भाष्य : विकासाच्या वाटचालीचा ‘सारथी’

संजय मिस्कीन
Tuesday, 20 October 2020

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ महाराष्ट्राच्या बहुजनमनाचा आरसा होण्याची क्षमता असलेली संस्था आहे. स्थापनेपासूनच ‘सारथी’ वादग्रस्त ठरली.

‘सारथी’ संस्थेच्या स्वायत्ततेचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. कुणबी आणि शेतीशी संबंधित समाजात आमूलाग्र परिवर्तन घडविण्याच्या दिशेने जे प्रयत्न अपेक्षित आहेत, त्यात या संस्थेची भूमिका कळीची ठरेल. अभ्यास-संशोधनाच्या आधारे सरकारला विकासात्मक उपायांबाबत शिफारशी ही संस्था करेल, अशी अपेक्षा आहे.  

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ महाराष्ट्राच्या बहुजनमनाचा आरसा होण्याची क्षमता असलेली संस्था आहे. स्थापनेपासूनच ‘सारथी’ वादग्रस्त ठरली. संस्थेची स्वायत्तता कायम राखत महाविकास आघाडी सरकारने ‘सारथी’ला जीवदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. खरे तर ‘सारथी’ची स्थापना मराठा क्रांती मोर्चाचे सर्वांत प्रभावी फलित मानले पाहिजे. कारण, संस्थेच्या हेतू आणि उद्दिष्टांमध्ये केवळ मराठाच नव्हे; तर कुणबी आणि शेती व्यवसायातील बहुजन समाज केंद्रस्थानी आहे. एकंदर कृषक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासावर प्रकर्षानं लक्ष देण्यासाठी तसेच या तमाम कृषक समाजाचे प्रश्न समजून घेणे, त्याचा अभ्यास करून ठोस उपाययोजना सुचवणे यासाठी निरंतर कार्यरत राहणारी संस्था असा ‘सारथी’चा उदात्त हेतू आहे. विशेष बाब म्हणजे ज्या छत्रपती शाहू महाराज यांनी अख्खं राज्य ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ भावनेनं राबवलं, त्याचा आदर करत संस्थेची स्थापना झालेली आहे. केवळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी शिष्यवृत्ती, फेलोशिप देण्यापुरता सीमित हेतू संस्था स्थापनेमागे नाही, हे मराठा समाजाच्या संस्था, संघटना व नेत्यांनी लक्षात घ्यावे. ‘सारथी’ मराठा समाजासह शेतीशी निगडित सर्व घटकांच्या सर्वांगीण शाश्वत प्रगतीचा मार्ग आखणारी यंत्रणा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सारथी’ची स्वायत्तता यासाठी महत्त्वाची आहे. विविध विषयावर संशोधन करून सरकारला धोरणात्मक निर्णयाचा आराखडा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून उभे राहावे,या मूलभूत विचाराने ‘सारथी’ची स्थापना झाली. मात्र संकुचित राजकीय विचारातून संस्थेच्या बदनामीचे कारस्थान केले गेले. भविष्यात त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा व इतर लक्षित गटांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवण्याची संधी सरकारला आहे. तसे केल्यास सरकारची प्रतिमा उजळेल, समाजहितासाठी सरकारची कटिबद्धता आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वच कामे (खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत) होऊन जनसामान्यांचे समाधान होईल. हे लक्षात घेवून ‘सारथी’मार्फत संशोधनाव्यतिरिक्त प्रशिक्षण व मानव विकासाचे कार्यक्रम राबवणे प्रस्तावित आहे. त्याद्वारे गरजू मराठा कुटुंबांचे हित साधले जाईल. आरक्षण नसल्यामुळे असलेला असंतोषही कमी होईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यापक हितासाठी...
लक्ष्यित गट म्हणजे मराठा व कुणबी समाजामधून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे कुटुंब/कुटुंबाचे सदस्य. मराठा आणि कुणबी समाजामधून उन्नत आणि प्रगत गट/व्यक्ती (क्रिमीलेअर) वगळून जे लाभार्थी ठरतील, त्यांच्यासाठी ‘सारथी’च्या योजना आणि कार्यक्रमाचा मोठा आधार ठरेल. खासगी क्षेत्रात नोकऱ्या किंवा स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आणि दरवर्षी सुमारे दहा हजारांवर बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे मोठे काम ‘सारथी’ उभारू शकते.  मराठा व कुणबी समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत बेरोजगार युवक-युवतींना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे, त्यांना लघु व मध्यम उद्योग अथवा लघुउद्योग उभारण्यासाठी भागभांडवल पुरवणे व बॅंकांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण आणि त्याची क्षमता वृद्धी करणे यासाठी ‘सारथी’ समाजाची साथीदार होवू शकते. सीएसआर निधी मिळवून त्यातून लक्षित गटाच्या कुटुंबातील युवक-युवतीसाठी कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारासाठी उपक्रम राबवणे, तसेच लक्षित घटकातील कुटुंबाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपक्रम राबवण्याचे कार्यदेखील सारथी उभारणार आहे. ‘संस्थात्मक नेटवर्किंग, माहिती शोधन (Data Mining) आणि इतर माध्यमातून ज्ञानकोश म्हणजेच ‘नॉलेज बॅंक’ बनवून, तो अद्यावत ठेवून लक्षित घटकातील कुटुंबांच्या सदस्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी, गरजूंना समुपदेशन, तसेच लक्षित समाजातील शिक्षित बेरोजगार युवक-युवतींचा डाटाबेस बनवून विविध कंपन्या आणि प्लेसमेंट किंवा कन्सलटन्सी संस्थांशी संलग्न करून संबंधित उमेदवारांना व्हॅल्यू ॲडिशन, सॉफ्ट स्किल कोर्सेस व मुलाखतीचे तंत्र प्रदान करणे यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्लेसमेंट किंवा नोकरीसाठी मदत करणे हे ‘सारथी’चे ध्येय आहे. शासकीय आणि निम-शासकीय नोकऱ्यांसाठी जसे की, यूपीएससी, एमपीएससी, बॅंकिंग, रेल्वे, सरकारी कंपन्यांतील नोकरी, तसेच एनडीए, जेआरई-टॉफेल, अशा स्पर्धा परीक्षा, सैन्य व पोलिस भरती इत्यादींच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन किंवा विविध विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रायोजित करणे. तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टर्ड अकौटंट, व्यवस्थापन कौशल्ये यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन तसेच कोचिंग क्‍लासेसचे नियोजन करून विद्यार्थांना प्रायोजित करणे. संभाषण कौशल्ये, सामान्य ज्ञान, इंग्रजी संभाषण याबाबतीत प्राविण्यासाठी दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी मार्गदर्शन करणे, समुपदेशन उपक्रम राबवणे असे व्यापक कार्य `सारथी’कडून अपेक्षित आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधनाद्वारे सरकारला मार्गदर्शन
विविध प्रवर्गातील जाती/जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीबाबत संशोधन करुन त्यांच्यातील अतिमागासलेल्या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती कशी गतीमान करता येईल याबाबत संशोधन करणे आणि त्या अनुषंगाने सरकारला शिफारशी करणे तसेच राज्य मागासवर्गीय आयोगाच्या विचाराधीन जाती/जमातींची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, स्थिती जाणून आवश्‍यतेनुसार संशोधन तसेच सामाजिक व शैक्षणिक मागासपणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाशी समन्वयाद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन आणि विकास सूचकांक (डेव्हलपमेंट इंडेक्‍स) तयार करणे. लक्षित प्रवर्गातील उमेदवारांना एमफिल, पीएचडी यांसारख्या उच्च शिक्षणासाठी फेलोशिप आणि इतर उपक्रम राबवणे (दरवर्षी सुमारे ६४१ फेलोशिप) तसेच अल्प आणि मध्यम कालावधीच्या संशोधन प्रकल्पासाठी सहकार्य आणि त्यासाठी अर्थसहाय्य. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांना शेती आणि कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन पालनासारखे पूरक उद्योग यासाठी मदत आणि प्रशिक्षणासाठी समन्वय अशा अनेक बाबतीत सहाय्यभूत कार्य ‘सारथी’कडून अपेक्षित आहे. 

प्रत्येक तालुक्‍यात संविधान दूत व संत गाडगेबाबा दूत पाठवून लक्ष्यित जाती/जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध योजनांचे विविध प्रकारे मूल्यमापन करणे आणि योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी उपाययोजना सुचवणे, अशी अनेक आव्हाने ‘सारथी’ने पेलावीत.   व्यापक समाजहिताला अग्रक्रम, त्यातून या घटकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासाला चालना देणारी ‘सारथी’ केवळ राजकीय चळवळीचा अड्डा बनू नये, यासाठी मराठा समाजातील सुजाण युवकांना कार्यरत राहावे लागणार आहे. ‘सारथी’ ही छत्रपती शाहू महाराज यांच्या समग्र विचार आणि कार्यपद्धतीचे चिरंतन स्मारक आहे. अशा संस्थेची बांधिलकी महाराष्ट्राच्या शेती, माती व बहुजन संस्कृतीशी जोडलेली आहे. त्यामुळेच तिची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Miskin writes article about sarathi