‘पासष्टाव्या कले’चा सुंदर प्रवास

जाहिरात म्हणजे काय? विक्रेत्याला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमातून प्रसृत केलेला संदेश. जाहिरात कितीतरी प्रकारात करता येते.
Advertise
AdvertiseSakal
Updated on
Summary

जाहिरात म्हणजे काय? विक्रेत्याला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमातून प्रसृत केलेला संदेश. जाहिरात कितीतरी प्रकारात करता येते.

- सविता नाबर

कोणत्याही उत्पादनाला बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर त्याची प्रभावी, परिणामकारक जाहिरात महत्त्वाची असते. त्याच्या बळावर ब्रँडची निर्मिती करून ते यशस्वीही करता येतात. आजच्या (ता. १४) राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्ताने या उद्योगाविषयी.

जाहिरात म्हणजे काय? विक्रेत्याला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमातून प्रसृत केलेला संदेश. जाहिरात कितीतरी प्रकारात करता येते. कधी ती छापील माध्यमात, तर कधी इलेक्ट्रॉनिक माध्यमात असते. आता सोशल मीडिया हे जबरदस्त माध्यम जाहिरातीसाठी सापडले आहे. ते इतके प्रभावी आहे की सोशल मीडियाचा जनमानसावरचा पगडा दाखवणाऱ्या जाहिरातीतून, आपल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत असलेले गुगल महाराज सर्वसामान्यांच्या डोळ्यात सहज आसू आणतात. कुठलीही माहिती फक्त बोटाच्या टोकावर. अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्वीटर, यूट्यूब हे सोशल मीडियाचे पर्याय आहेतच.

माणूस म्हणजे भावभावनांचे आगर. या भावनांना हात घालण्याचं काम जाहिरात करते. योग्य वेळी योग्य भावना प्रज्वलित करणं तेही विविध माध्यमातून. याला नक्कीच सर्जनशीलता लागते. त्यामुळेच तिला ‘पासष्टावी कला’ म्हटले जाते. या एकाच कलेत बाकीच्या सगळ्या कला एकवटल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे वेळेचं बंधन. दोन-अडीच तास, एक तास चालणाऱ्या फिल्ममध्ये संदेश द्यायला, अभिनय करायला, मजकुराला खूप वाव असतो. पण काही सेकंद किंवा मिनिट-दोन मिनिटांच्या जाहिरात फिल्ममध्ये सगळ्याच गोष्टीतलं सृजन एकवटायला लागतं, अगदी संदेशासहित!

बी. दत्ताराम या नावाने दत्ताराम बावडेकर यांनी १४ ऑक्टोबर १९०५ रोजी मुंबईत स्वत:ची जाहिरात संस्था सुरू केली. ही पहिली जाहिरात संस्था. तो दिवस ‘राष्ट्रीय जाहिरात दिन’ म्हणून ओळखला जातो. जाहिरात संस्थेचे स्थान आपल्या अर्थकारणात, व्यवसाय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं आहे. जाहिरात संस्था ही कोणत्याही कंपनी, उद्योग व्यवसाय यांच्यासाठी दिशादर्शक, मार्गदर्शक, भविष्यातील व्यवसायाच्या अनेक योजनांचे पर्याय सांगणारी संस्था असते. ज्यामुळे कंपनीला पुढचे पाऊल काय आणि कसे टाकायचे याचा अंदाज येतो.

प्रतिमानिर्मितीचे कार्य

जाहिरात करताना प्रामुख्याने तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते. एक म्हणजे आपला ग्राहकवर्ग कोणता आहे, आपल्याला जाहिरात कशासाठी करायची आहे, आणि ग्राहकांपर्यंत आपण कोणत्या मार्गाने पोहोचू शकतो. जाहिरात संस्थेत कोणत्याही जाहिरातीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा ती तयार करण्यासाठी तीन घटकांची गरज असते. अकौंट मॅनेजर, कॉपी रायटर आणि आर्ट डायरेक्टर.पण जेव्हा एखादी जाहिरात संस्था आपल्या क्लायंटच्या जाहिरातीसाठी काम करते तेव्हा कोणत्या माध्यमासाठी जाहिरात अधिक उपयुक्त ठरेल आणि क्लायंटच्या बजेटमध्ये कशी बसेल हे ती पाहते. आपल्या क्लायंटची प्रतिमा (ब्रॅण्ड) जनमानसात कशी निर्माण होईल हे जाहिरात संस्था पाहते. उद्योग व्यवसायाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार जाहिरात निर्मितीपासून ते उत्पादन वितरणापर्यंत कुठलेही काम, सेवा उपलब्ध करून देऊ शकेल, अशी जाहिरात संस्था शोधणे महत्त्वाचे असते. क्लायंटच्या पैशाचा विनियोग करताना त्याचे हित सांभाळणे आणि क्लायंटला योग्य, अनुरूप जाहिराती तयार करून देऊन त्या योग्य वेळी व योग्य माध्यमातून प्रसिद्ध करणे महत्त्वाचे.

जाहिरातीचे माध्यम ठरवताना त्या-त्या माध्यमाचे फायदे कोणते, त्याच्या मर्यादा काय हेही जाहिरात संस्थेला पाहावे लागते. बाजारपेठेतल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जाहिरात संस्थेचे अस्तित्व अनिवार्य ठरते. व्यवसायातील उत्पादन आणि सेवा यांच्या चढत्या भाजणीने प्रगतीसाठी जाहिरात संस्था महत्त्वाचा दुवा आहे. ती कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या धोरणात्मक नियोजनासाठी महत्त्वाचे काम करते. उत्पादनाच्या जाहिरातीची नवीन मोहीम राबविण्याचे काम ही संस्था करते. जाहिरात कंपनी आपल्या क्लायंटच्या उत्पादनाची अशी जाहिरात करते की त्यायोगे त्या उद्योगाला उत्पादन विक्रीतून बराच फायदा होतो. कंपनीच्या ब्रॅन्डचे योग्य रीतीने मार्केटिंग करणे ही तर खासियतच असते.

विपणन धोरणाचा आधार

स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी कंपनीच्या ध्येयधोरणात जाहिरात एजन्सी महत्त्वाची भूमिका बजावते. आपला उद्योगधंदा वाढवण्याच्या दृष्टीने, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी विपणन (मार्केटिंग) आणि जाहिरात ही दोन महत्त्वाची अंगे आहेत. त्यामुळे ‘जाहिरात’ हे तत्त्व लक्षात ठेवूनच जाहिरात संस्था ही त्या उद्योग-व्यवसायाला यश मिळवून देण्याच्या दृष्टीने ब्रॅण्ड विकसित करण्याच्या दृष्टीने पावले टाकत असते. जाहिरात मोहीम राबविण्याच्या दृष्टीने जाहिरात संस्थेचे विचारमंथन, काम चालू असते. कंपनीची वेबसाईट बनवणे, व्यवसायाचा विकास आणि व्यवस्थापन करणे याबाबतीत जाहिरात संस्था योग्य मार्गदर्शन करते. जेणेकरून वेबसाइट ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल. सोशल मीडियामध्ये जेव्हा जाहिरात संस्था काम करते तेव्हा तुमच्या व्यवसायाचे कंटेन्ट क्रिएशनचे (माहिती) मोलाचे काम एजन्सी करत असते. ब्लॉग पोस्ट, सोशल मीडिया कंटेन्ट, ई बुक्स, केस स्टडीज याद्वारे व्यवसायाचा ऑनलाइन ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी एजन्सीचा हातभार लागतो. आता व्हॉट्स अॅपवर किंवा इन्स्टाग्रामवरच बघा, एखादा अपघात, कुणीतरी एखाद्या क्षेत्रात केलेली विशेष कामगिरी, नामवंत कलाकाराचे, नेत्याचे निधन ही बातमी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातल्या बातमीआधी सोशल मिडियाद्वारे लोकांना समजते.

कधी-कधी उद्योजकाला किंवा कंपनीला इन हाउस सोशल मीडिया हाताळणे सोपे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात वेळखाऊ असते. शिवाय हटके प्रयत्नही करावे लागतात. हेच काम जाहिरात संस्थेवर सोपवल्यास कंपनी सोशल मीडिया ही बाजू सांभाळण्यासाठी एजन्सीवर अवलंबून राहू शकते. फारतर योग्य त्या सूचना कंपनी अधिकारी किंवा मालक करू शकतात. यामुळे उत्पादनावर लक्ष केंद्रित करता येते. तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी आहे, ती योग्य आहे किंवा नाही यावर उपलब्ध साधनांच्या साहाय्याने सॉफ्टवेअर विश्लेषकांच्या मदतीने जाहिरात एजन्सी रिपोर्ट देऊ शकते. त्यामुळे मार्केटिंगची स्ट्रॅटेजी ठरवणे, त्यात आवश्‍यक फेरफार करणे शक्य होते. व्यवसायासंदर्भातील अनेक प्रकारची माहिती (डेटा) एजन्सीकडून मिळू शकतो. त्यामुळे चांगले बिझनेस मॉडेल आणि बिझनेस प्लॅन बनवता येतो. त्यामुळे कोणत्या प्रकारची जाहिरात करायची त्यानुसार जाहिरात संस्थेची कंपनी किंवा व्यावसायिकाने निवड करायची असते. कारण जाहिरात संस्थेच्या सर्जनशीलतेवर व्यवसायाची भावी वाटचाल अवलंबून असते. त्यामुळेच दिशादर्शक म्हणून कंपनी, उद्योग, व्यवसाय यांच्यासाठी जाहिरात संस्थेला मोलाचे स्थान आहे.

(लेखिका जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ असून, जाहिरात संस्थेच्या संचालिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com