हौस ऑफ बांबू : दोन टोकांची पेन्सिल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

नअस्कार! आज थट्टामस्करीचा अजिबात मूड नाही, हे आधीच सांगून ठेवत्ये. हातात विदर्भ साहित्य संघानं काढलेल्या ‘युगवाणी’चा अंक आहे.

हौस ऑफ बांबू : दोन टोकांची पेन्सिल!

नअस्कार! आज थट्टामस्करीचा अजिबात मूड नाही, हे आधीच सांगून ठेवत्ये. हातात विदर्भ साहित्य संघानं काढलेल्या ‘युगवाणी’चा अंक आहे. अरुण कोलटकर विशेषांक. तब्बल १८४ पानांचा हा ऐवज संग्राह्य तर आहेच, पण मराठी भाषेची समृध्दी अधोरेखित करणारा आहे. मनात आलं, हे आधी का कोणी केलं नाही? (अपवाद : अशोक शहाणे) त्यासाठी प्रफुल्ल शिलेदारांना एकट्यानेच कष्ट का उपसावे लागले? कोलटकरांच्या कवितेची समग्र अशी समीक्षाच मराठीत कुठे झालेली नाही, असं समीक्षकच रागावून म्हणतात. असं का बरं? हे काम दुसऱ्या कुणीतरी करण्याचं आहे, असं प्रत्येक समीक्षक का समजतो?

अरुण कोलटकर नावाचा मराठी कवी कुठल्याही समीक्षकाला अजून धड झेपलेलाच नाही, असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. प्रा सदानंद रेगे यांनी ७७ सालीच म्हणून ठेवलं होतं की हा कवी (पक्षी : कोलटकर) वाळवंटातल्या त्या स्फिंक्ससारखा आहे. कधी आभाळातली कोडी सोडवत बसेल तर कधी शहामृगासारखा वाळूत डोकं खुपसून बसेल. त्याच्यापासून जपून राहायला हवं...’’ म्हणजे पुन्हा रेगेही नामानिराळेच!

कोलटकर गेले, त्यालाही आता पंधरा वर्षं होऊन गेली. ‘जेजुरी’ (१९७६) ते ‘द्रोण’ (२००३) या काळात त्यांची दोनच पुस्तकं हातात आली होती. मग एकदम पाचेक आली. त्यात ‘भिजकी वही’देखील होती.

देवळात गेलो होतो मधे, तिथे विठ्ठल काही दिसेना,

रखमाय शेजारी, नुसतीच वीट

मी म्हणलो, ऱ्हायलं, रखमाय तर रखमाय,

आपल्याला काय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं डोकं, काढून घेतलं,

आपल्यालाच पुढेमागे लागेल म्हणून…

‘विठ्ठलाशी आपली डायरेक्ट ओळख नाही, पण तुकारामाची विठ्ठलाशी आहे. आपलं काम तुकारामाशीच आहे…’ असलं काही अर्थपूर्ण बोलणारी कोलटकरांची मानसी थक्क करुन जायची. किंवा ‘इराणी’ या कवितेतल्या या ओळी :

इराणचा चकणा शहा पाहतो तडकलेल्या व सस्मित काचेआड केकला चढणारी क्रमिक बुरशी. क्वचित विचलित करते त्याचे लक्ष सुशिक्षित बेकाराला राखी बांधताना अकृत्रिम माशी.

…अरुण कोलटकर हे जाहिरात क्षेत्रातलं मोठं नाव होतं. इंग्रजी आणि मराठी भाषेवर जबरदस्त पकड असलेला कॉपीरायटर, डिझाइनमध्ये मोकळ्या अवकाशाचा भरपूर वापर करणारे आर्ट डिरेक्टर म्हणून त्यांचं लौकिक होता. मला आठवतंय, मुंबईला विमानतळानजीक पंचतारांकित सेंटॉर हॉटेल उभं राहिलं होतं. त्याच्या जाहिरातीत वाक्य होतं : ‘विमानतळ अटॅच असलेलं जगातलं एकमेव हॉटेल!’ ही कॉपी कोलटकरांची होती म्हणे.

प्रभादेवीला सेंच्युरीच्या सिग्नलपाशी उजवीकडे वळलं की कधी कधी रस्त्यातनं चालताना कोलटकर दिसायचे. उंचपुरे, शिडशिडीत. अंगात मळकं जाकीट. लांब केस आणि अज्ञातात रोखून बघण्याची ढब. त्यांची भीती वाटण्यातच सगळी वर्षं निघून गेली… कोलटकर म्हणायचे, ‘कधी कधी वाटतं माझी अवस्था दोन टोकांच्या पेन्सिलीसारखी आहे. माझ्यात दोन कवी आहेत की दोन भिन्न भाषांमध्ये लिहिणारा एकच कवी आहे, हे ठाऊक नाही. काहीही असलं या द्वैभाषिक सीमावादात माझी कविता अडकू नये, असं मात्र वाटतं.’ माझं अर्धअधिक काम बहुधा चंद्राच्या दुसऱ्या बाजूसारखं अज्ञातच राहील असं दिसतं.., असं एका इंग्रजी टिपणात खुद्द कोलटकरांनी लिहून ठेवलं होतं. चंद्राची ही दुसरी अज्ञात बाजू प्रकाशात आणण्याचं मोठं काम ‘युगवाणी’नं केलं आहे.त्यांचं आणखीही बरंच काम अप्रकाशित राहून गेलं असणार. आता या निमित्तानं कोलटकरांच्या साहित्यकृतींची संपूर्ण समीक्षा व्हायला हवी. है कोई माई का लाल?

Web Title: Saroj Chandanwale Writes Hous Of Bamboo 9th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top