हौस ऑफ बांबू : ‘बॅरिस्टर’ आणि ‘क्वीन’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हौस ऑफ बांबू : ‘बॅरिस्टर’ आणि ‘क्वीन’!
हौस ऑफ बांबू : ‘बॅरिस्टर’ आणि ‘क्वीन’!

हौस ऑफ बांबू : ‘बॅरिस्टर’ आणि ‘क्वीन’!

नअस्कार! नाटककार जयवंत दळवींच्या नाटकातील आद्य ‘बॅरिस्टर’ यांना काहीही करुन गाठणं भागच होतं. वेळच निकडीची होती. युद्धाची होती. पण त्यांना गाठायचं तरी कुठे आणि कसं? हल्ली काही लोक (अजूनही) मास्क वापरतात. मास्क लावलेल्यांना ओळखणंही कठीण जातं. कुणीतरी सांगितलं पुण्यानजीक डोंगरगावाच्या दिशेनं जा, कुणालाही विचारा.-सांगतील! तसा प्रयत्न करुन पाहिला. पण रिस्पॉन्स नाही! लोक चपापून रस्ताच बदलायला लागले! मग पार्ल्याला शिवानंद सोसायटीत शोध घेतला. तिथं सोसायटीच्या आवारात एका मास्कवाल्या गृहस्थांनी स्वत:हून विचारलं- ‘गोखले हवेत का?’ मी च्याट! म्हटलं ‘हो, तुम्ही कसं ओळखलं?’ तर मास्कवाले गृहस्थ म्हणाले, ‘त्यांनीच मला पत्ता रिडायरेक्ट करायला इथं बसवलंय! इथून पलिकडे ‘मातोश्री’ सोसायटीत जा, किंवा मग थेट आमच्या जॉगर्स पार्कमध्ये! हातात काठी घेतलेले गृहस्थ दिसले की हाक मारा, गोखलेऽऽऽ…अशी! तीन वेळा तुमच्याकडे वळून बघतील, ते गृहस्थ म्हंजे तुमचा कथानायक बरं का!’ शेवटी पार्ल्याच्या जॉगर्स पार्कमध्ये भल्या सकाळी मला बॅरिस्टर गोखले ऊर्फ विक्रमबाप्पा (‘आप्पा आणि बाप्पा’ मधले बाप्पा!) एकदाचे भेटले. हातात काठी होतीच. तो टीव्हीमालिकेतला त्यांचा सुप्रसिद्ध तीन-तीनदा वळून बघण्याचा लुकसुद्धा दिला! (मी जागच्या जागी खल्लास!) बोलायला जाण्याआधीच त्यांनी दोन वैधानिक इशारे दिले : हे पहा, मी बोलीन, पण मध्येच तुमचा मोबाइल फोन वाजला तर मी ताबडतोब थांबवीन!

दुसरं म्हंजे काहीही विचारण्यापूर्वी सरहद्दीवरल्या सैनिकांसाठी दोन मिनिटं मौन पाळा! कळलं?’’ नाटकाच्या प्रत्येक प्रयोगापूर्वी रसिकांना दमात घेणारा एक नटश्रेष्ठ आपल्यासमोर उभा आहे, याची तत्क्षणी जाणीव झाली…दोन मिनिटं गप्प उभी राहिल्ये. साक्षात नटश्रेष्ठ विक्रमबाप्पा जागच्या जागी धावत माझ्याकडे रोखून बघत होते. मलाही त्यांनी जागच्या जागी कुदायला फर्मावले. संपूर्ण मुलाखत कुदत कुदतच झाली… हातातली काडी उजळत त्या ज्योतीत निरखून पाहात ते म्हणाले ‘ग्लोरियाऽऽ…माय क्वीन!’ मला एकदम ‘बॅरिस्टर’ नाटकातला सीनच आठवला.

‘इश्श, ग्लोरिया कुठली? ‘कंगना द क्वीन’ म्हणायचं असेल तुम्हाला…,’ मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. ‘‘ अर्थात, तिला ‘पद्मश्री’ मिळाला आहे,’’ विक्रमबाप्पा गालातल्या गालात हसत म्हणाले.

‘तिचे सिनेमे बरेच आवडतात असं दिसतं!,’ मी.

‘तिचा पद्मावत आवडला होता…,’ शब्दागणिक एक पॉज घेत ते म्हणाले. एकीकडे ‘पद्मश्री, पद्मश्री’ असा जप चाललाच होता.

‘ती दीपिका पडुकोण होती...,’ मी ऐतिहासिक चूक सुधारली.

‘कुणाला काय म्हणायचं हे स्वातंत्र्य मला आहे की नाही?,’ गोखलेजी संतापून म्हणाले.

‘२०१४ पास्नं तरी आहे! आधी नव्हतं,’’ त्यांना बरं वाटावं म्हणून बोलले. ‘‘हे पहा, मी माझ्या विधानावर ठाम आहे. ‘पद्मावत’ मध्ये कंगनाच होती, महागाईचा आणि मोदीजींचा संबंध नाही, आणि खरं स्वातंत्र्य २०१४ सालीच मिळालं,’’ बोटं मोडत त्यांनी तीनतीनदा बजावून सांगितलं. ‘‘काळजी घ्या हं!,’’ मी इकडे तिकडे बघत म्हणाले. ‘‘ही टोळक्यातली गावठी कुत्री…भुंकणारच. मला कीव येते तुमच्यासारख्या पत्रकारांची. घरचं रेशन भरण्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागतं. दया येते मला, खरंच!’’ त्यांच्या डोळ्यात अथांग करुणा बघून माझेच डोळे पाणावले. ‘‘दया येते तर मग हातात काठी कशाला?,’’ मी. ‘‘कारण तुम्ही पत्रकार म्हणून भिकारडे आहातच, पण माणूस म्हणूनही नीच आहात!,’’ विक्रमबाप्पा म्हणाले, आणि एवढे बोलून जॉगिंग करत निघून गेले. ‘बॅरिस्टरां’नाही ‘पद्मश्री’ मिळू द्या बाबा, एवढी प्रार्थना करुन मी निघाल्ये! असो!!

loading image
go to top