शनीच्या चंद्रावर जैवरसायन

सम्राट कदम
Saturday, 5 October 2019

परग्रहावरील जैविक अधिवासाचा शोध मानव कित्येक दशकांपासून घेत आहे. गॅलिलीओने दुर्बिणीचा शोध लावला आणि अवकाशात चमकणाऱ्या सूर्यमालेतील ग्रहांचे आणि उपग्रहांचे अस्तित्व माणसाच्या लक्षात आले.

परग्रहावरील जैविक अधिवासाचा शोध मानव कित्येक दशकांपासून घेत आहे. गॅलिलीओने दुर्बिणीचा शोध लावला आणि अवकाशात चमकणाऱ्या सूर्यमालेतील ग्रहांचे आणि उपग्रहांचे अस्तित्व माणसाच्या लक्षात आले. अर्थातच, त्यावरही आपल्यासारखा माणूस राहतो का, जरी जीवसृष्टी नसली तरी तेथे मानवाला राहण्याजोगे वातावरण आहे का, याचा शोध कित्येक दशके वैज्ञानिक घेत आहेत. सूर्यमालेतील सहाव्या क्रमांकाला असलेला आणि ज्याच्या भोवती असलेले वर्तृळाकार कडे लक्ष वेधून घेतात अशा ‘शनी’ग्रहाबद्दल माणसाला आकर्षण आहे. सूर्यमालेत गुरू ग्रहानंतर आकाराने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शनी ग्रहाला चक्क ६२ चंद्र आहेत! त्यापैकी ‘एन्सेलाडस’ नावाच्या चंद्रावर चक्क बर्फाच्या स्वरूपात पाणी आढळते! नासाच्या अवकाशयानाने शनीच्या या उपग्रहावर पाणी असल्याचे २००८ मध्ये शोधले आणि नुकतेच येथे सेंद्रिय संयुगे आढळल्याची पुष्टी शास्त्रज्ञांच्या वतीने करण्यात आली आहे. 

नासाच्या ‘कॅसिनी’ अवकाशयानाने शनी ग्रहाची त्याचबरोबर त्याच्या उपग्रहांची छायाचित्रे आणि इतर निरीक्षणे घेतली आहेत. त्यावरूनच जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘एन्सेलाडस’ उपग्रहावरील फवाऱ्यातून मनुक्‍याच्या आकाराचे सेंद्रिय संयुगांचे खडे बाहेर पडत असल्याचा शोध लावला आहे. कॅसिनी अवकाशयानावर असलेल्या ‘कॉस्मिक डस्ट ॲनालायझर’ या अवकाशीय धुळीचे विश्‍लेषण करणाऱ्या संयंत्राने ही निरीक्षणे घेतली आहेत. यासंबंधीचा शोधनिबंध दोन ऑक्‍टोबरला ‘मंथली नोटीस ऑफ रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे. ‘एन्सेलाडस’ नावाच्या उपग्रहावर बर्फाचे आच्छादन आहे. त्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या महासागरातून बर्फाच्या चादरीच्यावर ‘द्रवा’चे अथवा पाण्याचे फवारे बाहेर येतात. या उपग्रहाची ग्रहणाच्या कालावधीत काही छायाचित्रे घेण्यात आली. त्यात मिळालेल्या फवाऱ्यांच्या छायाचित्र निरीक्षणावरून हे संशोधन झाले. वैज्ञानिकांच्या चमूने नेतृत्व करणारे संशोधक नोझैर ख्वाजा म्हणतात, ‘‘पृथ्वीवर ज्याप्रमाणे समुद्राच्या तळाशी घडणाऱ्या जैविक अभिक्रियेतून अथवा भूगर्भीय हालचालींतून विविध वायूंचे अथवा लाव्हा रसाचे फवारे बाहेर येतात, त्याचप्रमाणे शनीच्या या उपग्रहाच्या तळात असलेल्या सेंद्रिय आणि हायड्रोथर्मल थरांतून ‘अमिनो आम्ला’चे फवारे बाहेर येत आहेत. पृथ्वीपलीकडील जीवसृष्टीसाठी ‘अमिनो आम्ल’ काय भूमिका बजावेल, याबद्दल आपण अजूनही अनभिज्ञ आहोत; पण हे ‘अमिनो आम्ल’ तयार करणाऱ्या अणू-रेणूंचा शोध घेणे मोठा कठीण प्रश्न आहे. त्यातूनच नवीन रहस्ये बाहेर येतील.’’ ‘एन्सेलाडस’ या उपग्रहावर सापडलेल्या सेंद्रिय घटकांमुळे जीवसृष्टीच्या शोधाची त्याचबरोबर, तिच्या उभारणीसाठी आवश्‍यक माहिती आपल्या हाती लागली आहे. या उपग्रहावर अमिनो आम्ल कसे आले, ते तिथेच निर्माण झाले का, याचे संशोधन जीवसृष्टीच्या शोधासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सजीवांसाठी आवश्‍यक चयापचय प्रक्रियेत ही ‘अमिनो आम्ल’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अमिनो आम्ले ही कार्बनी संयुगे असून प्रथिनांच्या जडणघडणीतील प्राथमिक घटक आहेत. बहुतांशी प्राण्यांच्या चयापचय क्रियेत काही अमिनो आम्ले महत्त्वाची असतात. शरीरातील प्रथिनांमधील अमिनो आम्लांची जोडणी जनुकांद्वारे होते आणि ही क्रिया डीऑक्‍सिरिबोन्यूक्‍लिइक आम्लांद्वारे (डीएन्‌ए) घडून येते. अमिनो आम्लाचे महत्त्व लक्षात घेता, या शोधपत्रिकेचे सहलेखक असलेले जॉन हिलर म्हणतात, ‘‘पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी आवश्‍यक सूक्ष्म आणि विरघळणाऱ्या सेंद्रिय घटकांचा शोध शनीच्या या उपग्रहावर लागला आहे. एन्सेलाडसच्या बर्फाच्या चादरीच्या आत दडलेल्या समुद्रात जीवसृष्टीसाठी आवश्‍यक सेंद्रिय घटकांचा खजिनाच असल्याची शक्‍यता आहे. एकप्रकारे जगण्याच्या दृष्टीने आवश्‍यक रहिवासासाठी हा हिरवा कंदीलच असावा.’’         

बर्फाच्छादित ‘एन्सेलाडस’
शनी ग्रहाचा सहाव्या क्रमांकाच्या या उपग्रहाचा व्यास पाचशे किलोमीटर येवढा आहे. त्यावर असलेल्या स्वच्छ बर्फामुळे सूर्यमालेतील सर्वांत चमकणारा उपग्रह म्हणून तो ओळखला जातो. २००५ मध्ये ‘नासा’ने पाठविलेल्या कॅसीन अवकाशयानाने येथे पाणी, हायड्रोजन, सोडिअम क्‍लोराइड असल्याचा शोध घेतला. उणे १९८ डिग्री सेल्सिअस तापमानामुळे येथे मोठ्या जाडीची बर्फाची चादर आहे. त्याच्या खाली पाणी आणि इतर घटकांचा महासागर दडलेला आहे. वेळोवेळी या जाड बर्फाच्या आच्छादनाला भेदून हायड्रोथर्मल छिद्रातून पाणी फवाऱ्याच्या रूपाने बाहेर पडते. या वेळी त्याचे तापमान ३७० डिग्री सेल्सिअस असते. जून २००८ मध्ये येथे जटिल सेंद्रिय घटक असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते. त्यावर आधारित माहितीच्या आधारे हे नवीन संशोधन करण्यात आले आहे. शनीभोवती दिसणाऱ्या कड्यासाठी एन्सेलाडस उपग्रहांतून बाहेर पडणारे फवारे कारणीभूत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samrat kadam article Saturn moon