मायमराठीचा (मनो) विकासपुरुष...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायमराठीचा (मनो) विकासपुरुष...!

मायमराठीचा (मनो) विकासपुरुष...!

नअस्कार! खुफिया सूत्रों से मिली जानकारी के अनुसार त्रिलोकात इंद्राचं आसन पुन्हा डळमळू लागलं आहे. खालती पृथ्वीवर कुणी तपस्वी उग्र तप करु लागला की वर इंद्राचं आसन डळमळू लागतं, हे ऐकून असालच. तसंच काहीसं घडतंय. विश्वात नवं स्थित्यंतर घडणार असल्याचं भाकित आत्ताच करुन ठेवावं काय, या विचाराने बिल गेट्स पत्रकार परिषद बोलावण्याच्या बेतात आहे. (कोरोना येणार, हे सर्वात आधी त्यांनीच सांगितलं होतं…) नवी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टाचं काम काही काळ थांबवून पुण्याकडे लक्ष ठेवायचे आदेश ‘पीएमओ’ला मिळाले आहेत. इकडे महाराष्ट्रात मात्र कुणाला काहीही पत्ता नाही! ‘जो तो आपल्या ह्यात’ आहे. महाराष्ट्रात हे असं, आणि पुण्यातही सगळं शांत शांत आहे. अवघं भूमंडळ हलवणारा एक महा महाउपक्रम ‘शक्ती टॉवर्स, चौथा मजला (लिफ्ट आहे! ) नारायण पेठ, पुणे-३०’ येथे हाती घेतला गेला आहे, आणि त्याच्यावर जोराजोरात काम सुरु आहे, याची कुणाला कल्पना आहे का? आहे का कल्पना?.. का कल्पना आहे.

…हे आहे (आमच्या) ‘मनोविकास प्रकाशना’चं हपिस! इथले मूळपुरुष रा. महर्षी अरविंद पाटकर इथं बसून प्रकाशनाचा कारभार बघतात, अशी सांस्कृतिक महाराष्ट्रात एक अफवा आहे. महर्षी अरविंद कुठंही असू शकतात. कधी ते मुंबईत ‘आमदार निवासा’लगतच्या आपल्या ग्रंथ दालनात असतात, तर कधी कुठे लेखकांच्या भेटीगाठी घेत हिंडत असतात. अधूनमधून नारायण पेठेच्या हपिसात असतात, हे मात्र खरं आहे.

भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘तुम्हाला समृद्ध करणारा, बाराशे पृष्ठांचा, दोन खंडातला महाग्रंथ’ निर्मिण्याचं काम सध्या त्यांनी हाती घेतलं आहे. त्यांनी म्हंजे, ते आणि त्यांचे होनहार चिरंजीव रा. आशिषराव पाटकर यांनी! (या तरुण प्रकाशकाकडे पुढेमागे आम्ही जरा वेगळ्या नजरेने पाहू! असो.) ‘असा बदलला भारत- पारतंत्र्याकडून महासत्तेकडे’ असं भारदस्त नाव असलेल्या या दोन खंडी प्रस्तावित ग्रंथात साठ नामचीन आणि सराईत अशा साठ वैचारिकांचे दीर्घ लेख असणार आहेत. होय, होय, सा- ठ!!

महाराष्ट्रात पांच डझन वैचारिक एकगठ्ठा सांपडले याचंच मला आश्चर्य वाटलं. म्हटलं, कमालच्चै! बरं, हे वैचारिक नुसते प्लेन वैचारिक नाहीत. ‘ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक, परखड समीक्षक आणि चिकित्सक लेखक, राजकीय विश्लेषक आणि अभ्यासू पत्रकार’ असे वर्गवारीनुसार आहेत.

आमच्या पुण्यात विचारवंत दोन घरं सोडून एक मिळेल! पेठेत तर घरोघरी मिळतील! पण लिहिणारे कुणीही भेटणार नाहीत. इथे (मानधन मिळेल, हे माहीत असूनसुध्दा-) देशप्रेमापोटी आणि खास आपल्यासाठी त्यांनी चिंतनशील लेख लिहून महर्षी अरविंदांकडे सोपवण्याचा नुसता सपाटा लावला आहे, असं समजतं.

हा महाग्रंथ पुढील वर्षी २० जानेवारीला वाचकांच्या हातात पडेल. यात काय काय आहे, किंमत किती, हे आत्ता काही मी सांगायची नाही. चांगला वजनी ऐवज असणार, एवढं नक्की! प्रकाशनपूर्व नोंदणी करुन टाका, एवढंच सांगते. भारताच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानंच गेल्या महिन्यात ‘राजहंस प्रकाशना’ ने अविनाश धर्माधिकारींलिखित ’७५ सोनेरी पाने’ हा देखणा आणि वाचनीय ग्रंथ प्रकाशित केला होता. त्यांच्याकडे फक्त सोनेरी पानंच होती, आमच्या महर्षी अरविंद पाटकरांकडे सोनेरी, चंदेरी, पिवळी,

जाळीदार, ओली, सुकी, इतकंच नव्हे तर, कलकत्ता, बनारसी, पूना मसाला अशी सर्व तऱ्हेची पानं उपलब्ध असतील, असं दिसतं. वाट बघू या! एवढं वाचून (तरी) ‘भारत कसा बदलला’ हे मराठी वाचकांना कळायला हवं, एवढीच अपेक्षा.

टॅग्स :Editorial Article