पाटलांच्या वाड्यावर...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटलांच्या वाड्यावर...!

पाटलांच्या वाड्यावर...!

नअस्कार! गेल्या शुक्कीरवारापास्नं मला मेलीला काय झालंय कळत न्हवतं. कुणी नाव विचारलं तर ‘चंद्रा’ असंच सांगत होत्ये. परवा नारायणपेठेत पुस्तकांच्या दुकानी गेले तर तिथं एक पत्रकार भेटले. (नाव न्हाई सांगनार!) त्यांना म्हटलं, ‘‘घ्या, पान घ्या...कातचुना, वेलदोडा...!’’ ते पत्रकार बिचारे घाबरुन अक्षरश: हातात चपला घेऊन पळाले!! पण माझा काही येळकोट जाता जात नव्हता. त्याचं असं झालं की येकडाव ‘चंद्रमुखी’चा शो बघायला गेल्ये. सिनेमा संपल्यानंतर जी बाहेर आली ती (कु.) सरोज नव्हतीच. ती चंद्रा होती...

...गेल्या हप्त्यातली गोष्ट आसंल. जुहूच्या गावाभाईर पालं पडली व्हती. सक्काळची येळ. दातण लावत तंबूभायेर उन्हं खात बसल्येवते. आमची मावशी कुटूनतरी मटकत आली नि म्हनाली, ‘‘अगं भवान्ये, उन्हातान्हात काळवंडलीस तर कोन इच्यारंल तुला? आन मग आमच्यासारक्यानं पोट कसं जाळायचं गं...गुमान आत जा!’’ मी रागारागानं चूळ टाकली.

तेवड्यात निरोप आला की, ‘‘बाई, वाड्यावर आर्जंट बलवलंय.’’ मावशी म्हनाली, ‘‘पाटलाचं बलवनं हाय, मर्जी राखशील, तर नशीब काढशील! बिगीनं नीघ, चल्जा!’’

‘‘कोन ह्यो तालेवार पाटील? असे वसाडगावचे पाटील लई पाह्यले, या चंद्रानं,’’ मी फणकाऱ्यानं म्हणाले.

‘‘आत्ता गं बया! वसाडगावचे पाटील म्हनतीस? जिभंला काही हाड तुज्या! आपलं पाटीलसाहेब ठावं न्हाईत तुला? ह्यो कुनी ऐरागैरा पाटील न्हाई, मराठी साहित्याच्या गावाचं पाटील हायेत! त्यांच्या बिगर परकाशकांचं पान बी हालत न्हाई! जाडच्या जाड बुकं लिवनारं पाटील हायेत त्ये!,’’ मावशीनं हातवारे करुन सांगितलं.

...तश्शी निघाले नि सरळ पाटलांच्या जुहूच्या वाड्यावर (पायातलं छुमछुम वाजवतच) गेले. उघड्या दिंडी दरवाजातनं गडगडाट ऐकू आला, ‘‘या, या की...!’’ काय ती सूरत, काय ती मूरत! व्हटांवर सात्त्विक हाश्य, गालाला खळी! त्या खळीत बुडी मारुन यावं, असं वाटाया लागलं...

तो चांद तेजाळताना, हे प्राण माझे ओवाळताना,

का प्रीत वेडी लाजते, श्वासात वेणू वाजते

येतील हाती ते स्वर्गसाती, आजन्म तू साथ दे...

या बहारदार गाण्यातल्या ओळी पाटीलसाहेबांचा फोटु ठेवूनच गुरु ठाकुरांनी लिवल्या आसतील्का? असं वाटून ग्येलं.

‘‘का याद केली गरीबाची?,’’ पायाच्या नखानं गालिचा कुर्तडत मी लाजून इच्यारलं.

‘‘मी याद केली? नाही हो, मी कशाला यादबिद करु? मी शिवचरित्र लिहायला घेतलंय!’’

हातातली कागदाची चळत बाजूला ठेवत ते घाबरुन म्हणाले. मला एकदम ते (हातात चपला घेऊन पळालेले) पत्रकारच आठवले! सोफ्याच्या मागं हुबं राहून त्यांनी इच्यारलं, ‘‘तुम्ही स..स...सरोजताई ना? परवा उदगीरला भेटलो होतो...’’

‘‘कु. सरोज!,’’ पूर्णपणे भानावर येऊन मी उत्तरले. विख्यात साहित्यिक विश्वासराऊ पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित चित्रपट सध्या तुफ्फान चालला आहे. अजय-अतुलची गाणी, आणि पाटीलसाहेबांची ष्टोरी यांनी ‘चंद्रा’ अंगांगात भिनली, त्याचा हा परिणाम!

‘‘तुमचं बरंय, सरासरी दीड हजार पानी पुस्तकं लिहायची, आता तर थेट खंडात्मक शिवचरित्रच लिहिताय...मध्येच एखादं पुस्तक पाश्शे पानात आटोपलं तर लगेच त्यावर चित्रपट करायचा! म्हंजे पांचो उंगलियां घी में, और सर कडाई में...’’ मी थोडीशी चेष्टा केली. (मनात अजूनही ‘टुडुडुंग टुडुडुंग चंद-रा...’ हे गाणं चाललंच होतं.) त्यावर पाटीलसाहेब चक्क लाजले!! (पण सोफ्यात येऊन बसले.) पुढे त्यांनी मला शिवचरित्र सांगायला सुरवात केली.

...पाटलांच्या वाड्यावरुन बाहेर पडले, तेव्हा माझे मन तमाशाच्या फडातून उडून थेट इतिहासात बुडून गेलेलं होतं. जगदंब, जगदंब!

Web Title: Saroj Chandanwale Write Chandramukhi Drama Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top