फराळाचा उरला गाळ…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saroj Chandanwale writes diwali food inflation diwali ank Marathi literature

फराळाचा उरला गाळ…!

नअस्कार! करंज्या दोनच उरल्या आहेत. चकल्यांचे फक्त तुकडे बाकी उरले आहेत. अनारशांची बरणी रिक्त आहे, आणि चिरोट्यांची गळून पडलेली पिठीसाखर तेवढी दिसत्ये आहे. बेदाणाविरहित लाडू अर्धेमुर्धे उरले आहेत. चिवड्याच्या डब्यातला तळातला खारट गाळ बोटाबोटाने चेपून खाण्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यातले खोबऱ्याचे कापही संपले. शेवेचा तर फन्ना उडाला. इतक्या लौकर फराळ संपला? हो, हो, संपला. हल्ली महागाई इतकी झाली आहे की विचारु नका. फराळाचे जिन्नस मोजकेच केले होते…त्यात ‘बाहेरुन’ फराळाची पाकिटं येतील, असं वाटलं होतं. पण…जाऊ दे. महागाई सगळ्यांनाच आहे.

मराठी साहित्याचंही तसंच काहीसं झालं आहे. यंदा साडेचारशेच्या आसपास दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याचा एफ़आयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) नोंदवला गेला आहे. दोन वर्षं कोरोनात गेली. दिवाळी अंकांच्या निर्मात्यांनी जाहिरातदारांना फोन केले. जाहिरातदारांनी कसनुसे हसून फोन ठेवले किंवा उचललेच नाहीत! अशी दोन वर्षं गेली. यंदाच्या दिवाळीत सगळ्यांनीच जोर धरला. लेखक आणि कवी मंडळीही दबा धरुन बसली होती. दोन वर्षाचं साचलेलं दणादणा मार्केटमध्ये आणण्यासाठी सारे आसुसले होते. दिवाळीच्या आसपास धडाधड अंक येऊन थडकले. कुणी पाच-पाच दिवाळी अंकांचे गुच्छ करुन रसिकांसमोर ठेवले. कुणी एकेकट्याने आब राखून आपला अंक आणला. कुणी नुसत्याच डिजिटल आवृत्त्या काढल्या. पण दिवाळी अंकांच्या किंमती किती? अरे, बाप रे!! चांगला नावाजलेला अंक चारशे काय, साडेतीनशे काय, तीनशे काय नि अडीचशे काय…एका दिवाळी अंकाची किंमत रु. तीनशेतीस अशी वाचली. अशी ऑड किंमत का असेल? कळलं नाही. पण ते जाऊ दे. दरवर्षी आपले मराठी प्रकाशक पुस्तकं काढत असतात. सरासरी किंमत दोन-अडीचशे असते.

(त्यात जाहिराती नसतात! ) दिवाळी अंकांनी मात्र यंदा ग्रंथव्यवहारालाही मागे टाकलं. चार-चारशे रुपयांचे अंक घेतले तर अनारसे कुठून आणायचे? करंज्या कशा आणायच्या? चिरोट्यांची ऑर्डर कशी द्यायची? चकल्या काय, मेल्या कुठेही मिळतात हल्ली. पण चिवड्याचं काय करायचं? दिवाळी अंकाच्या साहित्य फराळापायी खराखुरा फराळ कमी पडला. परिणाम? यंदा भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी फराळाचे जिन्नस संपले…

बाकी दिवाळी अंक यंदा बरेच आले आहेत. छपाई उत्तम आहे. लेखकांमध्येही नवी नवी नावं दिसली. पण यंदा कवितेचा मारा जोरदार दिसला. कोरोनाकाळात कवितेच्या कुप्या बऱ्याच निर्माण झाल्या अशी शंका आहे. सायरस पूनावालांनी कोरोना लशीच्या लाखो लशी (देअर आर नो टेकर्स, यु नो!) फेकून दिल्या. तसं आमच्या कवितेचं होऊ नये. आधीच सोशल मीडियावर कवितांचं बारमाही पीक असतं. (इथं दुष्काळ नाही!) शिवाय इतक्या कविता करणं (कवी आणि वाचकांच्याही) तब्येतीला बरं नसतं. कविमंडळींना आमचं आवाहन आहे की त्यांनी जरा सबुरीनं घ्यावं. दिवाळी अंकांमधील साहित्याबद्दल पुढेमागे सविस्तर लिहिणारच आहे. अंकांच्या किंमतींचं मात्र सीरिअसली काहीतरी करायला हवं आहे. तूर्त या सुचलेल्या ओळीः

अशी एक दीपावली,

माझ्या मनात तेवते आहे

स्वस्त साहित्य, स्वस्त फराळ,

- मी नुसती जेवते आहे,

फराळाचा उरला गाळ,

तळाशी जमून असतो काही

दिवाळी अंक घेताना मन,

मुळीच खळखळ करत नाही

…अशी एक कविवर्य अनिलांच्या चालीवरची दशपदी सुचता सुचता राहिली! मुद्दा एवढाच की फराळ साहित्याचा असो, किंवा खराखुरा, खिशाला पर्वडेबल असावा. एवढंच.