ढिंग टांग : ऑर्वेलियन स्टोरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

George Orwell

ढिंग टांग : ऑर्वेलियन स्टोरी!

दाभणकाठी मिश्या कश्याबश्या

राखून असलेला सव्वाशेएक उमरीच्या

गोरटेल्या म्हाताऱ्याने किंचित खाकरुन

डोलावली मान, गुपित सांगताना

म्हणाला, इकडे कर कान…

‘‘बिग ब्रदर इज वॉचिंग

…तो सगळं बघतोय!’’

गोरटेला म्हातारा वाटत होता इंग्रज

वाटलं, असेल कुणी जुनापुराणा गौरनेर

हात पुढे करुन टाचा जुळवत टेचात

म्हणाला, ‘‘हाय, मी एरिक ब्लेर!’’

‘‘अरेच्चा, ते जॉर्ज ऑर्वेल तुम्हीच का?’’

चमकून उडालो तीन ताड, म्हणालो,

‘‘अरेवारेवा, अलभ्य लाभ झाला,

काय भारी लिहिता राव!

ऑर्वेल तुमचं टोपणनाव?

इतकं कालातीत, इतकं विचूक

…कसं सुचतं तुम्हाला?

कुठं जन्मला? कुठं शिकला?

कसं जमलं तुम्हाला?

तुमच्या कादंबऱ्यातली वाक्यं

अजूनही लागू पडतात पहा,

न्यायाधीशापासून पत्रकारितेपर्यंत,

सर्वत्र होते तुमचीच चाह!

‘दोन मिनिटांचा द्वेष, मुकी बिचारी मेंढरं,

ते विचारपोलिस, विचारगुन्हे, आणि

मृत्युदंडास पात्र विचारद्रोह वगैरे. अहा!

तुमच्या आयडिया वापरुन आम्ही

आजही भरतो अग्रलेखाचे रकाने,

हजारो पानी न्यायनिवाड्याची निकालपत्रे,

आणि वाद घालतो, वितंडतो, वापरतो

तुम्हालाच खंडन-मंडनाच्या निमित्ताने.

रिअलिटी शोमध्येही ऑर्वेलसाहेब

तुम्हीच आहात बरं का बिग बॉस!

समाजजीवनाचं महत्तम गुह्य

तुम्हालाच कळलं हो, ऑर्वेलसाहेब! ’’

त्यांनी कसंबसं ‘थँक्यू’ म्हणण्याच्या

आतच रेटून म्हणालो, पुढे-

‘‘ ऑर्वेलसाहेब, तुमची वाक्ये फेकली की

-युक्तिवाद कसा गोळीबंद होतो

-मांडणीला घाट येतो.

-निर्बुध्द विचारवंत होतात,

-विचारवंत ऋषितुल्य होतात.

- दगडांचे देव, आणि देवांचे दगड होतात.

- सामाजिक चिंतनाला वजन येतं, आणि

-मुख्य म्हणजे लोकशाही चिरंजीव होते.

ऑर्वेलसाहेब, तुमच्या व्यक़्तिरेखांच्या

संवादाचे मुहावरे झाले, आणि वाक्यांच्या

झाल्या म्हणी, साहित्यकृतींचे झाले अलंकार.

हे सगळं लोकशाहीमुळेच झालं, आणि

त्यासाठी खुद्द लोकशाहीच

तुमची कृतज्ञ आहे, ऑर्वेलसाहेब!

तुस्सी द्रष्टे हो, द्रष्टे!!’’

एवढे ऐकून मटकन बसलेल्या

त्या कुण्या एरिक ब्लेर नामक

विंग्रेजी साहेबाने क्षीण आवाजात

म्हटले : ‘‘मी बिहारमधल्या मोतिहारीमध्ये

जन्मलो रे

…मी इथलाच.

पण मला एक सांगा-

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे

मी द्रष्टा होतो की,

मी लिहिल्याबरहुकूम वागण्याचा

संकल्प तुम्ही केला आहे?’’