सौदीशी सौदा (अग्रलेख)

saudi arabia Prince Mohammed bin Salman silent on Pulwama attack
saudi arabia Prince Mohammed bin Salman silent on Pulwama attack

सौदीच्या युवराजांनी दहशतवादाचा निषेध करताना पाकिस्तानचा उल्लेख टाळला, हे खटकणारे आहे. भारताला या बाबतीत पाठपुरावा करावा लागेल. मात्र सौदीसह विविध देशांशी स्वतंत्रपणे संबंध स्थापण्याचे धोरण वास्तववादी आणि देशहिताचे आहे.

द्विपक्षीय संबंधांचे क्षेत्र अधिक व्यापक-विस्तृत करणे, हा सौदी अरेबियाचे युवराज महम्मद बिन सलमान यांच्या भारतभेटीचा मुख्य उद्देश असला, तरी प्रत्यक्षात पुलवामाजवळ झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे सावट त्यांच्या या दौऱ्यावर होते. तसे होणे स्वाभाविकही म्हणायला हवे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्यासाठी भारताने आक्रमक राजनैतिक मोहीम सुरू केली असतानाच सौदीचे युवराज आधी पाकिस्तानात गेले; त्यांनी तेथे २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे आश्‍वासन दिले. आर्थिक मदतीच्या तहानेने कासावीस झालेल्या पाकिस्तानच्या दृष्टीने हा मोठा दिलासा असला, तरी भारतासाठी ही बाब खटकणारी होती. त्यामुळेच दहशतवादाच्या प्रश्‍नावर सौदीचे युवराज काय भूमिका घेणार, असा प्रश्‍न निर्माण झाला. भारतात आल्यानंतर एका निवेदनात त्यांनी दहशतवादाचा निषेध केला; मात्र पुलवामा हल्ला आणि पाकिस्तानचा त्यातील सहभाग या गोष्टींचा उल्लेख त्यांनी टाळला. याचाच अर्थ पाकिस्तानशी असलेल्या दीर्घकाळच्या संबंधांमध्ये सौदीच्या राज्यकर्त्यांना कुठलीही कटूता नको आहे. पण जे जाहीरपणे केले नाही, ते निदान त्यांनी अनौपचारिक पातळीवर करावे आणि पाकिस्तानवर त्यांच्या परीने दबाव आणावा, यासाठी भारताने यापुढे आग्रह धरणे सोडता कामा नये. परंतु, त्यांच्या भारतभेटीकडे एवढ्याच चौकटीतून पाहणे योग्य ठरणार नाही. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील परस्पर सहकार्याच्या भविष्यातील शक्‍यता लक्षात घ्याव्या लागतील. मुळात सौदी-पाक संबंध आणि सौदी-भारत संबंध यांच्या स्वरूपांतच मूलभूत फरक आहे. आपला तारणहार यादृष्टीने पाकिस्तान सौदीकडे पाहत आहे. अमेरिकेने आर्थिक मदतीचा हात आखडता घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोनदा सौदी अरेबियात जाऊन मदतीसाठी साकडे घालून आले होते. एकूणच दोघांमधील संबंधांना दाता आणि याचक या नात्याची किनार आहे. भारताचे तसे अजिबात नाही. भारताबरोबर संबंध घट्ट करण्यात सौदी अरेबियालाही अनेक कारणांसाठी स्वारस्य आहे. मुळात सौदी अरेबियाचे राजपुत्र महम्मद बिन सलमान विशिष्ट चाकोरीच्या बाहेर पडू पाहत आहेत. तेथील सुधारणांचा वेग कमी आहे, हा आक्षेप रास्त असला, तरी दिशा पुढे पाहण्याची आहे, हे नक्की. भारत, पाकिस्तान, चीन, इंडोनेशियाचा सध्या सुरू असलेला दौरा हा ते घडवू पाहत असलेल्या बदलांच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचा. भारत आणि चीन हे त्या देशाकडून मिळणाऱ्या तेलाचे मुख्य खरेदीदार. भारत एकूण तेल आयातीपैकी १७ टक्के सौदी अरेबियाकडून खरेदी करतो. पण, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्य हे तेलविक्रीपुरते मर्यादित न राहता ते आणखी व्यापक व्हायला हवे, असे सौदीच्या युवराजांना वाटते. त्यादृष्टीने ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील सहकार्याला मोठा वाव आहे. भारतातील तीस लाख लोक सौदीत काम करताहेत. तेथील संधी पुढच्या काळातही वाढण्याची शक्‍यता आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताकडे असलेल्या तज्ज्ञ मनुष्यबळाचे साहाय्य घेण्याचाही सौदीचा विचार आहे. कोकणातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पात सौदी मोठी गुंतवणूक करणार असून, त्याचा उल्लेख संयुक्त निवेदनात टाळला असला, तरी प्रस्ताव बाद झालेला नाही. भारतात सुमारे १०० अब्ज डॉलर गुंतवणुकीचा त्यांनी व्यक्त केलेला मनोदयही महत्त्वाचा आहे. शिवाय, पश्‍चिम आशियातील राजकारणाचा विचार करता सौदी अरेबियाशी असलेले मैत्रीचे संबंध भारताला उपयोगी ठरणार आहेत. ‘शत्रूचा मित्र तो शत्रूच’ या समीकरणाचे प्रस्थ शीतयुद्धाच्या काळात वाढले होते. अमेरिकेचा त्याबाबतीत हट्टाग्रह असायचा. अद्यापही तो गेलेला नाही. इराण, व्हेनेझुएला या देशांच्या बाबतीत अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा जो प्रयत्न केला, तो त्याच भूमिकेतून. पण, वेगवेगळ्या देशांशी स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित करण्याच्या धोरणात शहाणपण आहे, हे भारताने ओळखले आहे. इराणशी भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. सौदी इराणशी शत्रुत्व करतो म्हणून भारतानेही ते करावे, ही अपेक्षादेखील चुकीची आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाइनमधून विस्तव जात नाही, हे वास्तव भारताच्या या दोन्ही देशांबरोबरच्या संबंधांतील अडसर ठरता कामा नये, हा दृष्टिकोन भारताने स्वीकारला आहे. त्यामुळेच इराण, सौदी, इस्राईल या देशांशी भारताने स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित केले आहेत. हा पवित्रा वास्तववादी आणि हिताचाही आहे. सौदीने मूलतत्त्ववादाला खतपाणी घालू नये, ही भारताची अपेक्षा असणार आणि त्याबाबत सावध राहायलाच हवे. पण, त्या मुद्यावर संपूर्ण द्विपक्षीय संबंध वेठीस धरण्याऐवजी हे संबंध दृढ करीतच या संदर्भातील देशहिताचे प्रयत्न चालू ठेवणे इष्ट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com