तरुणांसाठी उगवत्या संधींचा देश

तरुणांसाठी उगवत्या संधींचा देश

जगभरातील लोकसंख्येच्या बदललेल्या गणितामुळे जपानसारख्या देशाला कामांसाठी तरुण मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे, भारतात सुशिक्षित तरुणांची संख्या वाढत असून, या वयोगटाला जगभरात चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या ‘सकाळ एज्युकॉन २०१९’च्या निमित्ताने अशा संधींवर दृष्टिक्षेप.

भारताचे नाव सध्या जगभरात गाजते आहे. पश्‍चिम आशियातील देशांत भारतीय कामगारांचा बोलबाला आहे. अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’मध्येही हुशार भारतीय अधिराज्य गाजवीत आहेत. न्यूयॉर्क, शिकागो, लंडन व ह्युस्टनसह जगभरातील अनेक ठिकाणी भारतीय डॉक्‍टर उत्कृष्ट काम करीत आहेत. जगातील काही देशांतील लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकते आहे, तर काही देशांत लोकसंख्येचा दर घटतो आहे. याचबरोबर विविध देशांत करिअर करू पाहणाऱ्या भारतीय तरुणाईसाठी अनेक संधी निर्माण होत आहेत.

जपान हे याचे चांगले उदाहरण आहे. याचा उल्लेख २४ सप्टेंबर रोजी टोकियोत सुरू झालेल्या ‘सकाळ एज्युकॉन २०१९’ या कार्यक्रमात अनेक वक्‍त्यांनी केला. शिक्षण व कामधंद्यासाठी भारतातील विद्यार्थी व तरुण व्यावसायिकांनी आपल्याकडे यावे, यासाठी जपान आशेने पाहतो आहे. जपानमध्ये चांगला पगार मिळतो. तेथील राहणीमानही उच्च दर्जाचे आहे. जपानमधील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेतात. जपानमधील कंपन्यांचे मालक नोकरी देण्याचा निर्णय सावकाश घेतात, मात्र एकदा निर्णय घेतल्यावर तो अगदी पक्का असतो. जपानमध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहिलेले लोक हा मुद्दा नेहमीच अधोरेखित करतात. आता आपण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करूया. भारताची लोकसंख्या सध्या १३० कोटी आहे. त्यातील मध्यमवर्गीयांची संख्या सुमारे ३० कोटी आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची संख्या चार धरल्यास विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे १५ कोटी भरते. त्यातील २५ टक्के दरवर्षी पदवीधारक होतात, असे गृहीत धरल्यास देशात दरवर्षी तीन कोटी ७५ लाख विद्यार्थी पदवी संपादन करतात. हे सर्व विद्यार्थी नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडतात. दुर्दैवाने, देशात सध्या आर्थिक आघाडीवर थोडी नकारात्मक स्थिती आहे. त्यामुळे देशात नोकरीच्या संधी वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहेत. त्यावरचा उपाय म्हणजे या पदवीधारकांनी जगभरातील उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा शोध घेणे, हा आहे. यामध्ये जपानसारखे देश आहेत, जेथे लोकांना त्यांची कामे करून घेण्यासाठी तरुणांचा शोध घेणे कठीण होऊन बसले आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने कमी होते आहे. यातील अनेक देशांत ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या ही डोकेदुखी ठरते आहे. दुसरीकडे, भारतात तरुण आणि सुशिक्षित तरुणाई झपाट्याने वाढते आहे. या वयोगटाला जगभरात चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.

या परिस्थितीत जगभरातील देश भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. हे देश दर्जेदार मनुष्यबळाची अपेक्षा करणार, हे साहजिक आहे. त्यामुळे ते ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’मधून पदवी घेतलेल्यांच्याच मागे धावणार. मात्र, या पदवीधारकांना अनेक संधी उपलब्ध असल्याने त्यांना इंग्रजी भाषिक देशांपलीकडच्या देशांत जाण्यास रस असण्याची शक्‍यता नाही. इतर महाविद्यालयांनी यापासून धडा घेणे गरजेचे आहे. तो धडा असा, की शैक्षणिक संस्थांमधून दर्जेदार मनुष्यबळाची निर्मिती होणे अत्यंत आवश्‍यक आहे. फक्त आकड्यांचा खेळ आता संपला आहे. आर्थिक गणिते जुळण्यासाठी या संस्था मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. दर्जेदार शिक्षकांचा अभाव, तसेच अत्याधुनिक व पुरेशा सुविधांच्या अभावी या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. या सर्वांमुळे संबंधित शिक्षण संस्थेची गणना प्रतिष्ठित संस्थांमध्ये होत नाही.

यातून सर्व शिक्षण संस्थांना जाणारे संदेश स्पष्ट आहेत. दर्जा सुधारा किंवा शिक्षण व्यवसायातून बाहेर पडा! आपल्या देशात सरकारी व खासगी संस्थेचे मोठे व संमिश्र जाळे आहे. खासगी संस्थांनी आता विद्यार्थी संख्येपेक्षा शिक्षणाच्या दर्जावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यातील काही खासगी संस्था चांगल्या दर्जासाठी ओळखल्याही जातात. त्यामुळेच या संस्थांतील पदवीधारकांना जगभरातून मागणी असते. मात्र, सर्वच शिक्षण संस्थांच्या बाबतीत अशी परिस्थिती दिसून येत नाही. टोकियोमधील ‘सकाळ एज्युकॉन २०१९’मधून अनेक धडे शिकायला मिळाले आहेत. पहिला, खासगी शैक्षणिक संस्थांनी आपले नाव आणि दर्जा प्रस्थापित करायला हवा. यासाठी खूप अंतर कापावे लागणार आहे आणि त्यासाठी  वेळही लागेल. त्यासाठी सुरवातीला मोठी गुंतवणूक करावी लागेल. दुसरा मुद्दा, शैक्षणिक संस्था व्यावसायिक तत्त्वावर चालवाव्या लागतील आणि त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांची नेमणूक करावी लागेल. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अभ्यासक्रम, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती व तशीच परीक्षा पद्धत उपलब्ध करून द्यावी लागेल. या बदलांसाठी शैक्षणिक स्वातंत्र्य गरजेचे आहे. त्यासाठी या संस्थांनी अभिमत किंवा विद्यापाठीचा दर्जा मिळविण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील. संस्थेचा दर्जा दरवर्षी वाढवत न्यावा लागेल. नजीकच्या भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता (ॲक्रिडेशन) मिळवावी लागेल. शिक्षण, प्रशिक्षण व ज्ञानाची निर्मिती या गोष्टी शिक्षण संस्थांमध्ये हातात हात घालून होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा वर्षे ‘सकाळ एज्युकॉन’चे आयोजन होत आहे. जगभरातील विविध देशांत आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमात महाराष्ट्रासह देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग नोंदविला आहे. परदेशातील विख्यात शैक्षणिक संस्थांना भेटी देणे आणि तेथील शिक्षणतज्ज्ञांचे विचार ऐकणे हा आपल्या देशातील शिक्षण संस्थांसाठी समृद्ध करणारा अनुभव ठरला आहे. आता या संस्थांनी जगभरातील लोकसंख्येच्या बाबतीतील स्थितीचा फायदा घेऊन काम करणे आवश्‍यक आहे.

देशातील शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांनी मोठे बदल करणे अपेक्षित आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असायला हवा. यासाठी काही प्रमाणात स्वायत्तताही गरजेची आहे. या संस्थांनी स्वतःचा अभ्यासक्रम विकसित केला व त्याच्या दर्जावर शिक्कामोर्तब झाल्यास संस्थेतील पदवीधारकांना देशाबरोबरच परदेशातही करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळतील. शिक्षण संस्थांना सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी केवळ शिक्षण न देता प्रात्यक्षिकांसह कौशल्याधारित शिक्षण द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती, संज्ञापन कला व गटात काम करण्याचे कसब विकसित करीत अष्टपैलू व्हावे लागेल. त्यांना एखादी परदेशी भाषा शिकावी लागेल, परदेशी संस्कृती आत्मसात करावी लागेल आणि अन्य देशांना केवळ वरवरचे नव्हे, तर मुळापासून समजावून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांना बसून आपले ज्ञान आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे सिद्ध करावे लागेल. जग अशा विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यास सदैव तयार आहे. ‘सकाळ एज्युकॉन २०१९’ चा संदेश थेट आणि स्पष्ट आहे. देशातील तरुण व तरुणींसाठी आणि त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांसाठी ही मोठी संधी आहे. सर्वोत्कृष्ट होण्यासाठीच्या दृष्टिकोनाची मात्र प्रत्येकालाच गरज आहे.

मंथनात सहभागी व्हा
जपानमध्ये भारतीयांसाठी कोणकोणत्या क्षेत्रात संधी आहेत, याबद्दल ‘सकाळ’मधून विचारमंथन घडवून आणत आहोत. आजचा लेख हा त्याचा पहिला भाग आहे. आपल्याला या विचारमंथनात सहभागी व्हायचे आहे? आपले विचार, मत अथवा प्रश्न आम्हाला ई मेल करा webeditor@esakal.com वर.

(अनुवाद - महेश बर्दापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com