हौस ऑफ बांबू : मधु मागसी माझ्या सख्या परी...!

Hous-of-Bamboo
Hous-of-Bamboo

नअस्कार! गेले आठवडाभर एकच गाणे गुणगुणत्ये आहे. ‘मधु मागसी माझ्या सख्या परी, मधुघटचि रिकामे पडती घरी...’ गाणं सींदरचै. माझा आवाजही सींदरचै. (लिवस्टिक लावलं की सींदरच हणावं लागतं! असो.) माझं गुणगुणणं ऐकून एका ओळखीच्या प्राध्यापकांनी एकदा विचार्ल की, ‘‘काहो, सरोजमॅडम, आवाज बस्लाय का? गुळण्या करत होता का गरम पाण्याच्या?’’ किती अरसिक नं? गुळण्या आणि गुणगुणणं यातला फरक समजू नये त्यांना?

माझ्या गाणं गुणगुणण्याचं कारण होतं, आमचे लाडके लेखक मधुभाई. गेल्याच आठवड्यात नाशिकहून बातमी आली की यंदाचा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ आमच्या मधुभाईंना देण्यात येणारेय. ‘आमचे मधुभाई’ म्हंजे (तुमचे) प्रख्यात साहित्यिक आणि कोकणचे सुपुत्र, ‘माहीमची खाडी’ रा. रा. मधु मंगेश कर्णिक बरं का! बातमी ऐकून मी हर्खूनच गेल्ये.

वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर मधुभाईंना जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. चांगला लाखभर रुपयांचा पुरस्कार आहे. कोरोनाच्या काळात एकदम लाखभर म्हंजे (मराठी लेखकाला) पुष्कळच झाले. आम्हाला मेलं दिवाळी अंकाच्या लेखाचं मानधन अजूनही मिळत नाही, आणि मधुभाईना लाखभर! चंगळ आहे हं एका माणसाची!! (खुलासा : मानधनाची आठवण मा. संपादकांना व्हावी, म्हणून हा उल्लेख. वाचकांनी दुर्लक्ष करावे.)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेली साताठ वर्ष स्वत: मधुभाईच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. मावळत्या अध्यक्षाला आपल्याकडे नारळ देण्याची पध्दत आहे, मधुभाईंना प्रतिष्ठानने नारळासकट शाल आणि धनादेशही दिला. मधुभाईंनी जनस्थान पुरस्काराला प्रतिष्ठा मिळवून दिली. एका अर्थाने ते लोकल म्हंजे स्थानिकच. त्यादृष्टीने त्यांना ‘जनस्थानिक’ म्हटलं पाहिजे.

बाकी मधुभाईंची कमाल आहे. नव्वदीच्या उंबरठ्यावर त्यांची नवीकोरी कादंबरी प्रकाशित होऊ घातलीये. नाव विचारा! ‘प्रात:काल’!! हो, हो प्रात:काल! आहे की नाही कमाल?
नाही तर आम्ही! मला (इतक्‍या तरुण वयात) हल्ली गुडघ्यांचा त्रास सुरु झालाय. जिना चढवत नै, नि उतरवत नै. म्हंजे तारुण्य ऐन भरात असताना, आमचा संधिकाल, आणि यांचा मात्र प्रात:काल!! मधुभाईंनी ‘संधिकाल’ आधीच लिहून ठेवली आहे, हे बरं!

मुंबईत मिठी या शब्दाचा अर्थ लुप्त किंवा काल्पनिक नदी असा होतो, हे मला ‘खाडी’ वाचूनच कळलं होतं. तोपर्यंत मिठीचा एकच अर्थ मनात अगदी घट्ट बसला होता.
मिठी नदी आणि माहीमच्या खाडीनजीक राहणाऱ्या जनसामान्यांचे सामान्य जनजीवन अचूक टिपणाऱ्या मधुभाईंची खरोखर कम्मालच म्हटली पाहिजे. जनजीवनाचा हा काप साहित्यात आणायलाच हवा, असं मी नेहमीच म्हणत्ये. ‘मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले’ ही ओळ (संदर्भ : शब्दावांचून कळले सारे... हे भावगीत) मंगेशण्णा पाडगावकरांना मधुमंगेशांमुळेच सुचली, असंही काही लोक म्हणतात. रत्नागिरीत १९९० साली अ. भा. मराठी साहित्य संमेलन झालं होतं, तेव्हा मधुभाईच अध्यक्ष होते.

आपल्या भाषणात त्यांनी स्वच्छ सांगून टाकलं की ‘आजूबाजूचे जग कुतुहलाने, स्वच्छंदपणे, विस्मयाने आणि संवेदना जागी ठेवून न्याहाळावे. (हे अस्सल कोकणी स्वभावाचं वर्णन हं!) त्या जगातील कुरुपता-विरुपता, संगती-विसंगती, अंतर्विरोध-एकात्मता जाणून घेऊन त्यांचा आविष्कार ललित लेखनातून, कादंबरीतून करावा, एवढीच माझी मर्यादा आहे... (थोडक्‍यात संधी मिळेल तेव्हा आणि तेथे वाटेल त्या विषयावर लिहा!)’’

मधुभाईंना मी अभिनंदनाचा व्हाट्‌सॅप मेसेज पाठवून दिला आहे! सोबत एका लाल गुलाबाच्या फुलाची इमोजी!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com