esakal | भ्रमंती LIVE : शेवटचा सोबती... 
sakal

बोलून बातमी शोधा

Old man

रक्ताची नाती, प्रचंड पैसा आणि खूप जुनं नातं यापलीकडे जाऊन सहजतेने घडलेला नवा ऋणानुबंध आयुष्याच्या कुठल्या वळणावर तुम्हाला कसा गोडवा देऊन जाईल हे सांगता येत नाही. आजी-आजोबा या गोडव्याचे उत्तम उदाहरण होते. 

भ्रमंती LIVE : शेवटचा सोबती... 

sakal_logo
By
संदीप काळेSandip98868@gmail.com

रक्ताची नाती, प्रचंड पैसा आणि खूप जुनं नातं यापलीकडे जाऊन सहजतेने घडलेला नवा ऋणानुबंध आयुष्याच्या कुठल्या वळणावर तुम्हाला कसा गोडवा देऊन जाईल हे सांगता येत नाही. आजी-आजोबा या गोडव्याचे उत्तम उदाहरण होते. 

पाच जानेवारीपासून दवाखाना आणि त्याभोवती असणारे दुःख मी अनुभवतोय. नयन बाराहाते या माझ्या मित्राला मोठा आजार जडलाय. या आजाराला नयन यांच्या प्रचंड इच्छाशक्तीपुढे नतमस्तक व्हावेच लागेल असे दिसते. नयन यांच्यासाठी मला सतत अंधेरीच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी दवाखान्यात जावे लागते. मी सायलीताई, यामिनी, सुनीता, नयन, डॉ. नितीन जगधने आणि या दवाखान्यातला रूम नंबर १३१५ या सर्वांचे एक घट्ट नाते तयार झाले आहे. 
दररोज फिजिओथेरपी करून नयन यांच्या जीव नसलेल्या हातापायांत जीव आणण्याचे काम काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हळूहळू प्रतिसाद मिळतोही. त्या दिवशी सकाळी नयन यांना दवाखान्यातच फिजिओथेरपी सेंटरमध्ये घेऊन गेलो. फिजिओथेरपी सुरू असताना मला बाजूला एका वृद्ध जोडप्याचा संवाद ऐकू आला. त्या आजी म्हणत होत्या, याचा हात धरून मधुबालाने फिजिओथेरपी केली असती, तर हा आठ दिवसांत उभा राहिला असता. त्यावर ते आजोबा म्हणाले, आठ दिवसांत नाही गं, चार दिवसांत बरा झाला असता. दोघेही जण मोठ्याने हसतात. त्यांच्या संवादावरून हे दोघेही नवरा-बायको असावेत असा अनुमान मी काढला. त्या व्यक्तींची थेरपी झाल्यावर ते आपल्या वॉर्डात गेले. थेरपी करणाऱ्या डॉक्‍टरांना मी म्हणालो, काय कमालीचे जोडपे आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉक्‍टर माझ्या परिचयाचे होते, ते म्हणाले, हे जोडपे नाही, हे मित्र आहेत. यांची मैत्री याच दवाखान्यात झाली. म्हणतात ना, उतरत्या वयात कुणी तरी मनासारखा जोडीदार पाहिजे? या दोघांची सगळी कहाणी मला डॉक्‍टरांनी सांगितली. डॉक्‍टर गेले, पण माझ्या डोक्‍यातून त्या दोघांबद्दलचा सुरू असलेला विचार काही जाईना. त्यांना भेटले पाहिजे, हा विचार मनात सुरू होता. 

त्या जोडप्याची सगळी माहिती काढली आणि त्यांच्याकडे पोहोचलोही. थोड्या वेळापूर्वी भेटलेल्या डॉक्‍टरांनी सांगितलेली ती सगळी कहाणी माझ्या डोळ्यासमोर येत होती. कुणाचाही आधार नसलेले हे आजी-आजोबा हॉस्पिटलमधल्या एका रूममध्ये बाजूबाजूला उपचार घेत असतात. एक महिना उपचार घेतल्यावर आजीला सुट्टी मिळते. आजोबांवर मात्र अद्यापही उपचार सुरू असतात. या एक महिन्याच्या कालावधीत या दोघांची खूप घट्ट मैत्री होते. आजी रुग्ण म्हणून त्या दवाखान्यातून डिस्चार्ज घेते, पण एक  मित्र म्हणून ती अजूनही त्याच आजोबांच्या रूममध्ये त्या आजोबांना कंपनी देत तिथेच राहते. आपसूकच निर्माण झालेल्या नात्यांमध्ये एवढी ताकद कशी येते? खरे तर हा प्रश्‍न माझा मलाच पडला होता.

मी आजी-आजोबाला नमस्कार करत आत प्रवेश केला. त्या दोघांनाही मी माझी ओळख सांगितली. तुमचा संवाद मी ऐकला, तो मला कसा भावला अशी विषयाची सुरवात करत मी त्यांच्याशी बोलायला लागलो. आजी म्हणाली, अरे उभा का बस ना...! आजीच्या बोलण्यात मायेचा ओलावा आणि आजोबांच्या बोलण्यात धाडसीपणा जाणवत होता. 

मी ज्या ८५ वर्षांच्या आजींशी बोलत होतो, त्या पार्ल्यात राहणाऱ्या श्रद्धा भाले. एका नामवंत बॅंकेच्या मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाल्यात. नव्वदीच्या आसपास असणारे आजोबा समीर रहाटकर कर्नल म्हणून सेवानिवृत्त झालेत ते डोंबिवलीत राहतात. कर्नलची दोन्ही मुलं डॉक्‍टर. अमेरिकेत स्थायिक झालीत. आता ते एकटेच राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. आजीला मूलबाळ नाही. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या यजमानांचे निधन झाले. हे दोघेही जण गंभीर आजाराला घेऊन दवाखान्यात आले. ना कोणी सोबत, ना कुणाचा आधार. दवाखान्यात दोघांचे बेड आजूबाजूला. सुरवातीला ओळख झाली आणि मग एकदम घट्ट मैत्री. आता आजी आजोबाला सम्या म्हणते आणि आजोबा आजीला भालू. 

आजी मला सांगत होत्या, आपले हातपाय जेव्हा थकून जातात, आपल्याकडील पैसा थोडा थोडा कमी व्हायला लागतो, तसे नातेवाईक आस्थेने विचारपूस करणं ही थांबवतात. आजोबा मध्येच म्हणतात, दूरचे नातेवाईक सोड गं मी महिन्याभरापासून दवाखान्यात आहे, मुलांनी अकाउंटमध्ये गडगंज पैसा टाकला, पण आठवड्यातून एकदा फोन करावा. काय करायचं पैशाला, संपत्तीला? आपली मुलं आपली एकदोन वेळा विचारपूस करू शकत नाहीत. तीन वर्षांपूर्वी नातवाचं तोंड पाहिलं होतं. आता तो केवढा झाला असेल. मला ओळखेल की नाही काय माहीत. आजी आजोबांचे डोळे पुसत म्हणाली, सम्या तुला आवडणारी सिस्टर आली बघ. रडणाऱ्या आजोबाच्या चेहऱ्यावर आजीच्या बोलण्याने एकदम स्मितहास्य येते. 

प्रेम आणि आपुलकीने माणसामाणसांत कायमस्वरूपी घट्ट नाते निर्माण का होते त्यामागे एकच कारण असू शकते... ते म्हणजे ही आपल्याला समजून घेईल, हा आपली काळजी घेईल. प्रसंगी आपल्या मदतीला येईल या भावनेतूनच. चांगल्या मैत्रीतून फुललेल्या नात्याचा आनंद मला त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसरीकडे कुणी कायमस्वरूपी आधार नाही म्हणून डोळ्यात असणाऱ्या अतृप्त भावनेच्या अश्रूचा पाझर कायम सुरू होता. माझे डोळे सर्व बारकावे टिपत होते. मी हसत आजी-आजोबांचा निरोप घेऊन नयन यांच्या रूममध्ये गेलो. नयन झोपले होते. नयनचा हात घट्ट हातात धरून, नयनच्या हातावर मस्तक टेकवत मी शांतपणे अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माझंही त्या आजी-आजोबांसारखं झालं होतं. चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात दुःखांचे प्रचंड अश्रू...

मोठी केस स्टडी 
आमच्या गप्पा, त्यांचं मध्येच हसणं, मध्येच रडणं, सत्ता संपत्ती, नातेवाईक यांच्याबद्दलचा सखोलपणे होणारा संवाद. दवाखान्याच्या बाहेर पडल्यावर दोघांनी मिळून काय काय करायचं त्याचं दोघांचं चाललेलं नियोजन मी सगळं काही थक्क होऊन बघत, ऐकत होतो. हे दोन्ही आजी-आजोबा माझ्यासमोर एक मोठी केस स्टडी होते. 

Edited By - Prashant Patil

loading image