हौस ऑफ बांबू : एका लग्नाची बोलणी..!

नअस्कार! जरा कान इकडे करा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मांडवात वेगळीच सोयरिक जमण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Hous of bamboo
Hous of bamboosakal

नअस्कार! जरा कान इकडे करा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मांडवात वेगळीच सोयरिक जमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता लगीनगाठी काही इथे पृथ्वीवर जुळत नाहीत, ‘वर’ स्वर्गात जुळतात. इथे फक्त योग जमतो. पण खरंच औंदा असा काही योग आहे का? हे येणारा काळच ठरवेल.

‘एका लग्नाची गोष्ट’ (पहिली, दुसरी, तिसरी वगैरे) फेम थोर अभिनेते आणि परमनंट लग्नबाधित प्रशांत दामले ऊर्फ दामलेमामा यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी झक्क स्थळ आणलं आहे, असं दिसतं. विषय काढून हळूच टिपण पुढे सरकवण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. आता पुढचं पुढे!

त्याचं झालं असं की, गेल्या आठ ऑगस्टला महाराष्ट्र साहित्य परिषदेत कै. कल्याणराव जाधव सभागृह आणि अभ्यासिकेचं उद्घाटन झालं. छान सुसज्ज हॉल आहे, पण तिथं अजून लिफ्ट नाही. (म्हणून की काय कोण जाणे) उद्घाटनाचा सोहळा पार पडला तळमजल्याच्या माधवराव पटवर्धन सभागृहात!!

तिथं बोलताना दामलेमामांनी विषय काढला… आधी त्यांनी उपस्थितांना बरंच हसवून घेतलं. (नेहमीप्रमाणे एण्ट्रीलाच टाळ्या!!) बायकोचं ऐकावं लागतं, घरातसुद्धा नाटकं करावी लागतात, वगैरे नुस्खे सांगितले…आणि बोलता बोलता ‘त्या अमक्यांची थोरली मुलगी किंवा तमक्यांचा धाकटा मुलगा लग्नाचा आहे’ असं सांगायची पद्धत असते, अगदी तस्सं केलंन!!

ते म्हणाले : अहो, काय सांगू? नाट्य परिषदेचा अध्यक्ष झालो खरा; पण वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना सोबत नेताना भलतंच अवघड होतंय. काय करावं कळत नाही. (तुमच्या) साहित्य परिषदेकडे नाही म्हटलं तरी चांगला ११८ वर्षांचा अनुभव आहे. आमची नाट्य परिषद काय, तुमची साहित्य परिषद काय, दोघांचीही दिशा एकच! (म्हणजे नेमकी कुठली? असो.) दोघांनी एकत्र येऊन काम केलं, दोनचे चार झाले तर सोन्याहून पिवळं…काय?’

झाऽऽलं! प्रपोजल ऐकूनच पंधराएक संभाव्य वऱ्हाडी तीनेक मिनिटं निपचित पडले. लेखक आणि रंगकर्मी या दोन्ही प्रजाती एकत्र आल्या, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात काय काय भूकंप होतील, ही कल्पना त्यांना सहन होईना. नाट्य परिषदेसोबत काम करायला आमचे साहित्यिक एका पायावर तयार होतील. साहित्यिक करतात, तेवढी नाटकं रंगकर्मीही करत नसतील, असं सर्टिफिकेट मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंदबुवा जोशी यांनी तिथल्या तिथंच देऊन टाकलं. जोशीबुवांना साहित्यिकांच्या नाट्यगुणांची पूर्ण कल्पना आहे.

काही साहित्यिक अशा योग्यतेचे नट आहेत की दामलेमामांवर नाटक सोडून पुस्तकं लिहिण्याची पाळी यावी! पुढल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीत अमळनेरात होऊ घातलंय, आणि अखिल भारतीय नाट्य संमेलन तर शंभर नंबरी होणार असल्याने मुंबईत होणाराय. त्यासाठी डॉ. जब्बार पटेल यांची निवडही अध्यक्ष म्हणून जाहीर झाली आहे. महिनाभराच्या अंतराने दोन मांडव पडणार.

या काळात प्रायोगिक तत्त्वावर या मांडवातून त्या मांडवात काही वऱ्हाडी हलवण्यास हरकत नाही. म्हंजे उदाहणार्थ, साहित्य संमेलनात दामलेमामांच्या नाटकाचा प्रयोग लावावा, आणि नाट्यसंमेलनाच्या मांडवात प्रा. नेमाडेंना नामजाद करावे. घ्या म्हणावं हवी तितकी नाटकं!!

बाकी, नाट्य परिषद आणि साहित्य परिषदेचा जोडा जमला तर पुढेमागे एकाच मांडवात दोन्ही संमेलनं उरकून घेण्याचाही प्रस्ताव येऊ शकतो. पण त्यात तोटा आहे. दोघांनाही एकाच सरकारी अनुदानात भागवावं लागेल. एकूण या लग्नाची गोष्ट सुखांतिका होण्याची शक्यता कमीच. शिवाय एकनाड येत असल्यानं टिपण जुळणं मला तरी कठीणच दिसतंय. साहित्याबद्दल (किंवा परिषदेबद्दल म्हणा) दामलेमामांच्या मनात भलभलते गैरसमज आहेत, एवढं मात्र कळलं. चालायचंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com