भाष्य : ‘शालेय रंगभूमी’चे शैक्षणिक महत्त्व

रंगभूमी माणसाला एक चांगला कलाकारच नाही, तर एक चांगला माणूस घडवते. म्हणून शालेय अभ्यासक्रमात ‘शालेय रंगभूमी’ हा विषय हवाच.
Students
StudentsSakal
Summary

रंगभूमी माणसाला एक चांगला कलाकारच नाही, तर एक चांगला माणूस घडवते. म्हणून शालेय अभ्यासक्रमात ‘शालेय रंगभूमी’ हा विषय हवाच.

- संजय हळदीकर

रंगभूमी माणसाला एक चांगला कलाकारच नाही, तर एक चांगला माणूस घडवते. म्हणून शालेय अभ्यासक्रमात ‘शालेय रंगभूमी’ हा विषय हवाच. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग असलेली ही ‘शालेय रंगभूमी’ सर्वाधिक प्रयोगशील होईल.

लहानपणी मामाच्या गावातील सोंगी भजनाचा माझ्यावर प्रभाव पडला व आपणही सोंग घ्यावं, लोकांच्या समोर यावं असं वाटू लागलं. मग नाटकाचं वेड लागलं. मनोरंजन आणि ज्ञान देणारं, जाणिवा प्रगल्भ करणारं नाटक. माणूस उलगडणारं नाटक. आळेकर, मतकरी, तेंडूलकर, एलकुंचवार आदींची नाटके, एकांकिका करता करता आपल्याकडं जे आहे ते दुसऱ्यांना द्यावे या धारणेतून मी बालनाट्य शिबीरे लहान मुला-मुलींच्याकरिता घ्यायला सुरुवात केली. बालनाट्य. राक्षस, चेटकीण, अद्भुत जगातील आशय-विषयांपासून सामाजिक, शैक्षणिक ते चॅनलवरील ‘छोटा भीम’ सारख्या आशय-विषयावरील बालनाट्ये बालमनाला आपलीशी करतात. रंजन करता करता मुलांना संदेशही देतात. हसवता हसवता वास्तवाची जाणीवही करून देतात. चांगलं काय, वाईट काय याची जाणीव बालनाट्याच्या नाट्यानुभवातून मुलांना होते.बालनाट्यात काम करणे, अभिनय करणे ही तर मुला-मुलींची दृष्टीने एक आनंददायी व उत्साहवर्धक बाब आहे. कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, एकाग्रता ही बालनाट्यात काम करताना वाढीस तर लागतेच व सांघिकताही अंगी भिनते. सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक, वैज्ञानिक, ऐतिहासिक आशय-विषयाच्या बालनाट्यात सहभागी होताना मुलं आनंदित तर होतातच, शिवाय त्यांची बालमने प्रगल्भ होतात. तीच अवस्था बालनाट्ये पाहणाऱ्या मुला-मुलींची. त्यांचाही मनोविकास होतो.

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रसिद्ध रंगकर्मीने म्हटले, की ‘स्पर्धेच्या, माध्यमांच्या, चॅनेलच्या जगात माणूस गर्दीतला एक होत चालला आहे. भौतिकतेच्या अधीन होत चालला आहे. त्याचा आतला आवाजच हरवत चाललाय. नातेसंबंधही संपुष्टात येऊ लागलेत. संवेदनशीलता जपायची असेल तर माणसाला नाटक केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे व मुख्यत: माणसाच्या बालपणापासूनच शालेय ‘शालेय रंगभूमी’ हा विषय अभ्यासक्रमात राबवला पाहिजे. या विधानाने माझा पिच्छाच पुरवला. ‘शालेय रंगभूमी व मुले’ या विषयाने मला पछाडले.

‘शालेय रंगभूमी’ बालरंगभूमीचे दुसरे रूप. हे रूप शैक्षणिक आहे. खरं म्हणजे जगभरातच मुलांना नाटक शिकवणे गरजेचे मानले आहे. मुलांची अभ्यासातील रूची वाढवण्यासाठी, त्यांना अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी नाटकासारखे उत्तम माध्यम नाही. शालेय रंगभूमीवरील विषयातून अनुभव मिळतो. मूल्यसंस्कारही होत असतात. आविष्काराच्या स्वरुपात धड्याचे सादरीकरण केल्यास अनेक गोष्टी आकलन व्हायला सोप्या होतात. अभ्यासात मन रमवणारी रंगभूमी. या रंगभूमीवर होणारं नाटक एक खेळच आहे. मुलांना खेळात रमायला, रंगून जायला आवडतं. भावना, भाषा विकसित करता करता शालेय रंगभूमीवर बौद्धिक व नैतिक विकासही होत असतो. मनोरंजनातून अभ्यास करता करता मुलांना संवेदनक्षम बनवते शालेय रंगभूमी. प्रेमा साखरदांडे यांनी लिहिलेले व गिरीश पतके यांनी संपादन केलेले ‘नाट्य आणि शालेय अध्यापन’ हे पुस्तक वाचत असताना शालेय अध्यापनात नाटक या माध्यमाची किती परिणामकारक मदत होऊ शकते, याचा तपशीलवार उलगडा होतो.

व्यक्तिमत्व विकासासाठी

महाराष्ट्रातील विविध शहरांत, छोट्या-मोठ्या खेडेगावात, आदिवासी पाड्यावर, वेश्या वस्तीतील मुला-मुलींसाठी, सुरक्षित व चांगल्या घरातील मुलांसाठी, अनाथालय, आश्रमशाळेतील मुला-मुलींसाठी बालनाट्य शिबिरे घेताना मुला-मुलींना माझा पहिला प्रश्न हा असतो की ‘किती जणांना नाटकात काम करायला आवडते?’ शिबिरातील सर्व मुला-मुलींचे हात वर. नाटक म्हटलं की, मुला-मुलींची कळी खुलते, अंगात उत्साह संचारतो. अशा वेगवेगळ्या शहरांपासून खेड्या-पाड्यापर्यंतच्या बालनाट्य शिबिरातील उत्साहवर्धक दृश्यावरून मनात विचार येऊ लागला की, ‘शालेय रंगभूमी’ हा विषय अभ्यासक्रमात राबवावा का? राबवल्यास त्याचे काय फायदे होतील? या प्रश्नाचे उत्तर किंवा विचार बालनाट्य शिबिरातील मुलामुलींनी द्यावे. १० ते १२ ओळीत आपल्या वहीतील एका कागदावर लिहून द्यावे. प्रत्येक बालनाट्य शिबिरात मी हा मनातील शालेय रंगभूमीविषयक विचार, प्रश्न मुलांच्यासमोर मांडला.

प्रत्येक बालनाट्य शिबिरात मुले-मुली भरभरून, उत्साहाने या विषयावर आपल्या मनातील विचार, मते, फायदे झरझर कागदावर उतरू लागले. मुला-मुलींच्या शालेय रंगभूमी अभ्यासक्रमविषयक विचारांची कागदांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. माझी उत्सुकता वाढत होती. ४००च्या वर मुला-मुलींचे शालेय रंगभूमी अभ्यासक्रमविषयक विचार या निमित्ताने गोळा झाले. त्यांनी त्यांच्या भाषेत मनोगत लिहिले होते, पण त्यामागील विचार प्रगल्भ होता. शालेय जीवनात कलागुणांना वाव दिला, तर शैक्षणिक व व्यक्तिमत्त्वाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. शालेय रंगभूमीमुळे सभाधीटपणा,आत्मविश्वास वाढेल, भाषा व बोलण्यात, विचारात स्पष्टता येईल. सगळ्यासमोर आपली मते, भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. नाट्यीकरण केलेले विषय दीर्घकाळ स्मरणात राहतील, आदी मुद्यांचा अंतर्भाव त्यांत होता. प्रत्येक शाळेतील सभागृहात आपण व्यासपीठ पाहतो, मुला-मुलींना त्याचं आकर्षण असतं. शालेय रंगभूमीमुळे मुले व्यासपीठावर व्यक्त होतील, विचार मांडतील.

नाटकामुळे ऊर्जा निर्मिती होते व विचार करण्याची क्षमताही वाढते. शालेय रंगभूमीमुळे मुलांचे मनोरंजन होईल व अभ्यासात लक्ष लागेल. एकत्रित असल्यामुळे एकमेकांशी संवाद वाढेल. नाटकामुळे स्मरणशक्ती वाढेल. हे सगळं आपण शाळेतच करू शकतो, आठवड्यातून चार दिवस एक तास जरी शालेय रंगभूमी हा विषय घेतला, तर मुलांच्यात आनंद, उत्साह, धाडस, पाठांतर करण्याची क्षमता वाढेल. अनुभव, ज्ञान मिळेल. जी मुले शाळेत येत नसतील, तर ते देखील नाटकाचे कारण घेऊन शाळेत येतील.

पाठ्यपुस्तकात हा विषय आला तर मज्जा येईल. नाटक सर्वत्र महाराष्ट्रात केले जाते. हा विषय पुस्तकात आला तर आम्ही त्याची खूप जोरदार तयारी करू. असेही मुले लिहितात. शालेय रंगभूमीमुळे बौद्धिक विकास होईल व विविध नातीगोती समजतील, परिस्थितीती जाणीव होईल. कोणीतरी नाटककार, कलावंत, दिग्दर्शकही होईल. नाटकातून आपल्याला काहीतरी तात्पर्य मिळतं, हे तात्पर्य आपण आयुष्यात वापरले पाहिजे. फक्त इतर विषयच अभ्यासक्रमात असतील व ‘शालेय रंगभूमी’ हा विषय अभ्यासक्रमात नसेल तर आम्ही कधीच नाटक करू शकणार नाही. फक्त अभ्यास आणि अभ्यासच... शालेय रंगभूमी हा विषय अभ्यासक्रमात आला तर मुले शाळेत येताना आनंदाने येतील. काही मुलांवर जो मानसिक ताणतणाव असतो, भीती वाटत असते, ती दूर करण्यासाठी शालेय रंगभूमी हा एक उत्तम उपाय आहे. शाळेत शिकत असताना मनोरंजनाची गरज आहे. विद्यार्थी फक्त पुस्तकी किडा न राहता जीवनात Practical Approach घ्यायला शिकेल व आयुष्याच्या यशस्वी मार्गावर जाईल. आपण सगळे ठरीव चौकटीत आयुष्य जगत असतो. त्याबाहेर पडायचा आपण विचार करत नाही. पण रंगभूमी आपल्याला चौकटीच्या बाहेर पडायला भाग पाडते. जिथे माणूस हा त्याच्या कलेतून व्यक्त होतो.

स्वत:च्या, समाजाच्या प्रश्नावर बोलायला लागतो. रंगभूमी आपल्याला स्वत:च्या व इतरांच्या जीवनातील कथा सांगायला मदत करते. रंगभूमी आपल्याला अनोळखी असलेल्या जीवनाचा अनुभव करून देते, विचार करायला भाग पाडते आणि त्या विचारावर बोलायला शिकवते. मुळातच रंगभूमी माणसाला एक चांगला कलाकारच नाही, तर एक चांगला माणूस घडवते. म्हणून शालेय अभ्यासक्रमात ‘शालेय रंगभूमी’ हा विषय हवाच. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग असलेली ही ‘शालेय रंगभूमी’ सर्वाधिक प्रयोगशील होईल.

(लेखक रंगकर्मी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com