esakal | संपादकीय : भाजपचा चक्रव्यूह! 
sakal

बोलून बातमी शोधा

संपादकीय : भाजपचा चक्रव्यूह! 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभेसाठीच्या संग्रामातील बिगुलच फुंकला, असे नव्हे तर भाजपचा "अजेंडा'ही स्पष्ट केला आहे. काश्‍मीरचा मुद्दा त्यात प्राधान्याने आणला जाणार, असे दिसते. त्यामुळे प्रचार लोकांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे वळविण्याचे आव्हान विरोधकांपुढे उभे राहिले आहे. 

संपादकीय : भाजपचा चक्रव्यूह! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सोलापुरात रविवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा जातीने उपस्थित राहणार, हे जाहीर झाल्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती, ती त्या वेळी होणाऱ्या "मेगाभरती'त कोणाकोणाची वर्णी लागणार, याचीच! प्रत्यक्षात खासदार उदयनराजे यांनी या "भरती'कडे पाठ फिरवली आणि धनंजय महाडिक, राणा जगजितसिंह आणि जयकुमार गोरे असे राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील तीन नेते भाजपमध्ये दाखल झाले. मात्र, या "मेगाभरती'पेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे ही संधी साधून शहा यांनी केवळ विधानसभा निवडणुकीचा बिगुलच फुंकला, असे नव्हे तर भाजपचा या निवडणुकीतील "अजेंडा'च स्पष्ट केला.

गेल्या महिन्यात पश्‍चिम महाराष्ट्राला आणि विशेषत: सोलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूर-सातारा आणि सांगलीला महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. त्याचबरोबर देशातील आर्थिक मंदीमुळे उद्योगधंदेही अडचणीत आले असून, अनेकांचे रोजगारही गेले आहेत. एकीकडे हा अतिवृष्टीचा तडाखा आणि त्याचवेळी अन्य काही भागांत पावसाअभावी उभे राहिलेले दुष्काळाचे संकट, या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री वा केंद्रीय गृहमंत्री जनतेला काही दिलासा देतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात या आपद्‌ग्रस्तांवर दोन-चार वाक्‍यांत वाटाण्याच्या अक्षता टाकून, या दोघांनीही आपली भाषणे ही जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द करणे आणि पाकिस्तानला ठणकावणे, यावरच केंद्रित केली. त्यामुळे तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही "घटनेतील कलम 370 आणि 35-अ' यावरच भाजपचा भर राहणार, हे स्पष्ट झाले आहे. 

अमित शहा यांनी आपल्या भाषणात टीकेची अधिक वरची पट्टी ही कॉंग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्यासाठी राखून ठेवली होती आणि पश्‍चिम महाराष्ट्रात होणारी ही मोठी सभा लक्षात घेता, ते अपेक्षितही होते. त्याचे कारण या साऱ्या पट्ट्यात असलेल्या "राष्ट्रवादी'च्या प्रभावात आहे. "कलम 370 बाबत "राष्ट्रवादी' तसेच कॉंग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी!' असे जाहीर आव्हान या वेळी शहा यांनी या दोन्ही पक्षांना दिले. प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी यासंदर्भातील आपली भूमिका गेल्याच आठवड्यात स्पष्ट करून, "सरकारशी आमचे अनेक बाबतीत मतभेद असले, तरी काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, तो आमचा अंतर्गत विषय आहे,' असे ठामपणे सांगितले आहे. तरीही, शहा यांनी नेहमीप्रमाणे पराचा कावळा करण्याच्या आपल्या स्वभावानुसार राहुल यांच्या वक्‍तव्यांचा पाकिस्तान फायदा उठवत असल्याचे जोरात सांगितले. प्रत्यक्षात त्यासंदर्भातही राहुल यांनी स्पष्टीकरण देऊन, पाकिस्तानला अडचणीत आणले आहे.

शहा यांनी "कलम 370'च्या निमित्ताने भावनिक मुद्द्याची फोडणी या निवडणुकीच्या "गोंधळा'ला देण्याच्या भरात "राष्ट्रवादी'च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हे कलम रद्दबातल करण्याच्या प्रस्तावाविरोधात मतदान केल्याचेही ठणकावून सांगितले. सुप्रिया सुळे यांनी शहा यांच्या या दाव्याचा त्वरित इन्कार केला असून, आपण मतदानच न केल्याचे स्पष्ट केले आहे. शहा यांचे हे "रेटून बोलणे' या भाजपच्या गेल्या पाच-सात वर्षांतील धोरणांना अनुसरून होते आणि त्यामुळेच त्यांनी आपली रणनीतीही यानिमित्ताने उघड केली आहे. आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्‍नांकडे वळवण्याचे आव्हान राज्यातील विरोधी पक्षांपुढे आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, यावरच त्यांचे तसेच या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. 

फडणवीस यांनी "मेगाभरती'वरून भाजपची जी काही खिल्ली उडवली जात आहे, त्यास प्रत्युत्तर देताना, हा "शक्‍तिसंचय' असल्याचे या महाजनादेश यात्रेत सांगितले आहे. मात्र, त्यांना त्यांच्याच पक्षातील बडे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच फडणवीसांनीच राजकीय विजनवासात धाडलेले एकनाथ खडसे यांनी उत्तरे दिले आहे. या विधानांमुळे भाजपमध्येच संभ्रम वाढू शकतो. या पक्षबदलूंची संभावना गडकरी यांनी "उंदीर' अशी केली, तर "पक्षांतर करणारे सारेच काही साधू-संत नसतात!' अशी टिप्पणी नाथाभाऊंनी केली आहे! अर्थात, आजघडीला राज्यात भाजपची सूत्रे फडणवीस यांच्याच हाती आहेत, त्यामुळे त्यांचाच शब्द प्रमाण मानावा लागतो. शिवाय, शहा यांनी या वेळी देवेंद्र यांच्या पुढील पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरही या वेळी शिक्‍कामोर्तब केल्यामुळे सतत मुख्यमंत्रिपदाची भाषा करणाऱ्या शिवसेनेलाही मुँहतोड जवाब मिळाला आहे.

आता भाजपच्या या रणनीतीचा विचार करताना आपापल्या पक्षांतून कोण, कोठे गेले, याचा विचार करीत न बसता "राष्ट्रवादी' तसेच कॉंग्रेसला आपली व्यूहरचना आखावी लागणार आहे. अर्थात, भाजपने रचलेला भावनिक व राष्ट्रवादी मुद्द्यांचा चक्रव्यूह हा खऱ्या अर्थाने भूलभूलैया असतो. त्यामुळे त्यातून मतदारांना बाहेर काढत, त्यांना वास्तवाची आणि त्याहीपेक्षा मंदीसदृश स्थितीमुळे सामोऱ्या येणाऱ्या काळ्याकुट्ट भविष्याची जाणीव करून देणे, हेच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यापुढील आगामी निवडणुकीतील मोठे आव्हान असणार, यात शंका नाही. त्यास ते कसे तोंड देतात, ते बघावयाचे! 

loading image
go to top