संघर्षाच्या विळख्यात पश्‍चिम आशिया

संकल्प गुर्जर (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)
सोमवार, 2 जानेवारी 2017

संपूर्ण पश्‍चिम आशियातच वेगवेगळ्या कारणांनी भरपूर अस्वस्थता खदखदत आहे. गेल्याच आठवड्यात तुर्कस्तानमध्ये रशियन राजदूताची हत्या करण्यात आली. राजदूताची हत्या हे फार गंभीर प्रकरण असते. एका अर्थाने तो राजदूत ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो, त्या देशावरील हा हल्ला समजला जातो.

पश्‍चिम आशियात वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थता आहे. तिचा उद्रेक सातत्याने होत आहे. तेथील परिस्थिती महासत्तांकडून कशी हाताळली जाते, यावर तेथील स्थैर्य अवलंबून आहे. 

मा गील आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत इस्राईलच्या विरोधात ठराव आणला गेला होता. तो ठराव अमेरिका आपला नकाराधिकार वापरून पास होऊ देणार नाही, असे इस्राईलला वाटत होते. मात्र तसे झाले नाही. अमेरिका तटस्थ राहिली. इस्राईलची अमेरिकेशी असलेली पारंपरिक मैत्री लक्षात घेता अमेरिका आपल्या बाजूने आली नाही, हे पाहून इस्राईलला धक्का बसला. या ठरावाच्या निमित्ताने इस्राईलने आक्रमक भूमिका घेतली असून, ज्या देशांनी हा ठराव आणला त्या इजिप्त, सेनेगल, न्यूझीलंड आणि व्हेनेझुएला या चार देशांना धडा शिकवण्यासाठी इस्राईल पावले उचलणार, हे नक्की.

संपूर्ण पश्‍चिम आशियातच वेगवेगळ्या कारणांनी भरपूर अस्वस्थता खदखदत आहे. गेल्याच आठवड्यात तुर्कस्तानमध्ये रशियन राजदूताची हत्या करण्यात आली. राजदूताची हत्या हे फार गंभीर प्रकरण असते. एका अर्थाने तो राजदूत ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो, त्या देशावरील हा हल्ला समजला जातो. त्या पाठोपाठ नववर्षाच्या प्रारंभीच सांताक्‍लॉजच्या वेषातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. तुर्कस्तान सीरियाच्या यादवी युद्धात गुंतलेले आहे.

सीरियातील यादवी युद्ध सुरू झाल्यापासून अलेप्पो शहर बंडखोर गटांच्या ताब्यात होते. त्या शहरावर सीरियन सरकारच्या लष्कराने रशियाच्या मदतीने वेढा दिला होता. अन्न आणि औषधांच्या अभावी शहरातील प्रतिकार थंडावत गेला. ते शहर सरकारच्या हातात जात आहे, असे दिसताच शहरात अडकलेल्या हजारो निरपराध नागरिकांना आणि बंडखोर गटांना शहरातून सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी तुर्कस्तानचे प्रयत्न चालू होते. सीरियाच्या सरकारवर दबाव यावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा प्रयत्न केले गेले. तुर्कस्तानात याच वर्षी लष्कराच्या एका गटाने उठावाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तुर्कस्तानच्या अंतर्गत राजकारणात तेव्हापासून बरीच उलथापालथ चालू आहे. हजारो लोकांना अटक करण्यात आली असून, लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अधिकाधिक धर्मवादी आणि हुकूमशाही बनत चालले आहे. एकीकडे सरकारला असे आव्हान मिळाले असताना दुसरे आव्हान कुर्दिश गटांकडून आले आहे. तुर्कस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कुर्दिश बंडखोर गटांनी सुद्धा उचल खाल्ली असून, सीरियातील यादवी युद्धाचा त्यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न करून आपली कुर्दिस्तानची मागणी ते पुढे करत आहेत. सीरियातील यादवी संपण्याची चिन्हे नाहीत. बाजूलाच असलेल्या इराकमध्ये इसिसच्या ताब्यातील ‘मोसुल’ हे महत्त्वाचे शहर आपल्या ताब्यात परत यावे यासाठी इराकी लष्कराची कारवाई चालू आहे. मात्र दोन महिने होऊनसुद्धा या कारवाईला यश आलेले नाहीये.

सौदी अरेबिया येमेनमध्ये युद्ध लढत असून, गेले वर्षभर सौदी हवाई हल्ले चालू आहेत. मात्र ते यादवी युद्धसुद्धा सीरियाप्रमाणेच रेंगाळत असून, परिथिती सौदीच्या बाजूने झुकण्याची काहीही लक्षणे येमेनमध्ये नाहीत. उलट हजारो निरपराध नागरिक येमेनमध्ये सौदी हवाई हल्ल्यांत मारले गेले असून, युद्ध चिघळतच चालले आहे. त्यातच दुसरीकडे तेलाच्या घसरत्या किमतींमुळे सौदी अरेबियाचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आटला आहे. हे सर्व कमी वाटावे की काय, अशी गोष्ट म्हणजे सुन्नी सौदी अरेबियाचा राजकीय आणि धार्मिक बाबतीतला स्पर्धक शियाबहुल इराण सामर्थ्यवान होताना दिसत आहे. गेल्या वर्षी इराणशी अमेरिकेने अणुकरार केल्यापासून इराण आंतराराष्ट्रीय तेलाच्या आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येताना दिसत आहे. इराण ही सीरियातील यादवी युद्धात महत्त्वाची सत्ता आहे. सीरियाच्या सरकारला इराणने लष्करी सल्लागार पुरवले असून, असाद यांना टिकवण्यात इराणला रस आहे. तिकडे येमेनमध्ये चाललेल्या यादवी युद्धाला सुद्धा शिया आणि सुन्नी यांच्यातील स्पर्धेचा रंग असून, इराणचा हस्तक्षेप रोखण्यासाठी सौदी अरेबिया येमेनमध्ये उतरला आहे, असे सौदीचे म्हणणे आहे. सीरियातील बंडखोर गटांना अमेरिका, तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि इतर आखाती सुन्नी राजवटींचा पाठिंबा होता. तर सीरियन सरकारला इराण आणि रशियाचा पाठिंबा आहे. रशिया गेली दोन वर्षे पश्‍चिम आशियात सक्रिय झाला आहे. गेल्याच आठवड्यात सीरियातील यादवी युद्धाच्या संदर्भात इराण, रशिया आणि सीरिया यांनी एक संयुक्त पत्रक प्रसृत केले आहे. पश्‍चिम आशियाला लागूनच असलेल्या उत्तर आफ्रिकेतील इजिप्त आणि लिबियात अंतर्गत तणाव आहेत.

इजिप्तमध्ये पुन्हा लष्करी सरकार आले. त्याचाच शेजारी असलेल्या तेलसंपन्न लीबियात गद्दाफी गेल्यापासून शांतता प्रस्थापित होताना किंवा तेल उत्पादन पुन्हा सुरू होताना दिसत नाहीये. लीबियात विविध गट एकमेकांत भांडत असून, ‘इसिस’साठी लीबिया हे एक मोठे केंद्र तयार झाले आहे. लीबियातील अस्वस्थतेमुळे उत्तर आफ्रिका आणि पश्‍चिम आफ्रिका या दोन्ही प्रदेशांवर प्रभाव पडला आहे. 

पश्‍चिम आशियातील अनेक देश अमेरिकेचे मित्र आहेत. त्यामुळे पश्‍चिम आशियात अमेरिका काय भूमिका घेते, हे नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. त्यातच अमेरिकेतील सत्तांतरामुळे अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांना ओबामा यांच्या काळातील पश्‍चिम आशियाविषयक धोरण मान्य आहे असे त्यांच्या भूमिकांवरून वाटत नाही. त्यामुळे ते काय धोरणे आखतात याची दिशा ठरून प्रत्यक्ष परिणामांची कल्पना येण्यास वेळ लागेल. त्यातच लीबिया, सीरिया, इसिस आणि येमेन यापैकी कोणताही प्रश्न नजीकच्या काळात सुटणार नाही,इतकी गुंतागुंत तिथे आहे. प्रश्न  सोडवण्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीच हवी. मात्र अमेरिका आणि नव्याने आक्रमक झालेला रशिया या दोन्ही सत्तांची पश्‍चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इच्छा याविषयीच शंका आहे.

Web Title: Sankalp Gurger write about west asia crisis