
आपण कुटुंबसंस्थेच्या भवितव्याचा विचार करीत आहोत. कुठल्याही संस्थेचं अथवा व्यवस्थेचं भवितव्य ठरवताना तिच्या संदर्भातील वर्तमानाची जाण हवी, तसंच इतिहासाचंही ज्ञान हवं. लग्नसंस्था कधी सुरू झाली, कुटुंबव्यवस्था कशी अस्तित्वात आली... तिच्यात बदल कसे होत गेले... ती नेहमीच पुरुषप्रधान होती का, हे सारं जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी ‘स्त्री विरुद्ध पुरुष?’ या मी व जयश्री रावळेकर- आम्ही संयुक्तपणे लिहिलेल्या संदर्भग्रंथाचा आधार मी इथे घेणार आहे. मात्र प्रारंभीच हे स्पष्ट करायला हवं, की इतिहासात डोकावणं सोपं नसतं! त्या ग्रंथलेखनासाठी अभ्यास करतानाच हे जाणवलं होतं, की ‘इतिहास संशोधन’ हे अनेकदा ठाम नसतं.
अभ्यासकांच्या आकलनानुसार विविध मतप्रवाह असतात. काही वेळा पुरावे देऊन मांडलेला निष्कर्षही ‘अप्रिय’ म्हणून नाकारला जातो, वादग्रस्त ठरतो... तर कधी आपल्या विचारसरणीनुसार इतिहासाचा सोईस्कर अन्वय लावला जातो. इतिहास ‘बदलण्या’चा अट्टाहासही केला जातो! हे सर्व भान ठेवूनच पुढील काही लेखांत, आपण आमच्या अभ्यासातील महत्त्वाची निरीक्षणे अभ्यासणार आहोत. त्यातून नेमकं ‘काय घ्यायचं’ हे त्यानंतरच ठरवता येईल. ही निरीक्षणे उद्बोधक तर आहेतच, पण काहीशी विस्मयकारक आणि मनोरंजकही आहेत!
सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा हाच की मातृत्व हे निसर्गसिद्ध असतं, पितृत्व मात्र निसर्गतः ओळखू येत नसतं. एका अर्थी पिता ही संकल्पनाच निसर्गात नाही, असं म्हणता येईल. त्यामुळे अपत्यावर (मग ते स्त्रीअपत्य असो की पुरुषअपत्य) निसर्गतः स्त्रीचाच प्रभाव असतो. स्त्रीला ‘माता’ म्हणून पुरुषापेक्षा काही विशेष अधिकार निसर्गातून येतात, ते असे... एक ः मातृत्वामुळे स्त्री ही अपत्याची पूर्ण पालक असते. दोन ः स्त्री व मुलं ज्या जागेवर वास्तव्य करतात, त्या जागेची नैसर्गिक ताबेदार स्त्रीच असते. तीन ः माता म्हणून मुलांकडून सेवा करून घेण्याचा अधिकारही स्त्रीला असतो. हे अधिकार निसर्गानं पुरुषाला नाकारलेले दिसतात. पुरुष हा या अधिकारांचा नैसर्गिक लाभधारकही नाही आणि तो प्रभावकारकही नाही. या दोन्ही दृष्टींनी स्त्रीच्या तुलनेत पुरुष हा निसर्गतः दुय्यमच ठरतो.
मुळात अपत्यनिर्मितीत आपला सहभाग आहे, याचंही ज्ञान प्रारंभी पुरुषांना नव्हतं. त्यामुळेच ते अपत्यांबाबत बेफिकीर असत. मूळच्या शिकारी वृत्तीला आणि शारीरिक बळाला या बेपर्वाईची जोड मिळाल्यानं ते आक्रमक, हिंसक व उतावळे बनत. अशा पुरुषांकडून (अर्थातच प्रारंभीच्या काळात) विधायक कामाची अपेक्षा कशी करणार? स्त्रीला मात्र बऱ्याच गोष्टी कराव्या लागत. नव्या पिढीचा सुरक्षित जन्म, संरक्षण, संवर्धन हाच विचार सतत तिच्या मनात असे. त्यातूनच सर्जक व संशोधक ‘मातृसंस्कृती’चा उदय झाला. स्त्रीची जसजशी वैचारिक, बौद्धिक स्थित्यंतरं होत गेली, तसतशी मानवाची भौतिक प्रगती होत गेली. नैतिक विकास होत गेला.
‘मा’ या शब्दाचा दुसरा व्यावहारिक अर्थ म्हणजे मोजणं, ‘वाटप करणं’ असा आहे. ‘कुटुंबात, गणात अन्नाचं, साधनसामग्रीचं मोजून वाटप करणारी ती माता’ अशी ही व्युत्पत्ती लावता येते. म्हणजे निर्णय घेणारी स्त्री होती व तिचे कुटुंब हे ‘स्त्रीकुटुंब’च होतं. स्त्री व पुरुषांच्या भिन्न वृत्ती आणि त्यांचे वर्तन तत्कालीन स्त्रीकुटुंबात वरदानच ठरले. पुरुषशक्ती व स्त्रीयुक्ती या आधारे दोघेही नवजात पिढीचे उत्तम रक्षणकर्ते ठरले. स्त्री कुटुंबप्रमुख असणं, हे स्वाभाविक मानलं गेलं. त्याबाबतीत पुरुषाला वैषम्य नव्हतं... नसावं. कुटुंबाच्या रक्षणासाठी स्त्रीही हवं तेव्हा भाऊ (म्हणजे सहोदर), मुलगा व पुरुष साथीदार यांचं साहाय्य घेत होती. पुरुषात ‘पितृभावना’ नव्हती असं मानलं, तरी स्त्रीप्रेमातून तिच्या अपत्यांना रक्षण्याची, सांभाळण्याची भावना असू शके. वाढत्या स्मरणानुसार ‘स्त्रीकुटुंबा’तही भाऊ, मामा... अशा नात्यानं नवजात पिढीचा पालक, पुरुष होऊ शके.
हे जरी शक्य असलं, तरी मुलांचा सांभाळ करणं हे काम हजारो सहस्रकं स्त्रीकडेच होतं. त्यातूनच मातृसंस्कृती, मातृकुटुंबव्यवस्था निर्माण झाली व विकसित होत गेली. ज्या टोळ्या निर्माण झाल्या, त्याही ‘मातृटोळ्या’ होत्या. ‘जन’ हा शब्दही ‘जननी’तून निर्माण झाला. स्त्री ही जननी... तिचे रक्तसंबंधीय सदस्य म्हणजे मुलं, बहिणी, मावसभावंडं... हे ‘जन’ ज्या गटात राहत... तो त्या जनांचा ‘गण’ झाला. गणांच्या ‘मुख्य’ स्त्रियाच असत. ‘पती’ याचा अर्थ मुख्य असा होतो. त्याअर्थी स्त्रियाच ‘गणांच्या पती’ असत. हा केवळ अंदाज नव्हे, हे सत्य आहे. मध्य प्रदेशातील भेडाघाट येथील चौसष्ट योगिनींच्या मंदिरात आजही स्त्रीदेहधारी गणपती पाहायला मिळतो. डॉ. रा. चिं. ढेरे यांनीही ‘लज्जागौरी’त म्हटलं आहे, ‘मानवानं प्रथम देवत्व कल्पिलं आणि उपासिलं ते स्त्रीरूपात. सर्जनाची गहन, गूढ शक्ती धारण करणाऱ्या देवीरूपात. मातृदेवता ही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील ‘आद्यशक्ती’ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.