#यूथटॉक नाटक रुजलं अन्‌ मुखवटे गळाले

sayli-pavaskar
sayli-pavaskar

जगण्यासाठी सगळेच आयुष्य जगतात; पण किती जण आहेत, ज्यांना त्यांचं आयुष्य एका ध्येयानं जगायचं असतं? आपल्या जगण्याचा अर्थ शोधायचा असतो? या जगण्यासंबंधीचे प्रश्‍न ज्यांना अस्वस्थ करतात, असे किती जण असतात? 

माझ्याविषयी सांगायचं तर मी स्पर्धेच्या युगातील आणि स्पर्धेच्या जगातून आलेली... उमेदीच्या काळात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून नाट्य क्षेत्रात सुरवात केली. कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना जोश, जिद्द प्रचंड होती; पण सतत काहीतरी अपुरं आहे, ही भावनाही मनात यायची. कारण कला म्हणजे काय याची जाणीव नव्हती.

स्पर्धांतून अनेक बक्षिसं मिळवली आणि मग मिळाली व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी. सगळंच ठरवल्यासारखं घडत होतं; पण क्षणिक आनंद आणि आत्मिक आनंद यातलं अंतर कळत नव्हतं. सतत स्वतःसोबत संवाद व्हायचा, नाटक अभिव्यक्तीचं माध्यम; तरीही अव्यक्तता का? अशातच माझी ओळख अश्विनी नांदेडकर हिच्याशी झाली. आम्ही दोघी एकत्र आमचं पहिलंवहिलं व्यावसायिक नाटक करत होतो. त्यादरम्यान एका नाटकाची तालीम अश्विनी करत होती. तिला ती नाट्यप्रक्रियाच वेगळी वाटली. तो अनुभव तिनं मला सांगितला आणि आम्ही दोघी मिळून ते वेगळेपण शोधू लागलो. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ नाट्यप्रक्रिया... इथं मला एक मुलगी नाही, तर माणूस म्हणून पहिल्यांदा पाहिलं गेलं. नाटक म्हणजे विचार हे बीज रुजवलं गेलं. या नाट्यप्रक्रियेनं माझ्या चेहऱ्यावरील खोटे मुखवटे गळून पाडले. प्रत्येक गोष्टीकडं बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला. माझा खरा चेहरा शोधण्यास मार्गदर्शन केले गेले...

या नाट्यप्रक्रियेत आल्यावर, ‘मी जिवंत का? माझ्या जगण्याचा अर्थ काय? आपल्या अस्तित्वाची कोणी दखलही घेत नसेल तर उपयोग काय? पण मुळात आपल्या स्वतःला अस्तित्वाची जाणीव असते काय? विचारांनी जिवंत राहण्यासाठी मी काय करते? ’ असं विचारचक्र सुरू झालं आणि माझ्यातल्या नव्या बदलाला सुरवात झाली. बदल नव्या विचारांचा, स्थिरतेचा, आत्मशोधाचा... मला माझीच ओळख नव्हती. माझी जागतिक ओळख निर्माण करण्याचा प्रवास मी जगले, अनुभवला. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ नाट्यप्रक्रिया हा माझ्यासाठी एक प्रवास आहे क्षितिजा पार जाऊन आपलं जीवन घडवण्याचा.नाटक हे परिवर्तनाचं माध्यम आहे ही केवळ सूचना आहे आपल्याकडे. आजही मराठी रंगभूमीवर नाटकांकडं केवळ मनोरंजन म्हणून पाहिलं जातं. खरं तर ते समाजपरिवर्तनाचं सशक्त माध्यम आहे, म्हणून त्याचा विचार कोणीच रुजवत नाही व त्याचे प्रयोग करण्यातही अपुरे पडतात. आम्ही ते करतो. कोणतीही कला किंवा कलाकार हे वस्तू नाहीत, तर अभिव्यक्ती व्यक्त करणारी जिवंत माणसं आहेत. नाटकाच्या माध्यमातून आदिम काळापासून सुरू असलेल्या शोषणपद्धतीवर प्रहार करत समाजपरिवर्तन करणं हे ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. मी कलाकार आहे, हा अभिमान कलाकाराला कुठून येतो? मी किती फिल्म्स केल्या? किती नाटकं केली? इथून की मी कलेचा उपासक आहे, साधक आहे, इथून? माझी कला परिवर्तनासाठी प्रतिबद्ध आहे, हा कलानुभव मी सातत्यानं या प्रक्रियेत अनुभवत आहे, जगत आहे. मानवीय जीवन, व्यवहार-विचार काळानुरूप बदलत आहे, बदलत राहणार आणि या बदल प्रक्रियेत सतत निचरा होत राहणार. कलाच आहे जी या विशुद्ध जीवन प्रक्रियेला शुद्ध करते.प्रत्येकाच्या आत कलाकार असतो. त्या कलाकाराला विचारानं जागवते हे नाट्यतत्त्व. बदल विचारांमध्ये घडतो म्हणून आम्ही विचारांवर काम करतो. नाटकामुळे विचार समाजात प्रकटतो, खुलतो आणि रुजतो. त्यानं मेंदूची विचारचक्रं सुरू होऊन परिवर्तन होण्यास सुरवात होते आणि भरकटलेला समाज माणुसकीच्या दिशेने वळवण्यास नाटक प्रेरित करते!

 ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ या नाट्यतत्त्वज्ञानाला आता २७ वर्षे पूर्ण होत आहेत. या तत्त्वज्ञानाच्या आधारावर संवाद आणि माणुसकीची प्रक्रिया अवलंबून नाटकाच्या माध्यमातून परिवर्तनासाठी कला उद्योजकता हे धोरण आम्ही राबवत आहोत. कोणतेही सरकारी अंशदान वा स्पॉन्सरशिप न स्वीकारता केवळ जनसहयोगाच्या माध्यमातून संवाद ही प्रक्रिया राबवून आम्ही नाट्यमहोत्सव घडवून आणले आहेत. या कला उद्योजकता आणि संवाद प्रक्रियेतून व्यक्तिगत ते समाज व वैश्विक पातळीवर रचनात्मक बदल आम्ही या नाट्यतत्त्वाच्या माध्यमातून सातत्यानं करत आहोत. कलेच्या प्रांतात सांस्कृतिक क्रांतीसाठी, सांस्कृतिक चेतना  निर्माण करत आहोत.

(लेखिका ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ या नाट्यचळवळीतील रंगकर्मी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com