जिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...

santosh shintre
santosh shintre

समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प नुकताच सुरू केला. त्याच्या या प्रयत्नांविषयी...

सात वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये सोळा वर्षांचा असलेला बोयान स्लाट, ग्रीसला पाण्याखालची रंगीबेरंगी दुनिया पाहायला गेला, तेव्हा ही सहल आपलं जीवनध्येय मिळवून देणारी ठरेल हे त्याच्या गावीही नव्हतं. पण तिथल्या समुद्राखालच्या दुनियेत त्याला मासे कमी आणि प्लॅस्टिक जास्त दिसलं, त्यामुळं तो अस्वस्थ झाला. फक्त चारचौघांसारखा हा सल त्यानं सोडून न देता उरी बाळगला. आज २४ वर्षांचा बोयान, ‘ओशन क्‍लीनअप’ कंपनीचा संस्थापक आणि ‘सीईओ’ आहे. पाच वर्षे अखंड प्रयोग करून त्यानं आजवरचा समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू केला आहे. २०१३मध्ये या प्रकल्पासाठी वीस लाख डॉलर भांडवल लोकवर्गणीतून त्यानं उभं केलं. त्यानंतर तीन कोटी डॉलरची भर त्यात घातली. एप्रिल २०१९ पर्यंत ५० टन आणि २०४० पर्यंत संपूर्ण जगात समुद्रात जमा झालेल्या प्लॅस्टिकपैकी ९० टक्के प्लॅस्टिकचं समुद्रातून समूळ उच्चाटन हे त्याचं उद्दिष्ट आहे.

आजमितीला जगातील सर्व समुद्रांमध्ये तरंगतं प्लॅस्टिक १५ कोटी टन आहे आणि त्यात प्रतिवर्षी ८० लाख टनांची भर पडते. या प्रदूषणामुळं प्रति वर्ष तेरा अब्ज डॉलरचं नुकसान सागरी जीवन, पर्यटन, मासेमारी आणि सागराधारित उद्योगांना सोसावं लागतं. सागरी अन्नातून त्यातले विषारी प्रदूषक घटक आपल्या खाण्याच्या थाळीत येतात तो धोका वेगळाच. समुद्री घाणीतील ७० टक्के भाग अशा विघटन न होऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकचा आहे. आकारानुसार या प्लॅस्टिकचं वर्गीकरण केलं जातं. मेगा-प्लॅस्टिक म्हणजे प्रति कण ५० सेंमी अथवा अधिक व्यास असलेलं. त्याखाली मेक्रो-प्लॅस्टिक ५ ते ५० सेंमी व्यास, त्याखाली मेसो-प्लास्टिक ०.५ ते ५ सेंमी व्यास असलेलं आणि सर्वाधिक धोकादायक, निर्मूलन व्हायला सर्वांत अवघड - मायक्रो प्लॅस्टिक ०.०५ ते ०.५ सेंमी व्यास असणारं. सागरी जिवांना मायक्रो प्लॅस्टिक हे अन्नकण वाटतात, त्यामुळे ते अधिक धोकादायक मानलं जातं.

‘ओशन क्‍लीनअप’नं २०१४ आणि २०१५ मध्ये प्लॅस्टिकची विखुरण समुद्रात उभ्या थरांमध्ये कशा पद्धतीनं होते हे हाय रिझोल्युशन उपकरणांनी पृष्ठभागाखाली पाच मीटरपर्यंत मोजलं. प्लॅस्टिकचे कण आकारानं जितके रोडावत जातील, तितके ते समुद्री वारे आणि लाटांमुळे अधिकाधिक समुद्रात मिसळतात. पण खवळलेल्या समुद्रातही ते पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या जरा खाली राहतात. मोठे तुकडे तर अधिक तरणक्षमतेमुळं वरच तरंगतात. पाण्याहून वजनानं जड, खाली बुडणारे प्लॅस्टिकही प्रदूषण घडवतात, पण तुलनेनं त्याचं प्रमाण कमी. ‘ओशन क्‍लीनअप’च्या निष्कर्षांनुसार आज समुद्रात शिरलेलं ९२ टक्के प्लॅस्टिक आकारानं मोठंच आहे. त्याचं रूपांतर अद्याप मायक्रो प्लॅस्टिकमध्ये झालेलं नाही. दीड मिलिमीटरपेक्षा कमी व्यासाचे कण अद्यापही एकूण घाणीच्या ०.७७ टक्के इतकेच आहेत आणि म्हणूनच बोयान म्हणतो की आत्ताच कृती आवश्‍यक आहे. प्लॅस्टिक समुद्रात नक्की कोणत्या मार्गांनी येतं आणि ते इतक्‍या लांबवर कसं पसरतं हे पाहणं विषादपूर्ण रीतीनं ‘इंटरेस्टिंग’ आहे! किनारपट्ट्या, समुद्रतळ, समुद्राचा पृष्ठभाग, त्यातील पाण्याचा स्तंभ या सर्व भागांमध्ये हा प्लॅस्टिकरूपी राक्षस असतो. नदीतून आणि वाऱ्यामुळं ते समुद्रात शिरतं. तसंच अक्वाकल्चर, जहाजं आणि मासेमारीमुळं ते समुद्रात येतं. गोड्या पाण्याच्या नद्यांमधून येणाऱ्या प्लॅस्टिकचं प्रमाण सर्वाधिक आहे.

प्लॅस्टिक इतक्‍या लांबवर पसरतं ते समुद्री भोवरायुक्त-प्रवाहांमुळे. या प्रवाहांमुळं समुद्री घाणीचे पाच विशाल पट्टे समुद्रात निर्माण झाले आहेत. बोयान त्यातला सान फ्रान्सिस्को ते हवाईदरम्यानचा एक पट्टा साफ करू पाहतो आहे. हा पट्टा सर्वांत मोठा म्हणजे टेक्‍सास शहराच्या दुप्पट आकाराचा आहे. पारंपरिक मार्गांनी हे सगळं साफ करण्यासाठी लागणारी जहाजे, जाळी यांच्या किमती, वेळ, मानवी श्रम, ऊर्जा आणि मुळात त्या यंत्रणेनं सोडलेला कार्बन याच्या हिशेबात परवडत नाही हे लक्षात आलं होतंच. प्लॅस्टिक मुख्यत्वे समुद्रात वाहत जातं ते वारा, लाटा आणि समुद्रप्रवाहाची दिशा यानुसार. बोयन म्हणतो, ‘‘आम्हीही प्लॅस्टिकसारखंच वागायचं ठरवलं.’’ या एकूणच यंत्रणेची संरचना मोठी स्वारस्यपूर्ण आहे. पहिली पायरी प्लॅस्टिक ‘पकडणं’ (capture). दुसरी, एकत्र करणं. (Accumulate) तिसरी समुद्रातून वेचून काढणं (extract), आणि चौथी-जमिनीवर तो माल पोचता करणे. (landing). यात ‘विल्सन’ अशा नामकरणाचा ६०० मीटरचा तरंगता पाइप आहे. त्याचा आकार इंग्रजी U सारखा आहे. त्याच्या खाली  तीन मीटर खोलीचं जाळं आहे. त्याचा आकार स्कर्टसारखा आहे. हे जाळं प्लॅस्टिक पकडण्या/कोंडण्यासाठी वापरलं जातं. या पाइपला फ्लोटर लावल्यानं तो तरंगत तर राहतोच; पण आसपास असलेल्या, काहीशा खाली तरंगत असणाऱ्या प्लॅस्टिकला सुटू देत नाही. त्यामुळे हा पाइप वारा, लाटा आणि प्रवाहानुसार तरंगत राहतो. समुद्रात पृष्ठभागाखाली तरंगत्या प्लॅस्टिकला फक्त पाण्याचा प्रवाहच दिशा देत असतो. पण फ्लोटरला मात्र वारा आणि लाटा या दोन्ही शक्ती हलता ठेवतात. त्यामुळे ही यंत्रणा प्लॅस्टिकपेक्षा जरा अधिक वेगानं प्रवास करते. पृष्ठभागावर असल्यानं हे करण्यात तिला वाऱ्याची मदत होते. हळूहळू प्लॅस्टिक पाइपच्या मध्यभागात एकवटत जातं. पाण्याखालच्या ‘स्कर्ट’च्या वजनामुळं आणि वाऱ्यांमुळं पाइपला आपसूक इंग्रजी U आकार प्राप्त होऊन तो वर बदलत्या वाऱ्याच्या दिशेनुसार स्वतःची दिशा खूप जास्त बदलून न घेता कार्यरत राहतो.

दर सहा ते आठ आठवड्यांनी जहाज येऊन ते किनाऱ्यावर घेऊन जातं. ‘विल्सन’वर ज्या छोट्या इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा आहेत, त्या सौर-ऊर्जेवर चालणाऱ्या  आहेत. फ्लोटरची हालचाल तर शंभर टक्के नैसर्गिक ऊर्जेवरच होते. फक्त प्लॅस्टिक जमा करून जमिनीवर आणणारं जहाज तेवढं डिझेलवर चालतं. आता लवकरच तेही जैव-डिझेलवर चालवलं जाईल आणि या सर्वांचं एकत्रित कार्बन पद चिन्ह (कार्बन फूट-प्रिंट) प्लॅस्टिक जमा करून वाचवलेल्या नुकसानीच्या किमतीपेक्षा कित्येक पटींनी कमीच आहे. या यंत्रणेची इतर जहाजांबरोबर टक्कर होऊ नये, यासाठी सागरी संचार करणाऱ्या जहाजांना ही यंत्रणा सध्या नक्की कुठं आहे हे आधी कळवलं जातं. समुद्री जिवांसाठी ही यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रथमतः तिचा वेग अत्यंत कमी  म्हणजेच दहा सेंमी प्रतिसेकंद इतकाच असल्याने त्यांना काही धोका ती पोचवत नाही. यंत्रणेचा स्कर्टसारखा पृष्ठभागाखालील भाग ‘जिओ टेक्‍स्टाइल’ नामक विशिष्ट धाग्यांनी बनवलेला असून, समुद्री जीव त्यातून ‘पास’ होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्याखालूनही जीव सहजगत्या मार्ग आक्रमू शकतात.

प्लॅस्टिकचा मूळ वापरच जगात कमी होणार नसेल, तर ‘ओशन क्‍लीनअप’ किंवा तत्सम तंत्रज्ञानाधारित उपाय तरी किती पुरे पडणार? पण करून ठेवलेली घाण आणखी धोकादायक ठरण्याच्या आत तिचं समूळ उच्चाटन समुद्रातून करणं हे बोयानचं उद्दिष्टही किरकोळ नाहीये. भारतात आपण प्लॅस्टिक कमीत कमी वापरणं आणि बोयानच्या जातीचा आम्हा मिळो कोणी, अशी प्रार्थना करणं इतकंच काय ते आपण सर्वांना सांप्रत काळी शक्‍य आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com