esakal | हौस ऑफ बांबू : लखोबा लोखंडे यांची षष्ठी! Hous of Bamboo
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo
हौस ऑफ बांबू : लखोबा लोखंडे यांची षष्ठी!

हौस ऑफ बांबू : लखोबा लोखंडे यांची षष्ठी!

sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! ‘झाले बहु, होतीलही बहु, आहेतही बहु, परि यासम हा’ या मोरोपंतांच्या काव्यपंक्ती अचूक लागू पडणारं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे निप्पाणीचे तंबाखूचे व्यापारी लखोबा लोखंडे हे होय. लखोबा लोखंडे यांच्या सांगण्यानुसार ते त्यांच्यावर नाना कुलंगडी आणि भानगडींचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा सरळ सरळ अन्याय आहे. वास्तविक ‘तो मी नव्हेच’ असं लखोबानं वारंवार शपथेवर सांगितलंय; पण कुणी ऐकतच नाही. शिवाय, हे सगळं नाटक गेल्या शतकातलं आहे. एव्हाना निकाली निघायला हवं होतं. पण नाही! ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड’ हे वचन सुप्रसिद्ध जणू विसरले आहेत सगळे! गेल्या आठ तारखेला लखोबा लोखंडे प्रकरणाला बरोब्बर साठ वर्ष पूर्ण झाली. अजूनही हा खटला गाजतोच आहे…

साठ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या आयफॅक्स थिएटरात, आठ ऑक्टोबरला ‘तो मी नव्हेच’चा पहिला प्रयोग झाला. त्यानंतरच्या साठ वर्षात कितीतरी खटले निकाली निघाले. ‘तो मी नव्हेच’ मात्र चालू आहे. आचार्य अत्रे यांनी बार्शीच्या कोर्टात चाललेल्या माधव काझी खटल्यातून प्रेरणा घेऊन ‘तो मी नव्हेच’ अगदी झपाट्यानं लिहून काढलं. मो. ग. रांगणेकर यांनी आपल्या ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेमार्फत ते रंगभूमीवर आणलं. नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांनी लखोबा लोखंडेला अक्षरश: जिवंत उभा केला. डोकीवरची टोपी पुढे मागे करत कोल्ह्याच्या काव्याने युक्तिवाद करणारा लखोबा लोखंडे एकाच वेळी रसिकांची दाद घेऊ लागला, आणि त्यांच्या संतापात भरदेखील टाकू लागला. हशे पिकवू लागला. हृदयाचा थरकाप उडवू लागला. प्रभाकरपंतांनी या नाटकात लखोबा, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच व्यक्तिरेखा साकारल्या. पाच भूमिका एकाच वेळी करण्याची ही निव्वळ चूष नव्हती. ‘स्क्रिप्ट की डिमांड’ असं आपण ज्याला मराठीत म्हणतो, त्यातला प्रकार होता तो! एकाच नटानं पाच पाच भूमिका करण्याची जागतिक रंगभूमीवरची ही पहिलीच वेळ असेल. कुणीतरी याचा शोध घेतला पाहिजे. समाजाचं प्रतिबिंब नाट्यकृतीत पडत असतं. तसंच नाट्यकृतीचं प्रतिबिंबही समाजावर पडत असतं. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचे कितीतरी प्रयोग आपण रंगभूमीच्या बाहेरही बघत असतो. मध्यंतरी पिंपरी-चिंचवडला एक लखोबा लोखंडे पकडला होता म्हणे.

प्रभाकरपंतांनंतर हल्ली आमचे डॉ. गिरीशोक ‘तो मी नव्हेच’ मधला लखोबा लोखंडे साकारताना दिसतायत. त्यांना मुळी प्रभाकरपंतांनीच संथा दिली असल्यामुळे प्रश्नच उरला नाही. ‘राधेश्याम महाराजाची भूमिका माझ्याहीपेक्षा चांगली करता’ असं त्यांना प्रभाकरपंतांनी सांगितलं होतं म्हणे. वास्तविक हा पंतांनी दिलेला ‘पुणेरी’ तर नसावा? या शंकेनं मी ग्रासून गेले. पंतांची कॉम्प्लिमेंट नीट ओळखून आता दिवाकर दातार, दाजीशास्त्री, कॅप्टन अशोक परांजपे वगैरेंकडे लक्ष द्या, असं त्यांना सांगायला मी उत्सुक होत्ये. जरा शोध घेतला तर गृहस्थ मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत म्हणून कळलं. त्या मालिकेच्या चित्रिकरणाच्या ठिकाणी गेले, तर डॉ. ओक म्हणून कोणी इथं नाहीतच, असं सांगण्यात आलं. शेवटी डॉक्टर गिरीशोक हे व्यक्तिमत्त्व आम्हाला कुठं सापडावं? -जंगली महाराज रोडवर! त्यांना म्हटलं, ‘‘ डॉक्टर गिरीशोक तुम्हीच ना?’’ ‘‘बाई, तुम्ही कितीही काहीही म्हणालात, तरी तो-मी-नव्हेच!’’ असं म्हणून ते ‘हॅयहेहे…’असं डिट्टो लखोबाछाप लबाड हसले आणि टोपी मागेपुढे करत अदृश्य झाले. नाटकाला आणखी साठ वर्षं तरी मरण नाही!

loading image
go to top