भ्रमंती LIVE : सन्मानाच्या वाटेवर..!

Vegetable
Vegetable

भौतिक सुखसुविधेसाठी नको असलेले फालतू साखळदंड आपण स्वत:भोवती अनेक वेळा लादून घेतो का? कोरोनासारख्या माहामारीने अनेकांचा जीव घेतला हे खरे होते; पण अनेकांच्या आयुष्यातला सन्मान, संवाद परत आणून दिला. 

‘त्या’ दिवशी सकाळी-सकाळी परवेज खान यांचा मला दूरध्वनी आला. डोक्यामध्ये एकदम क्लिक झालं. आपल्याला आज मीटिंगला जायचं आहे. परवेजला घेऊन धारावीत आलो. मागच्या दोन महिन्यांपासून पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही संशोधनाचं काम करत होतो. त्याच अनुषंगाने आम्ही धारावीला जात होतो. धारावीला सूरज पाटील नावाचा एक पत्रकार मित्र वाट बघत थांबला होता. आम्ही पायीच पुढं पुढे निघालो. रस्त्याच्या एका बाजूला छोटा भाजीपाला बाजार होता. तिथं भाजीपाला विकणाऱ्या जवळजवळ सर्व महिला होत्या. बहुतांशी बायका नटूनथटून माणसांच्या बाजारात ‘धंदेवाईक स्वरूप` आणू पाहणाऱ्या महिला होत्या. सूरज म्हणाला, आपल्या सौंदर्याच्या जिवावर वाट्टेल ते करणाऱ्या या महिला आता तराजू हातात घेऊन भाजीपाला विकत आहेत. कोलकात्याची मीनाकुमारी मिश्रा, बिहारची मीरा रॉय, आणि उत्तर प्रदेशची दीप्ती पांडे यांही सूरजने ओळख करून दिली. मी मीनाकुमारीबरोबर बोलायला सुरुवात केली.

तोंडामध्ये असलेलं अर्धं पान खाली थुंकत नथनीचा नाकात रुतलेला थोडा भाग सरळ करत, अर्धी हिंदी मध्येमध्ये मराठीचे शब्द फेकत मीनाकुमारी माझ्याशी बोलत होती. सुरुवातीला ‘हो-नाही` एवढंच उत्तर ती घरचा विषय काढला, तेव्हा ती खुलून बोलायला लागली. ‘मी चौदा वर्षाची असेल, तेव्हा तुला नोकरीला लावते, असं म्हणून काकूने मला मुंबईला आणलं. दोन-तीन वेळा, ती एका माणसाला हा माझा नवरा आहे, म्हणून गावी घेऊन आली. मी जेव्हा मुंबईत आले, तेव्हा तो ‘नवरा’ मला भेटला. तू काकूचा नवरा आहेस ना? असं विचारल्यावर तो म्हणाला, दीदीजी, मला जी कुणी महिला दिवसाप्रमाणे पैसा देईल, तिच्यासोबत मी चार-पाच दिवस किरायाचा नवरा बनून जातो. आठ-पंधरा दिवसांमध्ये मला काकूंच सगळं काही कळलं. मी नर्व्हस झाल्यावर, काकू म्हणाली, मी इथे काम करते म्हणून, गावात बसून दहा माणसं खातात. तुला वाटत असेल हे चुकीचं आहे, तर तू हे काम करू नकोस. पण गावी कुणाला सांगू नको. काकूचा प्रवास मीनाकुमारीच्या आयुष्यातही आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमचा संवाद सुरू असताना एक ग्राहक तिथे आला. भाजीपाला देऊन त्याला सुटे पैसे देण्यासाठी तिनं आपली पर्स काढली. त्यात एका बाई आणि एका छोट्या मुलीचा फोटो होता. ती म्हणाली, एक माझ्या आईचा आणि एक माझ्या मुलीचा. त्या कुठं  आहेत, असं खोदून विचारल्यावर मीनाकुमारी म्हणाली, मुंबईत लॉकडाऊन जाहीर झालं, आणि पंधरा दिवसानंतर मला आई गेल्याचा गावाकडून निरोप आला. त्या दिवशी मी आईचा अंत्यसंस्कार मोबाईवरून पाहिला. जन्म देणाऱ्या आईच्या अंत्यविधीला जाऊ शकलो नाही, हे किती धक्कादायक आहे. हे ऐशाराम, भौतिक सुखाने ह्या आपल्या मुक्त आयुष्याला साखळदंडाने बांधलेलं आहे. त्याची अनुभूती मला पहिल्यांदा आली. ‘आपल्याला हवा तो हवा तसा स्पर्श मिळावा, यासाठी वाटेल तो मोबदला देणाऱ्या माणसांचा स्पर्श किळसवाणा वाटायचा; पण आता भाजीपाल्याच्या बदल्यात हातावर चार पैसे टेकवणाऱ्या त्या प्रत्येक माणसाच्या स्पर्शाला ‘आपुलकीचा गंध’ चिकटलेला असतो, मीनाकुमारी मला सांगत होती. फोटोमधल्या लहान मुलीबाबत विचारुनही तिने काही सांगितलं नाही. काय समजायचं ते मी समजलो. 

मी मीनाकुमारीनंतर मीरा आणि दीप्तीला विचारलं, तुमच्यासोबत असणाऱ्या बाकीच्या मैत्रिणी आता काय काम करतात. मीरा म्हणाली, काही गावी गेल्या, काही भाजीपाला विकतंय, कुणी वडापाव विकतंय. तुम्ही का नाही गेलात गावी, असं विचारल्यावर ती अगदी शांतपणे म्हणाली, घरी तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही. जवळ जवळ मीनाकुमारीसारखीच या दोघींची कहाणी.  

मी निघालो, पण मनात अनेक प्रश्न कायम होते. भौतिक सुखसुविधेसाठी नको असलेले फालतू साखळदंड आपण स्वत:भोवती अनेक वेळा लादून घेतो का? खूप दिमाखात जगण्याच्या नावाखाली आयुष्याचा खरा आनंद पायदळी तुडवतो का? आई, मुलगी माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हत्या. अशी कितीतरी दु;ख पचवून पुढे जाणाऱ्या ह्या महिलांना ऐवढी ताकद येते कुठून? पुरुष बिचारे छोट्या छोट्या विषयाला घेऊन आत्महत्या करावी, असे विचार मनात आणतात. असे का होत असेल? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मला मिळत नव्हती. तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील ना...?

सहजपणे प्रचंड पैसा हातात आला, तर आपण घामाचे मूल्य विसरून जातो. असं माझ्यासारख्या कित्येक महिला-मुलींच होत असेल. कोरोनासारख्या साथीच्या आजाराने आम्हाला एकदम जमिनीवर आणलं. आपण जिवंत राहिलं पाहिजं, एवढचं वाटायला लागलं. आता करायचं काय, हा प्रश्न निर्माण झाला. तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणतो, असं म्हणणाऱ्या अनेकांना मी या कोरोनाच्या काळात, बाबा, तू एकवेळच्या जेवणाची व्यवस्था कर, असं म्हणण्याची वेळ आली. ताटकळत मरत जगण्यापेक्षा काही तरी केलं पाहिजे. हा विचार समोर आला आणि त्यातून भाजीपाल्याचे दुकान थाटले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com