
नअस्कार! पुण्यातल्या मराठी साहित्य रसिकांची काशी असलेल्या शुक्रवार पेठेतील ‘अक्षरधारा’ बुक ग्यालरीत लग्नं जमतात, अशीही एक अफवा मध्यंतरी उठली होती, म्हणून मी तिथं जाते, असं काही कुत्सित साहित्यिक बोलत असत.
हौस ऑफ बांबू : राजमान्य राजेश्री!
नअस्कार! पुण्यातल्या मराठी साहित्य रसिकांची काशी असलेल्या शुक्रवार पेठेतील ‘अक्षरधारा’ बुक ग्यालरीत लग्नं जमतात, अशीही एक अफवा मध्यंतरी उठली होती, म्हणून मी तिथं जाते, असं काही कुत्सित साहित्यिक बोलत असत. मी लक्ष देत नाही. (‘अक्षरधारा’त जात राहणार!) ग्रंथांच्या आणि ग्रंथप्रेमींच्या सहवासात राहाणं हा माझा अधिकारच आहे. त्या दुकानातून मी, आणि आणखी काही (तरुण, हँडसम आणि बुद्धिमान) पुणेकर रसिकांनी (सर्व) मिळून पन्नास हजार रुपयांची पुस्तकं तरी आजवर खरेदी केली असतील. ‘अक्षरधारा’च्या गॅलरीत उभं राहिलं तरी कित्ती रोम्यांटिक वाटतं. शेल्फावरुन एखादा काव्यसंग्रह काढून चाळायला घ्यावा, एखाद्या पानात चिठ्ठीबिठ्ठी मिळावी…फूल तुम्हें भेजा है पुस्तक में, फूल नहीं मेरा दिल है…किंवा चांगला आठ-दहा (मध्यम साइजच्या) पुस्तकांचा गठ्ठा हातात सांभाळत ‘अक्षरधारा’च्या तीन-चार पायऱ्या उतराव्यात. उतरताना नेमका कुणाचा तरी सुगंधित धक्का लागून पुस्तकं सांडावीत….जाऊ दे!
‘अक्षरधारा’चे राजमान्य राजेश्री रमेशराव आणि रसिकाताई राठिवडेकर यांना महाराष्ट्रातला प्रत्येक ग्रंथप्रेमी ओळखतो. ढवळे ग्रंथयात्रेपासून रा. राठिवडेकरांची सुरु झालेली ही यात्रा आता अक्षरधारेच्या काठाशी विसावली आहे. माणूस कायम पुस्तकात रमलेला!! त्यांच्या बुक ग्यालरीत किती स्वप्नांची पूर्ती झाली, याला गणना नाही. परवा मात्र उलट चित्र दिसलं. रा. राठिवडेकरांच्या दुकानी गेले, तर ते स्वत:च स्वप्नमग्न चेहरा करुन आढ्याला नजर लावून गोड गोड हसत बसले होते. मला ओळखही दाखवली नाही!
पुस्तकांची संख्याही कमी दिसत होती. एरवी दुकान पुस्तकांनी भरलेलं असतं. ‘काहो, राठिवडेकर, पुस्तकं इतकी कमी का?,’ मी डिवचलं.
‘एकदम पन्नास हजाराची पुस्तक खरेदी हो! अशानं महाराष्ट्राचं नवनिर्माण व्हायला वेळ कितीसा लागणार?हुहुहु!, ’ रा. राठिवडेकर म्हणाले. सारखे ड्रावर उघडून बघत होते, नि हसत हसत ड्रॉवर बंद करत होते.
‘एकदम पन्नास हजार?,’ मी चित्कारले. रा. राठिवडेकरांनी ‘शुऽऽ…हळूऽऽ’ असे तोंडावर बोट ठेवत खुणेनं सांगितलं. राजसाहेबांनी एकाच झपाट्यात बुक गॅलरीतली शेल्फं खाली केली, हे दिसतच होतं. मागे एकदा भेळवाल्याकडले चुरमुरे मी असेच संपवले होते…असो.
‘परवा राजसाहेब येऊन गेले नं…दीड तास होते! दीड तासात पन्नास हजाराची दोनेकशे पुस्तकं उचलली, आणि गेलेसुध्दा!’ ते खुदखुदत म्हणाले. राठिवडेकरांच्या आयुष्यातली ती एक रम्य संध्याकाळ होती. ‘अक्षरधारा’त येताना राजसाहेब टीव्ही पत्रकारांवर ‘जरा जगू द्या ना’ असं डाफरल्याचं ऐकलं होतं. त्यांना खरं तर ‘जरा वाचू द्या ना’ असं त्यांना म्हणायचं असणार!! ‘किती पुस्तकं नेली? कुठली कुठली?’ मी उत्सुकतेनं विचारलं.
‘साधारण या या साइजची दोनेकशे नेली!,’ दोन्ही पंज्यांनी चौकोनी आकार दाखवत राठिवडेकर म्हणाले.
‘काव्यसंग्रह?’ मी.
‘छे! कविता कसल्या घेऊन बसलात? सगळी ऐतिहासिक, सामाजिक, कलाबिला वगैरे!’ राठिवडेकरांनी अभिमानानं सांगितलं.
…मराठी पुस्तकं किती खपतात? असं राजसाहेबांनी विचारल्यावर रा. राठिवडेकरांनी आठवड्याचा हिशेब देत ‘साधारण पन्नासेक’ असं मोघम उत्तर दिलं म्हणे! त्यावर गूढ स्मित करत रा. राजसाहेबांनी पन्नास हजाराची पुस्तकं उचलली, अशी वदंता आहे. याचा परिणाम एवढाच झाला की मुंबईत ‘शिवतीर्था’वर जाऊन रा. राजसाहेबांनी पुस्तकं हाती घेतली, आणि अयोध्येचा दौरा स्थगित केला! शिवाय पुण्यात गणेश कला क्रीडा केंद्रात नवी सभाही लावली. पन्नास हजारातली काही पुस्तकं रिटर्न करण्यासाठी रा. राजसाहेब पुण्यात येणारेत, असं कुणीतरी सांगितल्यानं रा. राठिवडेकर टेन्शनमध्ये आहेत, असं कळतं. खरं खोटं राम जाणे!
Web Title: Saroj Chandanwale Writes Hous Of Bamboo 21st May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..