
धार्मिक कट्टरतेतून मानवतेची हत्या होत असते. भारतातील अलीकडच्या काही घटनांनी पुन्हा एकदा त्या विदारक वास्तवाची जाणीव करून दिली आहे.
उदयपूर ते अमरावती
धार्मिक कट्टरतेतून मानवतेची हत्या होत असते. भारतातील अलीकडच्या काही घटनांनी पुन्हा एकदा त्या विदारक वास्तवाची जाणीव करून दिली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याला अनुकूल मत व्यक्त केले म्हणून राजस्थानातील उदयपूर येथे टेलरची गळा चिरून हत्या करण्यात आली. हे क्रौर्य कुणाही सुजाण मनाला अस्वस्थ करेल.त्या धक्क्याचे पडसाद उमटत असतानात महाराष्ट्रातील अमरावती येथे अशाच प्रकारे झालेली हत्याही याच विषयावरून झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेेथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांचीही दहा दिवसांपूर्वी गळा चिरून हत्या झाली होती. २१ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने झालेला गुन्हा असल्याचे पोलिसांना वाटत होते. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे धाव घेत केंद्रीय तपासाची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत एनआय तपास जाहीर केला. एनआयएच्या एका पथकाने अमरावतीत दोन दिवस तपास केला. कोल्हे यांची हत्या त्यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या रागातून झाल्याचे स्थानिक पोलिसांनी या तपासानंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. व्हाट्सअॅपवरून जी पोस्ट कोल्हे यांनी शेअर केली होती, ती पोस्ट समाज माध्यमावरून हटविण्यास त्यांच्या मित्रांनी सांगितले होते. त्यांनी ती पोस्ट हटवलीही होती.
अमरावती शहरातील ज्या भागात कोल्हे यांचे औषध विक्रीचे दुकान आहे, त्या परिसरातील काहींची त्यांनी माफीही मागितली. मात्र, ही बाब पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली नव्हती, असे आता पुढे येत आहे. या हत्येचा निषेध करावा तेवढा थोडाच होईल. परस्परांची मने कलुषित करणाऱ्या देशातील सध्याच्या गढूळ वातावरणाचाही हा परिपाक आहे. नुपूर शर्मा यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारे वक्तव्य केले, तो औचित्यभंग होता. ती त्यांची चूकच होती. त्याचे समर्थन विवेकी व्यक्ती करू शकणार नाही, हे खरेच. पण शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला म्हणून गळा चिरून हत्या करणे, हा कमालीचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार आहे. त्यामागचे या समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र ओळखून ते हाणून पाडण्यासाठी संपूर्ण समाजाच्या सहकार्याची गरज आहे. केवळ कायदा-सुव्यवस्था यंत्रणांवर भिस्त ठेवणे पुरेसे नाही. धार्मिक उन्माद वाढता कामा नये.
डोकी भडकविणारे बाजूला राहतात आणि त्याला बळी पडतात ते सर्वसामान्य. विशेषतः ही हत्या घडविण्याच्या आरोप असलेले सर्व जण वीस-पंचवीसीतील तरुण आहेत. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवीच. पण या घृणास्पद कृत्यास त्यांना कुणी प्रवृत्त केले, याचीही पाळेमुळे खणून काढायला हवीत आणि सूत्रधारांपर्यंत पोचायला हवे आहे. कट्टरतेच्या वातावरणामुळे सारासार विवेकाने विचार करण्याची क्षमताच हरवते. अशा पोकळीत विखार बळावतो. कट्टरतावाद्यांचे फावते. कोणतीही कट्टरता शेवटी मानवतेच्या विनाशाकडेच नेते हे अटळ सत्य आहे.अशा प्रवृत्तींना आणि धर्माच्या नावावर हिंसेचे समर्थन करू पाहणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. सनसनाटी निर्माण करणारी वक्तव्ये करून झोत स्वतःकडे वळवू पाहणाऱ्या व्यक्ती आणि तो ‘झोत’ देऊ करणारी माध्यमे यांनीही या एकूणच प्रकारातून काही बोध घेतला तर बरे होईल.