esakal | हौस ऑफ बांबू : हा सूर्य... हाच चंद्र... हाच सायंतारा!

बोलून बातमी शोधा

Hous-of-bamboo}

नअस्कार! निळसर रंगावरुन काळसर जाणारी चंद्रकळा कपाटातून काढून ठेवली आहे. गजरा (ऑलरेडी) आणून माठावर (खुलासा : माठ म्हंजे थंड पाण्याचा मातीचा घडा! कुणी व्यक्ती नव्हे!) ठेवला आहे.

हौस ऑफ बांबू : हा सूर्य... हाच चंद्र... हाच सायंतारा!
sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! निळसर रंगावरुन काळसर जाणारी चंद्रकळा कपाटातून काढून ठेवली आहे. गजरा (ऑलरेडी) आणून माठावर (खुलासा : माठ म्हंजे थंड पाण्याचा मातीचा घडा! कुणी व्यक्ती नव्हे!) ठेवला आहे. आज मराठी भाषा दिवस! आज किनई संध्याकाळी नाटकाला जायचं आहे. नाटक शेजारच्या खोलीत आहे.-लॅपटॉपवर! नाटकाचं नाव- ‘हा सूर्य... हाच चंद्र!’ आमच्या लाडक्‍या ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे हे नाटक आज यूट्यूब च्यानलवर सादर करण्यात येणार आहे. (ग्लोबल प्रीमियर हं!) आमसुली रंगाचा झब्बा घालून आम्हीही एकेकाळी चतुरंगच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात होतो, म्हटलं! म्हंजे तसं हे आमच्या घरचंच कार्य आहे, पण तुम्हीही (आंघोळ करुन) तयारीत बसा! अतिशय सुरेख प्रयोग आहे.

...कविवर्य कुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर या दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात. गप्पा मारतात. (दोघेही एकमेकांना तसे ओळखत असतात.) काय बोलणं होतं त्यांच्यात? कसा संवाद साधतात? हे सगळं या नाट्यप्रयोगात आहे. प्रसिद्ध भाषातज्ञ, व्याख्यात्या प्रा. धनश्री लेले म्याडम लिखित, सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘हा सूर्य... हाच चंद्र!’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी भाषा दिनाला चारचांद लावेल हे नक्की. कारण यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाट्यकलांवत दीपक करंजीकर हे शिरवाडकरांची भूमिका साकार करणार आहेत, तर मराठी रंगभूमीचे नसीरुद्दिन शाह म्हणून लौकिक कमावलेले चिन्मय मांडलेकर कुसुमाग्रज झाले आहेत. करंजीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एवढ्याचसाठी की ते फॉरेन रिटर्न्ड आहेत, आणि लंडनच्या ब्रॉडवेवरुन दोनचारदा हिंडून येण्याचा अनुभव त्यांच्या गाठीला आहे. शिवाय ते अर्थतज्ञसुद्धा आहेत. अर्थतज्ञाने साहित्यिकाची भूमिका साकारण्याची ही जागतिक रंगभूमीच्या इतिहासातली पहिलीच वेळ! त्यामुळे सर्वार्थाने हा नाट्यप्रयोग विक्रमी आणि ऐतिहासिक असणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...नाटकाचे कथानक प्राय: नाशकात घडते. कारण उघड आहे! शिरवाडकर आणि कुसुमाग्रज हे दोघेही नाशकातच राहात असत. नाशकात नव्हे तर एकाच घरात राहात असत. दोघेही प्रतिभावंत. एकाने नाटककार आणि लेखक म्हणून दिगंत कीर्ती मिळवली, दुसऱ्याने मराठी काव्यनभाला नक्षत्रांचे देणे दिले. पण दोघांची व्यक्तिमत्त्वे मात्र भिन्न होती, असा संशय नाटक बघताना कोणाला येईल. उदाहरणार्थ, सायंतारा उगवल्यानंतरच्या कातरवेळेला कुसुमाग्रजांना ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणू तारकादळे नगरात’ ही कविता स्फुरली असे वाटेल. तर शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकर कागदात भजी खातानाचा प्रसंग पाहून भारावलेल्या एखाद्या रसिकाला ‘सायंतारा’ म्हटले की भद्रकाली मार्केटजवळचा साबुदाणा वडा आठवेल!! (मला हा साबुदाणावडा भारी आवडतो! तेवढ्यासाठी मी नाशिकच्या साहित्य संमेलनाला तिन्ही दिवस जाणार आहे.) असो. एक नाटककार आणि एक कवी यांच्यातील हे संवादनाट्य मोठे मनोज्ञ आहे.
वास्तविक हे नाटक दोघांचे नव्हे, तिघांचे हवे होते, असे माझे साक्षेपी मत आहे. शिरवाडकर, कुसुमाग्रज आणि तात्यासाहेब अशी तीन व्यक्तिमत्त्वे या नाटकात असती तर बहार उडाली असती. फार्तर नाव बदलून ’हा सूर्य, हा चंद्र... हाच सायंतारा’ असे ठेवावे लागले असते. काहीही झाले तरी नाटक आभाळातून (खाली) पडणार नाही, याची हमी राहिलीच असती. आफ्टरऑल, सूर्य, चंद्र आणि सायंतारा हे तिघेही तारांगणातले रहिवासी, हो की नाही?

काहीही असो, नाटक बघा, म्हंजे झालं! तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तरी एकमेकांशी चांगल्या मराठीत बोला, बाकी वर्षभर आपलं हिंदी नि इंग्रजी आहेच.

Edited By - Prashant Patil