
ढिंग टांग : गांधारीची साक्ष!
हस्तिनापुरातील एका स्वर्णिम सायंकाळी
प्रासादासमोर रथ उभा राहिला,
तेव्हा उतरत्या सायंप्रकाशात
प्रासादाचे कळस झळाळत होते…
हिरव्यागार तृणस्तरावर सुकोमल
पावले उमटवत युगंधर वासुदेव
रथातून पायउतार जाहला,
स्वागतासाठी तुतारी वाजली,
प्रतिहारींच्या वंदनेकडे लक्ष न देता
तो ताडताड चालत
थेट शिरला सम्राट धृतराष्ट्राच्या
अंधाऱ्या अंत:पुरात.
‘‘कोण आलंय?’’ धृतराष्ट्राने
कंपित स्वरात विचारले खरे,
परंतु, चंदन-कस्तुरीच्या विशिष्ट
गंधाची चाहूल लागून लगेच
तो हांसून म्हणाला : ‘‘युगंधरा,
अचानक कसं येणं केलंस?’’
धीरगंभीर स्वरात, कुठलाही
शब्दच्छल न करता वासुदेवाने
तात्काळ बोलण्यास प्रारंभ केला :
शंतनुपुत्रा, प्रत्यक्ष देवव्रताच्या पुण्याईवर
तू कुरुकुलाचे सूर्यचिन्ह तुझ्या
अंध माथ्यावर वागवतो आहेस,
दंडात ठाण नाही,
अंगात प्राण नाही,
भात्यात बाण नाही,
अशा अवस्थेत तू जगतातील
सर्वश्रेष्ठ कुरुवंशाचा दिवा म्हणून
मिरवतो आहेस, पण-
तुझ्या शतपुत्रांनी केलेली कृत्यं
तुझ्या अंध डोळ्यांना दिसत नाहीत?
कुरुकुलाच्या प्रतिष्ठेचं पायपुसणं होताना
तुला काहीही क्लेश होत नाहीत?
भर सभेत द्रौपदीची विटंबना
होताना तू गप्प राहिलास?
कटकारस्थान करुन पांडवांना
लाक्षागृहात जाळण्याचा डाव रचला गेला,
तो या राजप्रासादातच ना?
या भिंतींनी तुला काहीच सांगितलं नाही?
इतकं घडूनदेखील धृतराष्ट्रा,
तू बोलत का नाहीस?
तू जन्मांध आहेस की
जन्मादारभ्य मुका? की…
सपशेल बहिरा?’’
वासुदेवाच्या वाक्ताडनाने
हताहत झालेला महाराजा
मूकपणे स्फुंदू लागला,
अंत:पुरातील काळोखात
त्याचे उष्ण उसासे ऐकू आले,
काळोखातच विरुन गेले…
काळोख दाटून येत होता,
भिंतीवर प्रतिहारींच्या सावल्या
हलू लागल्या होत्या, तेव्हा
वासुदेवाने किंचित चिडून विचारले,
‘‘आताही काही बोलणार नाहीस का?’’
अश्रूंचा बांध आवरुन धृतराष्ट्राने
उपरण्यात शिंकरले आपले वृद्ध नाक,
म्हणाला : ‘‘काय सांगू वासुदेवा?
ही सगळी ऐकिव वृत्ते,
ना शेंडा, ना बुडखा!
द्युत खेळलेच गेले नाही,
द्रौपदीचा यथोचित सन्मान झाला,
लाक्षागृहात पांडव जळलेच नाहीत,
अशीही वृत्ते कानावर आली आहेत,
मी कशावर विश्वास ठेवावा?’’
युगंधर चमकला, मग म्हणाला :
‘‘गांधारीला विचारले असतेस तर?’’
त्यावर धृतराष्ट्र काहीच बोलला नाही,
त्याच्या शेजारच्या काळोख्या आकृतीतून
फक्त उमटली कंकणांची किणकिण,
आणि मौनाचे आणखी एक भाषांतर!
Web Title: Sakal Special Political Dhing Tang Article
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..