चर्चा पाक-इस्राईल संधानाची

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यांच्यापाठोपाठ तुर्कस्तानने इस्राईलशी संधान साधले आहे. त्याच वाटेवर पाकिस्तान असल्याची चर्चा आहे.
pakistan and israel
pakistan and israelsakal
Summary

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यांच्यापाठोपाठ तुर्कस्तानने इस्राईलशी संधान साधले आहे. त्याच वाटेवर पाकिस्तान असल्याची चर्चा आहे.

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यांच्यापाठोपाठ तुर्कस्तानने इस्राईलशी संधान साधले आहे. त्याच वाटेवर पाकिस्तान असल्याची चर्चा आहे. पण कडव्यांचा याला विरोध असल्याने शाहबाज शरीफ सरकार अडचणीत येऊ शकते.

पाकिस्तानमध्ये दोन महिन्यांपूर्वी सत्तारूढ झालेले पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि इतर छोट्या पक्षांच्या सरकारमधील पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची अवस्था तूर्तास आगीतून फुफाट्यात अशी होताना दिसते. सत्ता गमावल्याने सैरभैर झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारला घाम फोडला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील अनेक शहरात मोठमोठ्या सभांद्वारे शरीफ यांचे सरकार कसे अमेरिकेचे बाहुले बनलेले आहे, या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानच्या जनतेची अमेरिकेबाबतची टोकाची नाराजी इम्रान खान यांनी ओळखली आहे. देश सध्या कटोरास्तान झाला आहे. नेहमी मदतीचा हात देणाऱ्यांपैकी सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती यांनी तोंड फिरवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काही अटी-शर्तींवर कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण अटी-शर्ती स्वीकारणे म्हणजे करसंकलन वाढवणे. आत्ताच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकणे म्हणजे त्यांची नाराजी ओढवणे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) घातलेल्या अटी-शर्तींची टांगती तलवार आहेच.

कसाबसा वर्षाचा कार्यकाळ विद्यमान सरकारला मिळेल. त्या वर्षभरात सामान्य पाकिस्तानींची नाराजी ओढवणे म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पराभूत होणे, हे ओघाने आलेच. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी शरीफ सरकारची अवस्था आहे. तिथे पेट्रोल १८० पाकिस्तानी रुपये प्रतिलिटर आहे. लोक संतप्त आहेत. आधीच एक अमेरिकी डॉलरसाठी २०५ पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत.ही घसरगुंडी चालूच आहे. परिणामी, महागाईचा आगडोंब आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाईही आहे. सध्याचा आश्रयदाता चीनही पाकिस्तानला अजून कर्ज देण्याच्या मनस्थितीत नाही. अमेरिकेत राहणाऱ्या पण मूळ पाकिस्तानी असणाऱ्या काही लोकांनी एका स्वयंसेवी संस्थेतर्फे इस्राईलचे अध्यक्ष इसाक हरजोग यांची जेरुसलेम येथे जाऊन भेट घेतली. त्याची माहिती इस्राईलच्या अध्यक्षांनीच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिसंवादात दिली. पण शाहबाज शरीफ यांनी या भेटीशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही, असे सांगितले.

मित्रदेशांचे अनुकरण

कोणीही पाकिस्तानमधून या भेटीसाठी गेले नव्हते, असा खुलासा शाहबाज शरीफ यांनी केलेला आहे. हे सर्व पाहता शरीफ यांना अडचणीत आणण्यासाठीच ही भेट घडवली गेली का? असे पाकिस्तानी माध्यमात बोलले जाते. पाकिस्तानने अजूनही इस्राईलला राजनैतिक मान्यता दिलेली नाही. या दोन्ही देशांचे राजदूतावास परस्परांच्या देशात नाहीत. हे पारपत्र इस्राईल सोडून इतर सर्व देशांसाठी पात्र आहे, असे पाकिस्तानच्या पारपत्रावर (पासपोर्टवर) नमूद असते. यहुदी लोकांबद्दल सामान्य पाकिस्तानींच्या मनामध्ये राग आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके तर इस्राईलला मनसोक्त शिव्याशाप देत असतात. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात या दोघांनीच आता इस्राईलबरोबर जुळवून घेतले असे नसून पाकिस्तानच्या लाडक्या तुर्कस्ताननेही आता इस्राईलबरोबर प्रेमाचा वार्तालाप सुरू केला आहे. बहारीन, इजिप्त, ओमान यांनीही इस्राईलबरोबर राजनैतिक संबंधात आघाडी घेतलेली आहे. तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेवलुत काऊसोग्लू यांनी नुकतेच इस्राईलबरोबर बोलणी केल्याचे जगाने बघितले. तुर्कस्तानही सध्या वेगाने दिवाळखोरीकडे जात आहे. तो देशही आर्थिक मदतीसाठी सर्व मार्गांचा अवलंब करताना दिसतो.

कडव्या पाकिस्तानींचा विरोध

परवेझ मुशर्रफ ते इम्रान खान या तेथील राज्यकर्त्यांना मनातून इस्राईलशी राजनैतिक संबंध जोडायची इच्छा होती, असे सांगितले जाते. पण पाकिस्तानमधील कडव्या गटांचा प्रचंड विरोध लक्षात घेता तेथील कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना हे शक्य झाले नसावे. पंतप्रधान शरीफ इस्राईलबरोबर राजनैतिक संबंध जोडण्यासाठी आतुर आहेत, असा इम्रान खान आरोप करत आहेत. पण याच इम्रान खान यांच्या कार्यकाळात त्यांनीही मागील दाराने इस्राईलबरोबर चर्चेचा प्रयत्न केला होता.

पाकिस्तानची दुसरी अडचण म्हणजे इस्राईलबरोबर राजनैतिक संबंध जोडणे म्हणजे पाकिस्तानच्या शेजारी देशाला, म्हणजे इराणला नाराज करणे हाही आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये इस्राईलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे ओमानहून तेल अवीवला परतताना वाटेत इस्लामाबादला थांबले होते आणि त्यांची पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबर चर्चाही झाल्याचे बोलले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com