलात्मकता, औदार्य व दूरदृष्टीतून विज्ञानाचा अभ्यास प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभवण्याची संधी येथे विद्यार्थ्यांना मिळते.

नवनव्या कल्पनांचे, विचारांचे प्रत्यक्ष स्वरूप येथे बघावयास मिळणार आहे. शिक्षकांसाठी हे स्थळ स्फूर्तिदायक ठरावे असा त्यांचा प्रयत्न आहे. आकाशाच्या मंडवाखाली हा निसर्गरम्य प्रदेश मनोरंजनातून शिक्षणाशी नवे नाते निसर्गाशी जोडणार आहे. वेधशाळेच्या माध्यमातून अभ्यास व संशोधनासह आकाशातील ग्रह, तारे, चंद्र, सूर्य, उल्का, धूमकेतू आदी खगोलीय घटनांचा येथे अभ्यास करता येतो. वैज्ञानिक, भौगोलिक, गणितीय, खगोलीय, सांस्कृतिक, भौमितिक व ऐतिहासिक आदी महत्त्वपूर्ण कलाकृतींच्या प्रतिकृती येथे उपलब्ध करून देण्यासाठी दोड सर सतत प्रयत्नशील असतात.

ज्ञान विज्ञान प्रबोधिनी, वीस फूट व्यासाची गवताची कुटी प्रमुख आकर्षण आहे. त्यामधे ग्रहगोलीय प्रतिकृती आपल्या पृथ्वीवरील विविध वृत्तांचे दर्शन व उत्तर व दक्षिण धृवांचा परिचय घडविणारी प्रतिकृती, आदी मानवाची चित्रे येथे बघावयास मिळतात. रॉक गार्डन डोंगराच्या उंच भागावर कल्पकतेने साकारलेली ही दगडांची बाग बालकांचे विशेष आकर्षण बनली आहे. डोंगरावर चढताना लागणारी नागमोडी वळणे व लोभसवाण्या पाऊलवाटा आपल्याशा वाटतात. डोंगराच्या मध्यभागावर मानवी जीवाला पूर्वापार वेड लावणाऱ्या आकाशातील विविध प्रतिकृती साकारलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सप्तर्षी, मृग नक्षत्र, धृवतारका समूह, कृत्तिका नक्षत्र, मेष पासून मीनपर्यंतच्या बारा राशी आदी तारकासमूह विविध ठिकाणी आपली माहिती सांगताना दिसतात. चंद्राचा पृष्ठभाग, त्यावरील विवरे, मैदाने, उंच पर्वतरांगा, सन १९६९ साली प्रथमच मानवासह उतरलेल्या अपोलो-११ चंद्रयानाची जागा हे येथे दिसते. तर बोलकी झाडे परिसरात आधीपासूनच वाढलेली पळस, कडुलिंब, निर्गुडी, अमलतास, अग्निशिखा, टेंभुर्णी, मुरळशेंग इ. अनेक महत्त्वपूर्ण वनौषधी या परिसरात असून, त्यांची माहिती देणारे फलके ठिकठिकाणी लावलेली आहेत.

आगळेवेगळे व नाविन्याची आवड, कर्मभूमी व जन्मभूमीला नवीन ओळख करून देण्याचा प्रयत्न त्यांनी येथे केला आहे. डॉ जयंत नारळीकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी हे विज्ञान केंद्र साकारले आहे. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. शासनाकडून विज्ञान केंद्राला पाच एकर जमीन मिळाली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी विद्यार्थी शिक्षक व जनसामान्यांच्या भौगोलिक आणि खगोलीय ज्ञानकक्षा समृद्ध करण्यासाठी आठ हजार ४८४ प्रतिकृतीची निर्मिती त्यांनी केली आहे. आर्थिक बाजू मर्यादित असतानाही सरांची धडपड सुरू आहे.

-श्रीकृष्ण शेगोकार

टॅग्स :SakalEditorial Article