मंगळावर पाण्याचे साठे

samrat kadam
samrat kadam

ना साच्या ‘मार्स रिकॉनसन्स ऑर्बिटर’ (एमआरओ) या टेहेळणी यानाने २००६ मध्ये मंगळावर पाणी असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लावला होता. सुरवातीला शास्त्रज्ञांना हे पाणी म्हणजे शिल्लक राहिलेले अवशेष असावेत असे वाटले. परंतु या समजाला धक्का देत ‘अमेरिकन भूभौतिक परिषदे’ने ‘नासाच्या ऑर्बिटर यानाने दिलेल्या माहितीवर आधारित नवे संशोधन जगासमोर आणले आहे. त्यानुसार मंगळाच्या उत्तर ध्रुवावर वाळूचे अच्छादन असलेल्या जमिनीखाली १.२ मैलावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याचे आता सिद्ध झाले आहे. हे सर्व पाणी बर्फाच्या स्वरूपात आहे. ‘एमआरओ’च्या रडार स्कॅनिंग संयंत्राने हा शोध घेतला आहे. हा बर्फ वितळल्यास मंगळाच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाच फुटांपर्यंत पाणी साचेल!
मंगळाबद्दल माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल आहे. सर्वांत प्रथम १९७१ मध्ये मंगळाची पाहणी करण्यासाठी ‘मरिनर-९’ या अवकाश यानाने लाल ग्रहाकडे झेप घेतली. त्यानी पाठविलेल्या छायाचित्रांवरून मंगळावर केव्हातरी नदी, तलाव, समुद्र यांसारख्या पाण्याच्या परिसंस्था असल्याच्या खुणा मिळाल्या. त्यानंतर हा शोध अधिक तीव्र झाला. त्यानंतर लगेचच पाठविलेल्या ‘व्हायकिंग प्रोग्रॅम’ने मंगळावर पाण्याच्या पुरामुळे निर्माण झालेले भूपृष्ठीय बदल नोंदवले. त्यात मिसिसिपी नदीपेक्षा दहा हजार पट मोठ्या प्रवाहाच्या खुणांची त्याने पुष्टी केली. त्यामुळे मंगळाच्या भूपृष्ठाखाली बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्‍यता अधिकच बळावली. ‘मार्स पाथफाइंडर’या अवकाश यानाने मंगळावरील तापमानाची आणि वातावरणीय दाबाची निरीक्षणे नोंदविली. त्यानुसार सूर्योदयापूर्वी तेथील तापमान उणे ७८ अंश सेल्सिअस आणि सूर्योदयानंतर उणे ८ अंश सेल्सिअस असते. म्हणजे बर्फापासून पाणी बनण्यासाठी आवश्‍यक शून्य अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा तेथील तापमान पोचत नाही. तसेच वातावरणीय दाब हा अत्यंत कमी आहे.(पृथ्वीच्या तुलनेत ०.६ टक्के) त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी स्थिर राहण्याचा प्रश्‍नच येत नाही.
पुढे २०१२ मध्ये पाठविलेले ‘क्‍युरीओसीटी रोव्हर’ने मंगळावर क्ष-किरणांचा वापराद्वारे तेथील वाळूमध्ये खनिजे असल्याचे सिद्ध केले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तेथील मातीचे परीक्षण करण्यात आले. त्यातून मंगळाच्या मातीत पाण्याची संयुगे, सल्फर, क्‍लोरिन असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाल ग्रहाच्या उत्तर पश्‍चिम भागात १५४ किमी लांब ‘गाले विवरा’ आढळले. त्याच्या खाली शुद्ध पाण्याचा मोठा साठा असून, तेथे सूक्ष्मजीवसृष्टी असल्याची शक्‍यता नासाने व्यक्त केली. ‘क्‍यरीओसीटी रोव्हर’ने मंगळावरील अनेक रहस्ये जगासमोर आणली. पुढे २०१५ मध्ये ‘नेचर’या प्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकाने ‘क्‍युरीओसीटी’ने नोंदविलेली आर्द्रता आणि तापमानातील फरकाची आकडेवारी अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली. त्यामध्ये रात्रीच्या वेळेस पृष्ठभागाच्या पाच सेंटिमीटर जाडीपर्यंत खारे पाणी आढळल्याचे सांगितले आहे. या सर्व मोहिमांमुळे मंगळावर मोठा पाणीसाठा असण्याची शक्‍यता अधिक बळावली. तसेच त्या आधारे कोणत्यातरी स्वरूपात जीवसृष्टीचे अस्तित्व आढळू शकते का, याचा शोध घ्यायला सुरवात झाली. मंगळावरील उत्तर आणि दक्षिण ध्रुव थंडीच्या दिवसांत खोडेसे फुगलेले आणि उन्हाळ्यात काहीसे खपाटीला गेलेले दिसतात. २००४ मध्ये ‘मार्स एक्‍स्प्रेस’ या उपग्रहाने दक्षिण ध्रुवाखाली ३.७ किलोमीटर अंतरावर मोठे हिमनग असण्याची शक्‍यता वर्तविली. यामध्ये ८५ टक्के कार्बन डायऑक्‍साइड आणि १५ टक्के पाणी असल्याचे संशोधन समोर आले. २००८ मध्ये फिनिक्‍स लॅंडरने उत्तर ध्रुवावर आठ लाख २१ हजार घन किलोमीटर आकाराचा बर्फाच्छादित प्रदेश असल्याची शक्‍यता वर्तविली. यातील दोन हजार दोनशे घन किलोमीटर बर्फ पाण्यापासून बनलेला असण्याची शक्‍यता पुढे आली. एकंदरीत आजपर्यंत झालेल्या संशोधनानुसार मंगळावरील ध्रुव पृथ्वीवरील ध्रुवांप्रमाणेच पाणीदार आहे. पण हे पाणी मंगळावरील जीवसृष्टीचे कोडे सोडवते का, ते बघावे लागेल.

मंगळावरील जीवसृष्टीची शक्‍यता
पाणी हा जीवनाच्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. मंगळावर पाण्याचे अनेक पुरावे मिळाल्यामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध अधिक बळावला. परंतु मंगळावरील तापमान, आर्द्रता, वातावरणीय दाब जीवसृष्टीला पूरक नाही. त्यामुळे भूपृष्ठावर सूक्ष्मजीव आढळण्याची शक्‍यता नसल्यात जमा आहे. परंतु भूपृष्ठाखालील बर्फाच्या महासागरात ही शक्‍यता शास्त्रज्ञ सध्या पडताळून पाहत आहेत. परंतु बर्फाच्या स्वरूपात असलेले पाणी वातावरणीय दाबामुळे भोवतालच्या हवेत मिसळत नाही. पर्यायाने जिवसृष्टीसाठी आवश्‍यक आर्द्रयुक्त वातावरण निर्माण होणे दुरापास्तच आहे. मात्र नव्याने शोधण्यात आलेल्या बर्फाच्या महासागरामुळे मंगळावर जीवसृष्टी होती का? किंवा भविष्यात निर्माण होण्याची शक्‍यता आहे का, याबद्दल अनेक खुलासे होतील. नुकतेच रोव्हरच्या ‘ब्लॅक ॲण्ड व्हाइट नेव्हिगेशन कॅमेरा’ने १७ मे २०१९ ला मंगळावरील पाण्याच्या ढगांचे छायाचित्र टिपले आहे. त्यामुळे मंगळावरील पाण्याच्या शोधाला वेगळीच कलाटणी भेटली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com