esakal | हौस ऑफ बांबू : वाचाल तर वाचाल!

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo
हौस ऑफ बांबू : वाचाल तर वाचाल!
sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! वरचा मथळा वाचून तुमची सटकली असेल. देताना आम्हालाही मळमळलं. पण काय करणार? द्यावा लागला मथळा. कारण २३ एप्रिल म्हंजे ग्रंथमहोत्सवाचा पवित्र दिवस. वर्ल्ड बुक डे! या दिवशी ‘वाचाल तर वाचाल’ हा मथळा नाही द्यायचा तर कुठला द्यायचा? जागतिक योगा डेला आपण नाक धरून बसतो की नाही? पद्मासन ट्राय करतो की नाही? तसंच हे! आजच्या दिवशी तरी मेलं एखादं पुस्तक उघडावं! चार ओळी डोळ्याखालनं घालाव्यात. पुण्य लागेल, जीव वाचेल!

वाचाल तर वाचाल हा मथळा अतिशय बोअरिंग आहे, हे मान्य. गेल्या काही वर्षात हा मथळा इतका चावला गेला आहे की एखाद्याची वाचाच बंद व्हावी! पुस्तक प्रदर्शनापास्नं साहित्य संमेलनापर्यंत (गेलं बिचारं...) कुठल्याही कार्यक्रमात हा मथळा असतोच. पण सख्यांनो, जागतिक पुस्तक दिनाला काय बरं मथळा द्यायचा?

तेवीस एप्रिल म्हटलं की माझ्या मनरुपी पुस्तकाची पाने फडफडू लागतात, आणि त्यातील भाव-भावनांच्या अभिव्यक्तीचा शब्दरुप आशय छापील अस्तित्त्वाची कोंडी फोडून परागकणांसारखा सर्वत्र उधळतो. (वाक्यं जमलंय का? नाही? छे, तुम्ही फारच नाठाळ झाला आहा!!) दिसमाजी माणसाने सतत काहीतरी वाचीत राहावे, या मताची मी आहे. माझ्या बाबतीत बोलायचं तर मी उभे आयुष्य आडवे झोपून वाचत वाचतच काढले आहे.

एखादे छॉन पुस्तक घ्यायचे. आणि वाचता वाचता झोपी जायचे, असा आमचा नित्यक्रम आहे. सकाळच्या वेळी पाककृतींची पुस्तके काढून वाचावीत. सवड मिळाली तर वृत्तपत्रे वाचावीत. दुपारच्या जेवणानंतर एखादी कादंब्री उघडावी. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर काव्यसंग्रह हाती घ्यावा. रात्री झोप येत नसेल तर समीक्षेचे पुस्तक काढून आडवे व्हावे. साडेसहा मिनिटात गाढ झोप लागत्ये!! निद्रानाशासाठी समीक्षेच्या पुस्तकाएवढी असरदार गोष्ट नाही. असा माझा ग्रंथांच्या सहवासातच दिवस जातो. आज तर स्पेशल ग्रंथदिन!

दरवर्षी तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा होतो. विल्यम शेक्सपीअर आणि मिग्वेल सर्वांटिस या दोघा महान लेखकांचे महानिर्वाण २३ एप्रिल १६१६ रोजी झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा ग्रंथदिन साजरा केला जातो. शेक्सपीअरचं राहू दे, सर्वांटिस हे सुप्रसिध्द डॉन किओते (की डॉन क्विक्झोट? किओतेच बरे! क्विक्झोट असे उच्चारताना का कुणास ठाऊक शिवी आठवते! ) आणि सँको पांझा या मानसपुत्रांचे जनक. शेक्सपीअर ब्रिटिश नि सर्वांटिस स्पेनचे. नेमक्या एकाच दिवशी जावेत? अर्थात त्याबद्दलही वाद आहेतच. पण तरीही २३ एप्रिल या दिवशी देशोदेशीचे वाचक हसत खेळत घराबाहेर पडतात, आणि पुस्तक दिनाची मज्जा घेतात म्हणे! हे जागतिक वाचक पुस्तकांच्या दुकानी जाऊन तासंतास टहलून छान छान जागतिक पुस्तके खरेदी करतात. पुस्तकांवर जागतिक चर्चाबिर्चा करतात. या दिवसासाठी काही प्रकाशक जास्तीच्या जागतिक आवृत्त्या छापतात म्हणे! इतकंच काय, काही जागतिक लेखक खास जागतिक पुस्तक दिनासाठी म्हणून नवीन जागतिक पुस्तक लिहून काढतात, असं ऐकलंय! मराठी साहित्यिकांना आणि प्रकाशकांना जाग कधी येणार? मला तर बाई, यातलं काही म्हंजे काही खरं वाटत नाही. पुस्तकं म्हंजे का साड्यांचा सेल आहे?

सध्या घरात कडीकुलपात रहा. वारंवार हात धुवा. मेलं ते टीव्हीचं डबडं बंद करा. पुस्तकात डोकं खुपसा, आणि सॅनिटायझर हाताला लावत पानं उलटा. घरात बसून वाचत राहिलात तर खरंच वाचाल!