
नअस्कार! वर्ध्याहून आल्यापास्नं मी अधून मधून साऽऽरखी अश्रू ढाळत्ये आहे. मराठी प्रकाशकांसाठी माझे मन द्रवते. हृदयास पाझर फुटतो.
हौस ऑफ बांबू : चक्रव्यूहात अभिमन्यू...!
नअस्कार! वर्ध्याहून आल्यापास्नं मी अधून मधून साऽऽरखी अश्रू ढाळत्ये आहे. मराठी प्रकाशकांसाठी माझे मन द्रवते. हृदयास पाझर फुटतो. मनीं अब्द अब्द दाटून येते. महाराष्ट्र शारदेच्या या खऱ्याखुऱ्या मेहनती सुपुत्राला अखिल भारतीय संमेलनात अशी वागणूक मिळावी? छे!! हे काहीतरीच झालं...
एखाद्या कर्त्यासवरत्या पण बुजुर्ग स्त्रीच्या थोरल्या मुलानं शेतीत रमावं. घरदार, गोठा वगैरे बघावं. कृषिउत्पन्न बाजार समितीत चकरा माराव्यात. तलाठ्याकडे जाऊन ठिय्या द्यावा. शेतमजुरांसाठी दातकण्या कराव्यात. एवढं सगळं करुन आभाळाकडे डोळे लावून बसावं. कारण तो आभाळातला बाबा रुसला की सगळी मेहनत पाण्यात! आणि हे सगळं कुणासाठी करायचं? तर आपल्या धाकट्या भावंडांसाठी. धाकटा शहरगावात शिकणार. मोठा कलेक्टर होणार, आणि तोऱ्यात (लाल दिव्याच्या) गाडीत बसूनशेनी गावी येणार! त्याची कान्वेंटमधली कार्टी काहीबाही बोलून हसणार! ...या स्टोरीचा शेवट काय? तर थोरला गावंढळ शेतकरी, आणि धाकला धनी शिकेल बाईल घेऊन रुबाब दाखवणार! आपल्या मराठी प्रकाशकबांधवांची अगदी त्या थोरल्या भावासारखीच अवस्था झाली आहे, असं मला वाटतं.
वर्ध्याचं संमेलन (एकदाचं) पार पडलं. पुढल्या संमेलनाचे वेधदेखील लागले. पण अजून त्याचं कवित्त्व शमलेलं नाही. संमेलनानंतर तिथल्या अडचणी बाहेर येऊ लागल्या आहेत. मराठी साहित्य रसिकांनी पहिली अडचण बोलून दाखवली ती खरीखुरीच अडचण होती.
- स्वच्छतागृहांची!
संमेलनस्थळी ग्रंथविक्रीचा विभाग होता प्रशस्त, पण वर्तुळाकार होता. एकदा त्या वर्तुळात ग्रंथप्रेमी आला की तो व्यूह भेदणं त्याला अशक्य व्हावं, अशी रचना होती. एकंदर २९० स्टॉल होते. कापडानं फडफडणारे. उन्हात तापणारे, आणि थंडीत गार पडणारे! साधं प्यायला पाणी नव्हतं. काही स्टॉलवरल्या विक्रेत्यांनी एखादी प्रत विकली गेली की त्यातल्याच पैशातून पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या असं दारुण सत्य माझ्या कानावर आलं आहे. प्यायलासुध्दा पाणी नाही तिथं स्वच्छतागृहात कुठून येणार? (आय मीन...असणार?) पुण्यातील काही मान्यवर प्रकाशकांनी वर्ध्याहून परतल्यानंतर सर्वात आधी न्हाणीघर गाठल्याचं वृत्त आहे. त्या दिवशी पुणे रेल्वे स्थानकात वर्धा-रिटर्न्ड प्रकाशक उतरले, तेव्हा कोणी कोणाला ओळखण्याच्या (किंवा ओळख दाखवण्याच्या) स्थितीत नव्हते म्हणे. खरे खोटे देव जाणे.
...तश्शा परिस्थितीत मराठी प्रकाशकांनी धावपळ करुन जवळपास तीन कोटींची विक्री साधली. ब्राव्हो! याला म्हणतात खरी दिलेरी!! अर्थात त्यात चक्रव्यूहरचनेचा काही सहभाग असेल का? याचा शोध घ्यायला हवा. मराठी साहित्याची एवढी सेवा करुन शेवटी प्रकाशक बांधवांच्या पदरी काय पडलं? -विकत घेतलेली बिस्लेरीची बाटली!! संमेलनाच्या मांडवात आणि व्यासपीठावर मिरवत होते आमचे लेखकच.
‘इथं लेकाचे, कधी काढताय पुस्तक? येऊ का भेटायला? रॉयल्टीचं एवढं काही नाही हो, संबंध महत्त्वाचे’’ असली मखलाशी करतात, आणि तिकडे वर्ध्यात कुणी मांडवात ओळख दाखवायला तयार नाही!’’ असे संतप्त (आणि जळजळीत) उद्गार एका मान्यवर प्रकाशकाने माझ्याशी बोलताना काढले. मराठी प्रकाशक परिषदेने तर या मिळालेल्या ‘ट्रीटमेंट’मुळे वैतागून निषेधच व्यक्त केला आहे. यापुढे प्रकाशकांना अशीच वागणूक मिळत राहिली, तर पुढल्या वर्षी संमेलनाच्या मांडवात आंदोलन करु असा इशारा एका भडकलेल्या प्रकाशकाने दिला.
माझी तर वेगळीच सूचना आहे. प्रकाशकांनी आपलं स्वतंत्र (अखिल भारतीय) संमेलन आयोजित करुन लेखकांचे जमतील तितके अपमान करावेत! त्यांना बोलवावे, आणि पाण्याच्या बाटलीचे बिल हातावर ठेवावे! किमान त्यांच्या रॉयल्टीचे खरे आकडे तरी जाहीर करावेत!-वठणीवर येतील, मी खात्रीनं सांगत्ये! बघा पटतंय का!