दुपटीने वितळला हिमालय

सम्राट कदम
शनिवार, 22 जून 2019

शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिकेने अवकाशात हेरगिरीसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. त्यातील ‘केएच- ९ हेग्झागॉन’या उपग्रहाने भूभागाची टिपलेली छायाचित्रे नुकतीच संशोधनासाठी उपलब्ध झाली आहे. या उपग्रहाने २० डिसेंबर १९७५ रोजी सिक्कीम आणि नेपाळ सीमेवर घेतलेल्या छायाचित्रांमुळे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००० नंतर हिमालयातील हिमखंड आधीपेक्षा दुप्पट वेगाने वितळत आहे, आणि तो दर वर्षागणिक वाढत चालला आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या जोश मौरेर या विद्यार्थ्याच्या नेतृत्वात काम करणाऱ्या संशोधकांच्या शोधातून हे स्पष्ट झाले आहे.

शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिकेने अवकाशात हेरगिरीसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. त्यातील ‘केएच- ९ हेग्झागॉन’या उपग्रहाने भूभागाची टिपलेली छायाचित्रे नुकतीच संशोधनासाठी उपलब्ध झाली आहे. या उपग्रहाने २० डिसेंबर १९७५ रोजी सिक्कीम आणि नेपाळ सीमेवर घेतलेल्या छायाचित्रांमुळे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००० नंतर हिमालयातील हिमखंड आधीपेक्षा दुप्पट वेगाने वितळत आहे, आणि तो दर वर्षागणिक वाढत चालला आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या जोश मौरेर या विद्यार्थ्याच्या नेतृत्वात काम करणाऱ्या संशोधकांच्या शोधातून हे स्पष्ट झाले आहे. हिमालयातील ६५० मोठ्या हिमखंडांचा यात अभ्यास करण्यात आला आहे.

संशोधकांच्या या चमूने १९७० ते २०१६ या कालखंडातील उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला आहे. त्यातून मागील चार दशकांत मोठ्या प्रमाणावर हिमखंड वितळल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, मागील काही वर्षांतच हा दर वाढत चालला आहे. संशोधनामध्ये हिमालयातील १२०० मैलांच्या पट्ट्यामध्ये ही स्थिती आढळून आली आहे. जागतिक तापमानात १९९० च्या दशकात ०.४ ते १.४ अंश सेल्सिअसने जागतिक तापमानात वाढ झाल्याने हिमखंड वितळण्याचा दर वर्षागणिक वाढू लागला. नुकतेच पर्वतरांगांच्या विकसनाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार हिमालयाचाच भाग असलेल्या ‘हिंदुकुश’ पर्वतावरील एक तृतीयांशपेक्षा जास्त बर्फ या शतकाच्या शेवटपर्यंत विरघळून जाईल असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर युरोपातील आल्प्स पर्वतातील हिमखंडसुद्धा तापमानवाढीमुळे वितळत आहे.

हिमालयातील पर्वतांमध्ये कित्येक दशकांपूर्वी खोलवर गाडले गेलेले गिर्यारोहकांचे मृतदेह हिमखंडांच्या वितळण्यामुळे आता दिसू लागले आहे. याच प्रकारची घटना ऑगस्ट २०१३ मध्ये घडली होती. ४५ वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या भारतीय हवाई दलातील सैनिकाचा मृतदेह हिमाचल प्रदेशमधील ‘ढक्का’ हिमखंडावर सापडला होता. तसेच, नेपाळमधील ‘खुंबू’ हिमखंडावर गिर्यारोहकांचे सुमारे तीनशे मृतदेह बर्फ वितळल्यामुळे सापडले आहेत. या विषयी बोलताना नेपाळ पर्वतारोहण संघाचे माजी अध्यक्ष अंग शेरसिंग शेर्पा म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांपासून हिमालयातील विविध पर्वतांवर दशकांपूर्वी गाडले गेलेले गिर्यारोहकांचे मृतदेह सापडत आहेत. आम्ही त्या मृतदेहांना पायथ्याशी घेऊन येत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हिमखंड वितळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हिमालयातील विविध मुक्कामाच्या स्थळांवर मृत्युमुखी पडलेले. बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह आता उघडे पडत आहेत.’’ या सारख्या अनेक घटनांतून हिमालयातील बर्फ वेगाने वितळत असल्याचा भक्कम पुरावा मिळत आहे. संशोधनानुसार सन २००० पूर्वी वर्षाला चार अब्ज टन बर्फ वितळत होता. आता तो दर आठ अब्ज टन प्रतिवर्ष इतका झाला आहे. म्हणजेच वर्षाला सरासरी ०.५ मीटर दराने हिमालय आकुंचन पावत आहे!

हिमालय वितळण्याचे रहस्य आणि धोके
औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर कोळसा, खनिजतेल यांचा वापर झाला. ही सर्व इंधने हायड्रोजन आणि कार्बन यांपासून बनलेली आहेत. म्हणूनच त्यांना ‘हायड्रोकार्बन इंधन’ म्हणून ओळखले जाते. या इंधनाच्या वापरानंतर वातावरणात कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड आणि थोड्याफार प्रमाणावर इतर प्रदूषकांचे उत्सर्जन होते. हवेत मिसळलेला कार्बन इतर कार्बनच्या अणूंसोबत शृंखला तयार करतो. हे करत असताना तो वातावरणात उंचावर जातो. पण, जेव्हा तयार होणाऱ्या शृंखलेचे वजन वाढते, तेव्हा हे सर्व अणू पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागाकडून लंबवर्तुळाकार मार्गक्रमण करत दोन्ही ध्रुवांवर जाऊन पडतात. यातील काही कार्बन उंच असलेल्या हिमालयावरसुद्धा पडतो. कार्बनच्या रासायनिक गुणधर्मानुसार सूर्य प्रकाशातून मिळणारी उष्णता तो शोषून घेतो. पर्यायाने त्या भागातील उष्णता वाढते. यालाच ‘हरितगृहवायू परिणाम’ असेही म्हणतात.
हिमालयातील बर्फ वितळत असल्यामुळे तेथील जीवसृष्टीला धोका पोचला आहे. तसेच हिमालयातून उद्‌गम पावलेल्या नद्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या विस्ताराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोमुखही आता मागे-मागे सरकत आहे. म्हणजेच, तेथील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे उगम स्थान आकुंचित पावत आहे. भारतातील मोठ्या भू-प्रदेशाची जीवनदायिनी म्हणून गंगा नदी ओळखली जाते. तिच्या अस्तित्वाबरोबरच तिच्यावर अवलंबून जीवसृष्टीलासुद्धा धोका निर्माण झाला आहे. याच प्रमाणात जर हिमखंडातील बर्फ वितळत राहिला तर, महासागरांच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्यामुळे समुद्रकिनारी असलेली शहरे, बेटे, परिसंस्था पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी पॅरिस कराराची अंमलबजावणी आणि कार्बन उत्सर्जनावर निर्बंध यासारख्या उपाययोजनांतूनच हे पहाडासारखे संकट रोखता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat kadam write Himalayan ice melting at scary levels scitech article in editorial