भाष्य : गोंगाटी निज शांततेस जपणे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sound Pollution
भाष्य : गोंगाटी निज शांततेस जपणे...

भाष्य : गोंगाटी निज शांततेस जपणे...

ध्वनिप्रदूषणासारख्या समस्या अक्राळविक्राळ होऊ लागल्या आहेत. सुरक्षित आवाजाची मानके बासनात गुंडाळली जात आहेत. गोंगाटामुळे दोन अब्ज लोक कानाच्या विकाराने बाधित होतील, हा अंदाज भयावह आहे. आजच्या (ता.२७) ‘आवाज जागृती दिना’निमित्त, या समस्येवर टाकलेला प्रकाश.

जगभरात १९९६ पासून २७ एप्रिल हा दिवस ‘आवाज जागृती दिवस’ म्हणून साजरा होतो. माणसाने आपल्यापुढील प्रश्न इतके वाढवून ठेवले आहेत, की जवळपास प्रत्येक दिवस कसलातरी जागतिक दिवस असतोच. अनेकदा असे दिवस साजरे करण्यासारख्या प्रतीकात्मक कृती निदान आपल्याला प्रश्नाच्या व्याप्तीची, गांभीर्याची जाणीव करून देतात हे खरेच. अशा दिनानिमित्ताने त्या-त्या प्रश्नाबाबतच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतीला असे दिवस ‘एक धक्का जोरसे’ असे ठरतात, हेही खरेच. काय आहे आवाज जागृती दिवसा’चे महत्त्व? त्यासाठी ध्वनी प्रदूषणाचे गांभीर्य समजावून घेऊ. सतत चोहीकडून कर्कश्श, गोंगाटी आवाज आदळत राहिल्याने बहिरेपणा, रक्तदाब विषयक हृदयाच्या व्याधी, मानसिक आजार आणि काही वेळा कर्करोग होतो, हे जगभरातील संशोधनांनी कैकदा सिद्ध केले आहे. प्राण्या-पक्ष्यांमध्येही हा गोंगाट त्यांचे निसर्गचक्र, वर्तन-ताल बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. त्यांचे जीवनचक्र बिघडले की हवामान-बदलाला आणखी आमंत्रण मिळते. ध्वनीविषयक दीर्घ मुदतीच्या तक्रारींमध्ये बहिरेपणाबरोबरच सामाजिक तुटलेपण, खिन्नता, पडण्याची भीती आणि विस्मरण, अल्झायमर यांसारख्या व्याधींचा समावेश होतो.

भारतातल्या ध्वनिप्रदूषणाबाबत काही ठळक घटकांना आणि स्त्रोतांना निश्चित जबाबदार धरता येतं. त्यांचा प्रभाव एकाच वेळी पडत नसला तरी प्रत्येक घटकाचा स्वतंत्ररित्या पडणारा प्रभाव एकमेकांमध्ये मिसळून त्याची परिणती गोंगाटसदृश ध्वनीमध्ये होते. हे घटक पुढीलप्रमाणे- शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्यावाढ, दारिद्र्य आणि निरक्षरता. तसेच अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी न होणे आणि रूढी-चालीरिती, उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम. या सर्व घटकांमुळे सुरक्षित आवाजाची जगभरातील आणि भारतातील मानके बासनात गुंडाळली जातात. (निवासी क्षेत्रात दिवसा स्वीकारार्ह मर्यादा ५५ डेसिबल, तर रात्री ४५ डेसिबल आहे. व्यावसायिक क्षेत्रात ती दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल. संवेदनशील क्षेत्रात ही मर्यादा दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल आहे.)

भारतवासीयांना इशारा

डॉ. यशवंत ओक आणि मधू दंडवते यांच्या प्रयत्नाने ‘ध्वनी’ हा निव्वळ ‘उपद्रवकारक घटक’ मानला न जाता, पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ मध्ये प्रदूषक म्हणून समाविष्ट झाला. डॉ. ओक, शाद अली, सुमैरा अब्दुल अली, मराठी विज्ञान परिषद, डॉ.जॉन पनिकर असे अनेक समर्पित कार्यकर्ते भारतातील ध्वनी प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) मार्च २०२१ मध्ये प्रकाशित झालेला ‘वर्ल्ड रिपोर्ट ऑन हियरिंग’ असे दर्शवतो की, २०५०पर्यंत ऐकण्याची शक्ती जवळपास गमावून बसणाऱ्या अडीच अब्ज लोकांपैकी सर्वाधिक लोक भारतीय उपखंडातील असतील. हे टाळायचे असेल, तर अधिकाधिक लोकांना आपली श्रवणक्षमता कमी होते आहे, याची वेळेत जाणीव होणे. तशी ती व्हावी, म्हणून श्रवणक्षमतेची चाचणी वेळोवेळी करणे आवश्यक ठरते. त्यातही बहिरेपण येण्याचा धोका ज्या लोकांमध्ये अधिक असतो, त्यांनी तर ती करून घेणे अत्यावश्यक ठरते. असे लोक म्हणजे मोठ्या आवाजात संगीत ऐकणारे किंवा आवाजी जागेत काम करणारे, श्रवणक्षमतेला बाधा पोचू शकेल अशी औषधे घेणारे आणि साठपेक्षा अधिक वय असलेले.

या गटांमधीलही ‘आ बैल मुझे मार’ प्रकारातले लोक म्हणजे पर्सनल म्युझिक प्लेयर्सद्वारे (पीएमपी) मोठ्या आवाजात संगीत ऐकणारे, बहुदा तरूण वयातील लोक. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील साधारण एक अब्ज तरूणांना असुरक्षित संगीत श्रवणामुळे बहिरेपण येण्याचा धोका संभवतो. मध्यम आणि उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांमधील १२-३५ वयोगटातील जवळपास ५० टक्के तरूणाई स्मार्टफोन अथवा एमपी-थ्री प्लेयर्सद्वारा आवाजाची धोकादायक पातळी असलेले संगीत ऐकते. सुमारे ४०टक्के तरूण नाइट क्लब्ज, डिस्कोथेक अथवा बारमध्ये अशा प्रकारे संगीत ऐकतात. जगभरात एकट्या २०१६मध्ये दीड अब्ज स्मार्टफोन विकले गेले, हेही आरोग्य संघटनेला धोक्याचे निदर्शक वाटले.

‘मेक लिसनिंग सेफ...’

या चिंतेतूनच जन्म झाला, तो डब्ल्यूएचओ आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (आयटीयू) यांच्या, तसेच डॉक्टर, श्रवण तज्ज्ञ, ध्वनी तज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ, कम्युनिकेशन आणि प्रॉडक्ट डेवलपमेंट यातील तज्ज्ञ यांच्या परस्पर समन्वयातून निघालेल्या ‘ऐकणे सुरक्षित करूया...’ (मेक लिसनिंग सेफ) उपक्रमाचा. या पाश्चात्य लोकांचं हे एक बरं असतं. प्रश्नाचा नीट अभ्यास आणि मग त्यावर तातडीने काय कृती, उपाययोजना करता येईल ते पाहून तिचे अंतिम स्वरूप निश्चित करून टाकणे. अर्थात आपल्याकडची प्रश्नाला राजकीय रंग देऊन धुळवड खेळण्याची, प्रश्न प्रलंबित ठेवण्याची मजा त्यात बिलकूल येत नाही. असो. तर ‘मेक लिसनिंग सेफ’अंतर्गत त्यांनी अशा पर्सनल म्युझिक प्लेयर्सच्या उत्पादकांनाच काही शिफारशी केल्या आहेत. पण त्या पालक, खुद्द तरुणाई अशा सर्वांनी विचार आणि कृती करावी अशाच आहेत. त्या अशा :

१. प्रत्येक उपकरण श्रोत्यासाठी सुरक्षित आवाज व ऐकण्याची वेळ मोजू शकले पाहिजे. यासाठी ससंदर्भ दोन पर्याय देता येतील. - एक प्रौढांसाठी ८० डीबी -''ए फॉर ४० अवर्स अ विक’ला समकक्ष तर, दुसरे, मुलांसाठी ७५ डीबी- ए, ४० अवर्स अ विक’ला समकक्ष.

२. हे सर्व करण्यासाठी उपकरणातच वापरकर्ता केवढा मोठा आवाज ठेवून ऐकतो आणि किती वेळ त्यावर घालवतो हे मोजण्याची आणि दर्शवण्याची सोय हवी. प्रत्येक उपकरणात आवाजाच्या तीव्रतेची मर्यादा आणि पालकांतर्फे नियंत्रणाची सुविधा हवी.

३. उपकरणाचा पृष्ठभाग, कार्य परिचय पुस्तिका आणि अगदी वेष्टण या सर्वांवर सुरक्षित श्रवण विषयक सूचना, कृती, सर्वसाधारण माहिती हे सर्व द्यावे.

डब्ल्यूएचओ निव्वळ सूचना देऊन थांबली नाही. २०१९ मध्ये त्यांचं the hearWHO हे अॅप आलं. वापरकर्त्याला ते आपली श्रवणस्थिती काय पातळीवर आहे, ते एका हियरिंग स्क्रीनरद्वारा तपासून सांगते. वापरकर्त्याच्या नोंदी ठेवते. विशेषतः संगीत असुरक्षित पद्धतीने ऐकणाऱ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे; पण आरोग्य सेवकही ते वापरून लोकांच्या चाचण्या प्राथमिक पातळीवर घेऊन गरज असल्यास त्यांना पुढील वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठवू शकतील. असेच आणखी एक अॅप, सभोवतालची ध्वनीपातळी सहजी मोजते. वेगळा डेसिबल मीटर घ्यावा लागत नाही. हे आहे साऊंड मीटर नावाचे अॅप. हे निव्वळ मोजणी केलेले आकडेच साठवून ठेवत नाही-तर प्रत्यक्ष आवाजही साठवून ठेवते.

विसाव्या शतकामध्ये मानसशास्त्रज्ञांनी ध्वनीग्रहणाबाबतच्या दृष्टीकोनाचं मानसशास्त्र खूप अभ्यासलं आहे. ध्वनी हे आपल्या एका ग्रहणेंद्रियाला गुंतवणारं प्रदूषक असल्यामुळे हे योग्यच होतं, पण विसाव्या शतकात दुर्लक्ष कशाकडे झालं असेल तर ते ध्वनी निर्माण करणाऱ्यांच्या मानसिकतेकडे. काही लोकांना इतरांवर ध्वनी लादावा असं का वाटत असेल, हे शोधावं लागेल. भारतात ही बाब आत्यंतिक महत्त्वाची असेल!

Web Title: Santosh Shintre Writes Sound Pollution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..