भाष्य : भारतसेवकाचे वैचारिक द्रष्टेपण

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५५ वी जयंती ९ मे रोजी साजरी झाली. त्यानिमित्त या थोर भारतसेवकाचे विचार आणि कामगिरी यांवर टाकलेला दृष्टिक्षेप.
Gopal Krishna Gokhale
Gopal Krishna GokhaleSakal

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५५ वी जयंती ९ मे रोजी साजरी झाली. त्यानिमित्त या थोर भारतसेवकाचे विचार आणि कामगिरी यांवर टाकलेला दृष्टिक्षेप. त्यांच्या विचारांची प्रस्तुतता आजच्या परिस्थितीतही ठळकपणे जाणवते.

'जो विचार बंगाल आज करतो तो भारत उद्या करतो, बंगाल उद्याच्या भारताच्या बदलाचा दिशादर्शक असेल”, हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे प्रसिद्ध विधान पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी उद्घृत केले होते. तेव्हा आणि निवडणुकांचे निकाल लागल्यावर गोखले यांच्या अनेक भाकितांचे बंगाललाच नाही तर अवघ्या देशाला पुन्हा स्मरण झाले.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे ९ मे रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांची १५५ वी जयंती होती. १८६६ साली तत्कालीन मुंबई प्रांतातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात ताम्हनमळा येथे गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म झाला, तर कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये त्यांनी प्रारंभीचे शिक्षण घेतले. वयाच्या १८व्या वर्षी मुंबईच्या एलफिस्टन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. विद्यार्थीदशेत जिज्ञासू वृत्ती, चिकाटी, असामान्य स्मरणशक्ती आणि सच्चारित्र्य या गुणांसाठी ते प्रसिद्ध होते. इंग्लिश स्कूलनंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापक म्हणून जबाबदारी घेतली. या काळात त्यांनी इतिहास व अर्थशास्त्राच्या अध्यापनात विशेष नैपुण्य प्राप्त केले. अवघ्या बाविसाव्या वर्षी सार्वजनिक सभेचे सचिव आणि २९ व्या वर्षी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सचिव बनलेल्या गोखले यांनी उमेदीच्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात केलेले अध्यापन, भूषविलेले प्राचार्यपद नंतर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेकवार केलेले परदेशगमन गोखले यांच्या एकंदरीत मानसिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावणारे ठरले. गोखल्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे ‘भारत सेवक संघ’. १९०४च्या जून महिन्यात या संस्थेची स्थापना झाली. सार्वजनिक जीवनातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन भारतीयांच्या कल्याणासाठी नियमानुसार काम करण्याची संधी देणे हे या सभेचे ध्येय होते. या संस्थेत हिंदू- मुस्लीम ख्रिश्चन असा भेद नव्हता. भारताला स्वयंशासित बनविणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते.

गोखले यांनी न्या. महादेव गोविंद रानडे यांना गुरु मानले आणि रानडे यांनी दादाभाई नौरोजी यांना, तर म. गांधींनी गोखले यांना गुरु मानले. म्हणजेच दादाभाई नौरोजी हे गांधीजींचेही परात्पर गुरु झाले. दादाभाई नौरोजी यांनी हिंदुस्तानच्या दुर्दशेवर लिहिलेले निबंध आणि दिलेली व्याख्याने ही या सगळ्यांपुढे आदर्शवत होती. गांधीजीही त्यास अपवाद नव्हते. या सर्व घटना केवळ गुरु शिष्याच्या जोड्या लावण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. या देशाच्या प्रश्नांबद्दल आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल या सर्व थोर पुरुषांची काही मते होती. रानडे यांनी राष्ट्रवादाची मांडणी करताना मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ब्रिटिशांच्या धोरणाला विरोध केला होता. मुक्त स्पर्धेत बलाढ्य आंतरराष्ट्रीय उद्योगांसमोर भारतीय उद्योग टिकाव धरणार नाहीत, ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे आधीच भारतात असलेले दारिद्र्य अजून वाढेल, असे त्याना वाटत होते. हीच भूमिका गोखले यांनीही घेतली. मुक्त व्यापाराचे धोरण भारतासारख्या बव्हंशी निरक्षर असलेल्या आणि तंत्रशिक्षणात मागास असणा-या देशात निरुपयोगी आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी येथील लोकांना व्यापाराच्या बाबतीत ‘संरक्षणात्मक धोरणा’ची गरज असल्याचे आग्रहाने सांगितले.

गरीबकेंद्री विकास

१९०३मध्ये अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणात त्यांनी देशाची धोरणे ठरवताना सार्वत्रिक शिक्षण, आरोग्य, नशाबंदी, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, रोजगार याचा मुख्यत: विचार व्हावा, याचाही आग्रह धरला. त्यांच्या अर्थविचारात औद्योगिक विकासाला मोठे स्थान होते. त्याशिवाय सामूहिक आणि सर्वदूर विकास होणार नाही, असेही त्यांनी प्रतिपादित केले. त्यांचे अर्थिक -सामाजिक विचार परस्परपूरक होते. ‘गरीबकेंद्री विकास’ हा त्यांच्या विकासाबाबतच्या धोरणाचा पाया होता. सामाजिक विकासाशिवाय आर्थिक विकासाचा गाडा सुरळीत चालू शकत नाही, हे उमजलेले ते एक द्रष्टे नेते होते. त्यांचे विचार आजही किती महत्त्वाचे आहेत, हे नामवंत अर्थतज्ज्ञही मान्य करतात.

गरीब, दलित आणि आदिवासींच्या सर्वनाशाला नशा हेच कारण आहे हे ओळखून त्यांनी नशाबंदीचा पुरस्कार केला. महात्मा गांधींनीही ते लक्षात घेऊन नशाबंदीला स्वातंत्र्यलढ्यातील एक भाग बनवले. गोखले मनाने अत्यंत निर्मळ होते. आपल्या चुका जाहीरपणे कबुल करण्यात ते कमीपणा मानत नसत. ते विलायतेला पहिल्यांदाच गेले असताना भारतात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. भारतातील हा पहिलाच प्लेग. त्याचे निवारण करण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना केल्या. याबाबत त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतहितैषी सर विल्यम वेडरबर्न यांच्यामार्फत भारतीय जनतेवर अत्याचार होत असल्याचा विषय मांडला आणि संपूर्ण विलायतेत आंदोलन पसरले. पण यातील काही मुद्दे अतिरंजित असल्याचे कळल्यावर गोखले यांनी सरकारची मोकळ्या मनाने माफी मागितली, कोविडच्या काळात खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु असताना गोखले यांची आवर्जून आठवण येणे स्वाभाविक आहे.

मार्गदर्शक दीपस्तंभ

गोखले आजही मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. आजच्या अनेक समस्यांची उत्तरे त्यांच्या विचारांत आपल्याला सापडू शकतील. गोखलेंनी १९०५च्या बंगालच्या फाळणीला थेट विरोध केला होता. त्याच वेळीस राजकारणाच्या अध्यात्मीकरणासाठी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा त्यांनी सतत आग्रह धरला. हिंदू-मुस्लीम मनभेद आणि दंगली भारतासारख्या देशाला परवडणार नाहीत, ही त्यांची राष्ट्रहिताची भूमिका होती. अवघे ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोखले यांनी १९ फेब्रुवारी १९१५ रोजी आपला देह ठेवला. मृत्युपूर्वी ‘सर्व्हटस सोसायटी ऑफ इंडिया’ मधील आपल्या सहकाऱ्यांना बोलावून गोखले म्हणाले होते, ‘माझे पुतळे उभारू नका, श्रद्धांजली सभा घेऊ नका किंवा माझी चरित्रे प्रकाशित करू नका; मात्र तोच वेळ आणि पैसा देशसेवेसाठी आणि लोककल्याणासाठी द्या.’ अर्थातच अफाट कर्तृत्वाचे शिखर गाठणाऱ्या गोखल्यांच्या श्रद्धांजलीसाठी लोकांनी सभा तर घेतल्याच; पण ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, फिजी, मॉरिशससारख्या देशांतही सभा झाल्या. अर्थात गोखलेंनी लोककल्याणासाठी जे विचार मांडले आणि राजकीय कृती केली त्याचा अमिट असा प्रभाव तेव्हाच्या जागतिक समुदायावर पडलेला होता.

‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न आज पाहताना गोखले यांचा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह असो, की संरक्षणावरील खर्चापेक्षा शिक्षण आणि आरोग्य यावरच खर्च वाढला पाहिजे, अशी त्यांची मते असोत, त्यांचा पाठपुरावा आजही करावा अशीच वर्तमानातील स्थिती आहे. बंगालमधील निवडणुकांनंतर हिंसाचार उफाळून आला असताना देशातील कार्यकर्त्यांना राजकीय – सामाजिक विषयांवर प्रशिक्षण देणाऱ्या ‘भारत सेवक संघा’सारख्या संस्था उभ्या करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘माझे पुतळे / स्मारके उभे करू नका’ तोच वेळ आणि पैसे देशसेवेसाठी द्या म्हणणाऱ्या गोखले यांना देशावर कोविडरुपी भीषण संकट आलेले असताना समाजासाठी आयुष्य समर्पित करणे हीच १५५ व्या जयंतीनिमित्त कृतिशील आदरांजली ठरेल.

(लेखक ‘सरहद्द’चे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com