स्वतः विकसित केलेली लस घेण्याचे भाग्य | Dr Mihir Metkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Mihir Metkar
स्वतः विकसित केलेली लस घेण्याचे भाग्य

स्वतः विकसित केलेली लस घेण्याचे भाग्य

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

कोरोनाची सर्वप्रथम लस बनविणाऱ्या निवडक संशोधन संस्थांपैकी एक म्हणजे मॉडर्ना कंपनी. अमेरिकेतील या कंपनीने स्वामित्व हक्क मिळवताना दाखल केलेल्या पेटंटमध्ये डॉ. मिहीर मेटकर या मराठमोळ्या शास्त्रज्ञाचा उल्लेख ‘प्रथम शोधकर्ता’ म्हणून केला आहे. लशीच्या मूलभूत संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या शास्त्रज्ञाशी ‘सकाळ’ने केलेली बातचीत...

प्रश्न - मॉडर्ना कंपनीने पेटंटमध्ये तुमचा उल्लेख केला आहे. कोरोनाची लशीच्या संशोधनातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जगभरात कौतुक होत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता? तुमचा आजवरचा शैक्षणिक प्रवास कसा होता?

डॉ. मिहीर मेटकर - एवढ्या कौतुकामुळे खंर तर मी एकीकडे भारावून गेलोय, तर दुसरीकडे संकोचल्यासारखे वाटत आहे. मॉडर्नाच्या लस निर्मितीत माझा सहभाग आहे. पण त्याचबरोबर संपूर्ण कंपनीतील सहकाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. माझ्यापेक्षाही सहकारी आणि कुटुंबीय सध्या जास्त उत्साहित आहेत याचा मला आनंद होतोय. कारण आजवरच्या माझ्या प्रवासात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पुण्यातील गोखलेनगर विखे पाटील स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. तर पदवीपर्यंतचे शिक्षण आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवमाहितीशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान संस्थेत (आयबीबी) पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यास केला. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर, पुणे) काही काळ संशोधन केले. सुरवातीपासूनच मी आरएनए आधारित संशोधनावर माझा भर होता. पुढे या क्षेत्रातील दिग्गज वैज्ञानिक डॉ. मेलीसा मूर आणि जॉब डेकर यांच्या मार्गदर्शनात संशोधन करण्याची संधी मिळाली. २०१८ मध्ये मी अमेरिकेत मॉडर्ना कंपनीत काम सुरू केले. कारण एमआरएनएवर आधारितच वैद्यक संशोधन करणारी ही एक आघाडीची संस्था आहे.

लस निर्मितीत तुमची भूमिका नक्की काय होती?

आम्ही विकसित केलेली लशीचे तंत्रज्ञान हे मेसेंजर रायबोन्यूक्लिइक आम्लावर (एमआरएनए) आधारित आहे. मी मूलभूत जीवशास्त्राचा संशोधक आहे. मॉडर्ना कंपनीमध्ये विशिष्ट प्रथिने विकसित करण्यासाठी आवश्यक एमआरएनए शोधण्याचे आणि त्याची शाश्वतता निश्चित करण्याचे काम माझ्याकडे आहे. मला जेव्हा सांगण्यात आले, की कोरोनाच्या लसीसाठी स्पाईक प्रोटीन विकसित करायचे आहेत. तेव्हा त्यासाठी आवश्यक एमआरएनए निश्चित करण्याचे काम माझ्याकडे होते. अर्थातच यात कंपनीतील सर्वच शास्त्रज्ञांना सक्रिय सहभाग नोंदवला होता.

जगात प्रथमच आरएनए आधारित तंत्रज्ञानातून लशीची निर्मिती आणि वापर झाला. हे ऐतिहासिक आव्हान कसे पार पाडले?

मॉडर्ना कंपनी गेल्या १० ते १५ वर्षांपासून आरएनएवर संशोधन करत आहे. आमच्याकडे सार्स, मर्स आदी संसर्गजन्य आजारांवर संशोधनाचा अनुभव आहे. त्यामुळे कोरोनाची लस विकसित करताना सर्वच गोष्टी आमच्यासाठी काही नव्या नव्हत्या. पण निश्चितच कोरोना विषाणूची रचना आणि वैश्विक साथीच्या पार्श्वभूमीवर हे काम आव्हानात्मक होते. आमच्या सर्व संशोधकांनी ते पूर्ण करत अवघ्या पाच महिन्यांत लशीची निर्मिती केली. जानेवारी २०२०मध्ये आम्ही कोरोनाच्या लसीवर काम करण्यास सुरवात केली होती. वर्षभराच्या आत ही लस बाजारातही आली. लशीच्या आजवरच्या इतिहासात हा मैलाचा दगड असेल.

लस निर्मितीचे आव्हान तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आज तुम्ही याकडे शास्त्रज्ञ म्हणून कसे पाहता?

खरं तर कोरोना आला नसता तर बरं झाले असते. पण जगावर आलेल्या या वैश्विक साथीला रोखण्यासाठी एक खारीचा वाटा उचलता आला याचे मला समाधान आहे. मी मूलभूत विज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उपयोजित विज्ञानातील एवढ्या जलद फायद्याची माझ्या आयुष्यातील पहिलीच घटना असेल. एखाद्या औषधासाठी किंवा लसीसाठी आवश्यक प्रथिने निर्माण करणाऱ्या मेसेंजर आरएनएची निर्मिती करण्याचे माझे काम आहे. आमच्या सहकाऱ्यांनी किंवा सरकारी संस्थांनी लशीच्या मानवी चाचण्या घेतल्या. प्रस्थापित लस तंत्रज्ञानातून विकसित लसी इतकीच किंवा त्याही पेक्षा जास्त प्रभावी लस आम्ही तयार करू शकलो याचे समाधान आहे. वैयक्तीक पातळीवरील आनंदाची गोष्ट म्हणजे. स्वतः तयार केलेली लस स्वतःलाच टोचण्याचे भाग्य मला लाभले. सहसा लशीच्या बाबतीत असे होतेच असे नाही. कारण लशीचे दीर्घकाळ संशोधन आणि चाचण्या चालू असतात.

आरएनए आधारित वैद्यकीय उपचार पद्धती किंवा औषधनिर्मितीचे तंत्रज्ञान जगासाठी नवे आहे. या क्षेत्रातील भविष्याकडे तुम्ही कसे पाहता?

कोरोनामुळे आरएनएआधारीत तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे. कर्करोग, सहव्याधी आदी आजारांसाठी ‘टार्गेटेड ड्रग्स’ शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. फ्ल्यूच्या साथींसाठी दरवर्षी नवी लस विकसित करावी लागते. या तंत्रज्ञानामुळे प्रभावी आणि जलद लस विकसित करणे शक्य होऊ शकेल. भारतातही मूलभूत विज्ञानातील संशोधनावर लक्ष केंद्रित करायला हवे. संशोधन संस्था आणि उद्योगांचे परस्पर सहकार्य वाढले. तर त्यातून या सर्वाना चालना मिळेल, त्याचबरोबर संशोधक पूरक वातावरणाला आर्थिक स्थैर्यही प्राप्त होईल.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणि लसीकरणात भारत म्हणून समाधानकारक कामगिरी झाली आहे का?

हो निश्चितच, आरोग्य सेवांच्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीत आपण चांगले काम केले. अर्थात कुठे काही कमी राहिलेच असणार, त्याचे विश्लेषण करून त्यात सुधारणा करायला वाव आहे. लशीच्या निर्मिती आणि उत्पादनाच्या बाबतीतही देश म्हणून आपण चांगली कामगिरी बजावली. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीच्या पुरेशा मात्रा पोचविणे निश्चितच आव्हानात्मक आहे.

loading image
go to top