Hous of Bamboo
Hous of Bamboosakal

हौस ऑफ बांबू : ‘वसंत’ समये प्राप्ते...!

नअस्कार! वसंत ऋतु जाऊन ग्रीष्माने आल्या आल्या डोळे वटारले असले तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात (पक्षी : पुणे असे वाचावे! धन्यवाद.) मात्र अजून वसंत यायचाच आहे.
Summary

नअस्कार! वसंत ऋतु जाऊन ग्रीष्माने आल्या आल्या डोळे वटारले असले तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात (पक्षी : पुणे असे वाचावे! धन्यवाद.) मात्र अजून वसंत यायचाच आहे.

नअस्कार! वसंत ऋतु जाऊन ग्रीष्माने आल्या आल्या डोळे वटारले असले तरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात (पक्षी : पुणे असे वाचावे! धन्यवाद.) मात्र अजून वसंत यायचाच आहे. वसंत व्याख्यानमालेतील वक्त्यांच्या यादीत माझ्या ओळखीचेच चेहरे बघून मी हरखून गेल्ये आहे. ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या मजला दिसताहेत…’ अशी केशवसुतांसारखी अवस्था होऊन गेली आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी १८७५मध्ये वसंत व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफिलं होतं. त्यानंतर पं. जवाहरलाल नेहरुंपासून सुबोध भावेपर्यंत कित्येक वक्त्यांनी इथं आपलं वक्तृत्व आणि कलागुण पणाला लावले. अलीकडच्या काळात मुकुंद पांडुरंग देशपांड्यांसारख्या अस्सल पुणेकराच्या अवघड प्रश्नांना वक्ते सामोरे गेले. राजकारण, रंगकला, चित्रकला, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान…कुठल्याही क्षेत्राला इथं मज्जाव नाही. वसंत व्याख्यानमालेतल्या व्याख्यानांसाठी तिकिटं काढून येण्याची रसिकांची (पक्षी : पुणेकर असे वाचावे! ध.) तयारी होती, म्हंजे बघा!!

गेल्या चार दशकांहून अधिक काळ हे सगळं घडत होतं, टिळक स्मारकाच्या आवारात. झाडाझुडांच्या सान्निध्यात. म्हंजे खाली वक्तारुपी कोकिळ कुहुकुहु करीत असे. झाडावर खराखुरा कोकिळ व्याख्यान लावत असे!! पण यंदा ही व्याख्यानमाला टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात होणार नाही. ती तिकडे टि. म. वि.च्या जागेत! उरलेल्या व्याख्यात्यांनी घरीच बसून ऑनलाइन व्याख्यान द्यायचं आहे. व्याख्यात्यांचं ठीक आहे; पण आम्ही रसिकांनी काय करायचं? व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्यात जी मजा असते, ती ऑनलाइन नाहीच येत. कडकडा जांभया देणं, चुळबुळ, नको त्या वाक्याला खवचट टाळी मिळणं, वगैरे प्रकार आता इतिहासजमा होणार.

यंदाही जोरदार व्याख्याते आहेत. पहिलंच पुष्प रंगकर्मी-कम- लेखक- कम- विचारवंत-कम-बरंच काही असे दीपक करंजीकर गुंफणार आहेत म्हणे. मध्यंतरी त्यांनी ‘घातसूत्र’ नावाचा महाग्रंथ लिहून काढला. तो साधारणत: दोन-सवादोन रत्तल वजनाचा आहे. आता तोच ग्रंथ कसा वाचावा, हे समजून सांगत ते जगभर फिरताहेत! न पुरत्याला खुद्द राज ठाकरेंनी ‘घातसूत्र‘ बेस्ट पुस्तक असल्याचा मनसे निर्वाळा दिल्यानं इलाजच नव्हता. आयोजकांना त्यांचं व्याख्यान ठेवावंच लागलं, असं कानावर आलं. करंजीकर हे गृहस्थ एकाच वेळी इतकी कामं कशी करु शकतात कोण जाणे! अर्थशास्त्राबद्दल त्यांच्याशी बोलायला जावं, तर हे नाट्य परिषदेच्या बैठकीत सापडतात.

तिथं आढळायला जावं तर ज्यो बायडेनची युक्रेनबाबत सगळी पॉलिसीच कशी चुकली आहे, हे कुणाला तरी पोटतिडिकीनं सांगत असतात. कुठलं पुस्तक वाचू? असं विचारलं तर ‘टाटा स्टील’चा शेअर घेऊन टाका, असलं काहीतरी सांगतात. कठीण आहे!! ‘घातसूत्र : जग समजून घेताना..’ असा त्यांचा विषय आहे. आणखीही बरेच उत्तमोत्तम वक्ते आणि विषय आहेत, पण मी ते इथं सांगणार नाही. रसिकांनी (पक्षी : करेक्ट! थँक्यू.) स्वत: यादी बघून व्याख्यानाला जावं. (किंवा यावं!) कुणीतरी म्हटलंच आहे-

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: क: भेद: पिककाकयो?।

वसंत समये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ॥

पक्षी : कावळा काळा, कोकिळही काळा..दोहोत फरक कायसा?

वसंत (व्याख्यानमाला) समयाला, कळे भेद अनायसा॥

धन्यवाद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com