तम निशेचा सरला...

कोरोनाने निर्माण केलेले मळभ आणि निरुत्साहाला दूर सारत आपण चैतन्यपर्व साजरे करत आहोत. आशेचा दीप आणि कर्तृत्वाची धमक यांच्या बळावर आव्हानांचे संकट निश्‍चित पार करू.
तम निशेचा सरला...
तम निशेचा सरला...sakal

कोरोनाने निर्माण केलेले मळभ आणि निरुत्साहाला दूर सारत आपण चैतन्यपर्व साजरे करत आहोत. आशेचा दीप आणि कर्तृत्वाची धमक यांच्या बळावर आव्हानांचे संकट निश्‍चित पार करू.

फार दिसांनी घरी आलेल्या माहेरवाशिणीची जोडवी अंगणात चटचटल्यावर साऱ्या घराला जसे स्वागतभावनेने उचंबळून यावे, तशी काहीशी मनस्थिती यंदाच्या दिवाळीत साऱ्यांची झाली आहे. यावेळी आलेली दिवाळी बराच उशीर करुन आल्यागत वाटते आहे. गतसाली दीपावलीचे स्वागत म्हणावे तसे झाले नव्हते. रुग्णाईत अवस्थेत कंदिल नि पणत्या लावण्याचा, रांगोळ्या काढण्याचा, फराळाचे पदार्थ करण्याचा उसना उत्साह आणायचा तरी कुठून? एकंदर उसनवारीनेही तेव्हा शीग गाठली होतीच. उपचारापुरती दिवाळी पार पाडून माणसे आपापल्या परीने जगू लागली होती. यंदा मात्र नाही म्हणायला थोडा हुरुप आहे. आजारातून उभे राहिलेले माणूस, शरीरात जसजशी शक्ती भरते, तसतसा संयत उत्साह दाखवू लागतो. त्यात जीवनासक्तीची उभारी असतेच, पण जीवघेणे संकट टळल्याचा सुस्काराही अनुस्यूत असतो. यंदाची दिवाळी ही त्या अर्थाने सुटकेची दिवाळी आहे. ‘तम निशेचा सरला...’ असाच सुरेल संकेत या दिवाळीने दिला आहे. म्हणूनच खिशात फारसा अडका नसतानाही निराश न होता माणसे बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. अर्थचक्राच्या आऱ्या मोडल्यागत झाल्या होत्या. डागडुजी करुन ते चक्र पुन्हा कामचलाऊ का होईना, पण फिरते करण्याचा खटाटोप सुरु आहे. जणू सारे विश्व स्वत:लाच ‘ऑल इज वेल’ असा धीर देत आहे, असा भास होतो. बाजारपेठेतही खरेदीचा सुकाळु नसला तरी अगदीच काही ‘दिवाळे’ वाजलेले नाही, याची सुलक्षणे दिसू लागली आहेत. गेल्या महिन्यात देशात सवा लाख कोटींहून अधिक वस्तुसेवा कराची रक्कम जमा झाली, हे लक्षण काय सांगते? खरे तर संकट मोठे होते. गाठ भयंकराशीच होती. होत्याचे नव्हते होता होता जिवानिशी वाचले. पण आता दिशाकोन पुन्हा उजळू लागले आहेत. त्याचाच आनंद यंदाच्या दीपोत्सवात साकळला आहे.

बदलत्या काळासोबत दिवाळीचा सणही बदलत गेला. पूर्वीच्या काळी दिवाळीचे दिवस आल्याची वर्दी घराघरातून येणाऱ्या खमंग स्वादगंधातून मिळत असे. नव्या कपड्यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये सहकुटुंब गर्दी होत असे. फार पूर्वी नव्हे, अगदी आत्ताआत्तापर्यंत लोक आप्तेष्टांना सुंदरशी शुभेच्छाकार्डे पाठवत असत. काही उत्साही लोक तर स्वत:च्या हाताने चित्रेबित्रे काढून ही शुभेच्छाकार्डे तयार करत. दिवाळीची सुटी लागलेली बच्चेकंपनी हुंदडणे आवरते घेऊन किल्ला वगैरे करत असत. पहाटे तीनच्या सुमारासच दाणकन पहिला फटाका फुटत असे. नव्याने परणून गेलेली माहेरवाशीण पहिल्या दिवाळसणासाठी घरी आली की शेजारपाजारचेही मनापासून आनंदून जात असत. आता जमाना बदलला. चकली, शेव चिवड्यासारखे फराळाचे पदार्थ बारमाही झाले. बारमाही म्हणजे अक्षरश: ‘बार’माही! नवे कपडे तर हल्ली घरबसल्या ऑनलाइनच चांगले मिळतात म्हणे. शुभेच्छांची देवाणघेवाण बव्हंशी ‘व्हॉट्सॲप’ संदेशातूनच होते. चित्रे काढणे तर फारच दुर्मीळ झाले. शहरगावातल्या बाळगोपाळांना तर ‘किल्ला म्हणजे काय’ इथपासून सारे सांगण्याची वेळ आली आहे. इतकेच काय, त्यांना ‘बाळगोपाळ’ असे संबोधतानाही जीभ अडते. बहुमजली इमारतींमध्ये राहणारी ही मुलेमुली किल्ला करणार तरी कुठे आणि कसा? शिवाय मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्याचे मार्ग बदलले की आपोआप संस्कारांचे प्रवाहदेखील बदलत असतात. नेमके तेच संक्रमण समाजामध्ये सध्या घडताना आपण पाहातो आहोत. त्यात वावगे असे काहीही नाही. दिवाळीचे बदललेले स्वरुप बघून जुन्या पिढीला ‘जुने काही’ आठवणे साहजिक आहे. ‘आमच्या वेळची दिवाळी‘ आणि ‘तुमच्या वेळची दिवाळी’ असा एक सांस्कृतिक कलगीतुरा त्या निमित्ताने समाजमाध्यमांवर रंगत असतो. स्मरणरंजन हादेखील एक रंजनाचाच प्रकार असल्याने तेही ठीकच.

एका वर्षाच्या दीर्घ विश्रामानंतर पुन्हा एकदा नाट्यगृहे आणि सभागृहे अर्धीमुर्धी का होईना, भरु लागली आहेत. गेल्या वर्षी अनेक रसिकांसाठी ‘दिवाळी पहाट’ ऑनलाइनच उजाडली होती. यंदा काही ठिकाणी संगीताच्या मैफली जमल्या आहेत, हे ही नसे थोडके! या निमित्ताने नव्या पिढीच्या कानावर काही चांगलेचुंगले सूर पडत राहतात. जुन्याची नव्याने ओळख होते. नव्या गुणीजनांच्या पाठीवर बुजुर्गांची खरीखुरी थाप पडते. हे सारे हवेहवेसेच असते. अर्थात, ‘दिवाळी पहाट’ निम्म्या नाट्यगृहापुढे ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावायचा म्हणजे अर्ध्या रिकाम्या ग्लासाला अर्धा भरलेला ग्लास म्हणण्यापैकीच आहे, हे मान्य. पण तेवढी कळ तूर्त तरी सोसायला हवी. थोडे निर्बंध पाळायलाच हवेत. या निर्बंधांमध्ये एक निर्बंध आपण स्वत:हून लादून घ्यायला हवा, तो म्हणजे फटाके उडवण्याचा. लक्ष्मीपूजनाची सांज गाजवणारे हे फटाके प्रदूषणकारी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीशीच प्रतारणा करणारे असतात, याचेही ज्ञान आता झाले आहे. अवघे जग प्रदूषणापासून मुक्तता मिळवण्यासाठी धडपडते आहे. जीवाश्म इंधनावरचे अवलंबित्त्व कमी करण्याचा खटाटोप करते आहे. आपलाही त्यात खारीचा वाटा असायला काय हरकत आहे? सृष्टीला सांभाळले तर तीदेखील आपल्याला सांभाळते. ‘उदयाद्रीवर लक्ष ‘उद्यां’ची पहाट मंथर जागत आहे, तुझ्याचसाठी लाख रवींचे गर्भ सुखाने साहत आहे...’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या काव्यओळी आज अधिक गहिरा अर्थ घेऊन आल्यासारख्या वाटतात, ते त्यामुळेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com