दुर्गभ्रमंतीची भूल

saurab-kulkarni
saurab-kulkarni

तरुणपणी चांगल्या गोष्टींचं ‘व्यसन’ जडायला हवं. असंच एक ‘व्यसन’ मलाही जडलं ते म्हणजे ट्रेकिंगचं. इतिहास-भूगोलाची आवड लहानपणापासूनच असल्यानं ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्यात पुणे जिल्हा म्हणजे किल्ल्यांचं माहेरघर, तर आजूबाजूचे सातारा-कोल्हापूर-नाशिक हे जिल्हे आणि कोकणात अनेक गड-किल्ले. शिवाय माझ्याच आवडीचे मित्र असल्यानं हा छंद जोपासायला उधाण आलं. ट्रेकिंगचा छंद म्हणजे फिरस्त्याचं जीवन. मग घरच्यांबरोबर इतरही म्हणतात ‘काय सारखं ट्रेकिंग ट्रेकिंग ?’ मित्र भेटले, की ‘मग आता कुठे मोहीम’ असा सवाल. त्यांनी म्हणायचं, ‘सारखी डोंगरावर चढाई करून कंटाळा नाही येत का रे ? कधीतरी चल की निवांत कुठल्यातरी रिसॉर्टला. एन्जॉय करू,’ माझं उत्तर ‘बघू, ठरवू.’ घरची ट्रिप ठरवायची झाली की त्यातही असं ठिकाण शोधायचं की जवळ एखादा किल्ला असेल. त्यामुळे घरचे प्लॅनिंग करताना म्हणणारच ‘‘बघ बाबा तुझं, जिथे किल्ला असेल तिथेच ने आम्हाला.’’ 

मित्र, शेजारी, नातेवाईक विचारतात, ‘‘ट्रेकिंगमुळं मिळतं काय ? पैसा तर नाही कमवू शकत ना तुम्ही ?.’’ पैसा काही सर्वस्व नाही, आनंदही तेवढाच महत्त्वाचा आणि त्यात कायम डोक्‍यात ‘आनंद’मधील राजेश खन्नाचा डायलॉग असतो ‘जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं.’ मग आपल्याला पटतं तेच करायचं. त्यात तरुण रक्त म्हटल्यावर कोणाला ऐकतोय आपण ? तरीही किल्लेभ्रमंतीमागं अनेक कारणं आहेत. शहरातील धकाधकीचं जीवन, प्रदूषण, कलकलाट. रोजच्या प्रश्नांतून आणि सर्वात वाईट असलेल्या मोबाईलच्या वेडापासून थोडावेळ का होईना सुटका होते. तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी गडकिल्ल्यांतून केली, त्यामुळे त्यांची भ्रमंती करणं ही अभिमानाची बाब. या किल्ल्यांवरील महाराजांच्या पायधुळीची माती कपाळाला लावण्यात भाग्य मानतो आम्ही. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचावा म्हणून ही छोटीशी धडपड.

या भटकंती आणि दुर्गभ्रमंतीमधून अनेक अनुभव मिळाले. चांगले अनुभव अधिक मिळाले, थोडे-फार वाईटही मिळाले. अलीकडे सर्व्हायव्हल ट्रेनिंग ॲडव्हेंचरसाठी लोक ‘ॲडव्हेंचर पार्क’ला जातात, पण हे सर्व अनुभव आम्हाला आडवाटेवरच्या ट्रेकिंगमध्ये मिळतात. मग ते जेवण बनवणं असो, तंबूत किंवा मंदिरात झोपणं असो. थंडीच्या दिवसांत शेकोटी पेटवताना कसं ‘स्कील’ हवं हेही शिकायला मिळतं. डिओचा खरा वापर चांगली आग पेटविण्यासाठी होऊ शकतो, हे ट्रेकिंगनं शिकवलं. या भ्रमंतीमध्ये नवनवीन लोक भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारता येतात. त्यांचे अनुभव, त्यांच्या वेगवेगळ्या बोलीभाषा शिकता येतात. रात्रीच्या वेळी गाडी चालवून कंटाळा आल्यावर ठरलेल्या ठिकाणी न जाता वाटेतच कुठेतरी मुक्काम करणं, हेही एक ॲडव्हेंचरच म्हणावं लागेल. 

खेड-रत्नागिरीजवळील महिपतगडावर घनदाट जंगलात मंदिरात झोपणं आणि भल्या पहाटे उठून मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून आंघोळ करणं, मंडणगड एसटी स्थानकात रात्रीचा मुक्काम करणं, फोंडा घाटातून गगनबावड्याकडं जाताना वाटेत लागणाऱ्या बावेलीच्या घनदाट जंगलातून रात्री केलेला प्रवास आणि वाटेत दोन कोल्ह्यांचे दर्शन, भैरवगडाच्या पायथ्याला भंडारामध्ये केलेले जेवण, ट्रेकिंगमध्ये भेटलेला असंख्य मित्र परिवार... ही अनुभवाची शिदोरी ट्रेकिंगमधून मिळाली. 

अलीकडे ट्रेकिंगला जाण्याची आवड वाढत आहे. पण काही समाजकंटक गडावर दारू पिणं, अश्‍लील वर्तन करणं, गडावरच्या भिंतींवर नावं लिहिणं यांसारखे गैरप्रकार करतात. त्यांना एवढंच सांगणं आहे की हे गड आपल्या महाराजांनी पराक्रमानं मिळवलेले आहेत, त्या पराक्रमाचा अभिमान बाळगून भ्रमंती करा. निसर्गात गेल्यावर त्याचा मनमुराद आस्वाद घेऊन चांगल्या आठवणी घेऊन परता. आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचावा म्हणून अनेक संस्था गडसंवर्धन करत आहेत. हे कार्य यापुढेही सर्वांकडून सतत होत राहो हीच अपेक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि त्यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे अनेक जण त्यांना मानतात, पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ही बाब माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे. 

ट्रेकिंगचं ‘व्यसन’ चांगलं काहीतरी देऊन जाते, मग तो सुंदर निसर्गाचा आस्वाद असो, अनेकविध प्राणी-पक्षी पाहण्याचा आनंद असो, वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद असो, वा नव्या लोकांशी भेटून संवाद साधण्याचा आनंद असो... हे सर्व ट्रेकिंगमधून मिळतं. त्याचबरोबर शारीरिक व्याधींपासूनही आपण मुक्त होतो. त्यामुळं केवळ तरुणांनीच नाही, तर ज्येष्ठांनीही जोपासावं असे हे ‘व्यसन’ आहे.

(लेखक पुणेस्थित दुर्गप्रेमी विद्यार्थी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com