वाढता स्क्रीनटाइम घातक

शाळा सुटल्यानंतर तिच्या प्रवेशद्वारावर मुलांच्या प्रतीक्षेत असलेली पालक मंडळी एक सहज चर्चा करताना आढळतात.
 eyes and screen
eyes and screenSakal

शाळा सुटल्यानंतर तिच्या प्रवेशद्वारावर मुलांच्या प्रतीक्षेत असलेली पालक मंडळी एक सहज चर्चा करताना आढळतात. ती असते मुलांच्या आरोग्याविषयीची तक्रारीची आणि काळजीची. एका पालकाने तर औत्सुक्य म्हणून प्रवेशद्वारामधून येणाऱ्या प्रत्येक मुलांच्या डोळ्यांवरील चष्म्यांची पाहणी केली. जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लावलेले आढळले आणि तो आश्चर्यचकित झाला. डोळ्यांच्या चष्म्यांच्या पाहणीपासून सुरू झालेली पालकांची चर्चा मग साहजिकच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि अजून वेगवेगळ्या सवयींपाशी येऊन पोहोचली. कमी-अधिक फरकाने सर्व शहरी किंवा ग्रामीणही भागात आढणारे हे सार्वत्रिक चित्र. मुलांचा मोबाईल वापर हा पालकांसमोर खरोखर काळजीचा विषय बनला आहे. मुलांच्या डोळ्यांवरील चष्मा हा सहजपणे लक्षात येणारा मुद्दा. पण एकूणच इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील वाढता स्क्रीनटाइम मुलांच्या आरोग्यावर उठला आहे.

ब्रिटनमधील ॲग्लिया रस्किन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित एक लेख ‘जर्नल ऑफ स्कूल हेल्थ’ या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटल्यानुसार मोबाईल किंवा टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे सातत्याने बघत राहिल्याने केवळ डोळ्यांवरच नव्हे तर त्यांच्या शरीरावरही विपरित परिणाम होत आहे. या उपकरणांकडे सतत पाहिल्याने मुलांच्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊन ते कोरडे पडतात. त्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होते. त्यांना धूसर दिसायला लागते. त्याशिवाय मान व खांद्यामध्ये वेदना होऊ लागतात. ही उपकरणे पाहताना एकाच जागी खिळून बसल्याने त्यांच्या शरीराची फारशी हालचाल होत नाही. त्यांच्यात स्थूलपणा वाढू लागतो. मुले ऑॅनलाईन असताना ते केवळ अभ्यासाविषयी पाहत नाहीत, ते समाजमाध्यमांवरही सक्रिय असतात.

त्यावरून कोणत्याही विषयांचे नोटिफिकेशन त्यांच्यासमोर येते. जे त्यांच्याशी संबधित नसतात, त्यांचे अभ्यासावरून मन विचलित होते. या सर्वांचा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर व शारीरिक आरोग्यावरही होत आहे. यावर उपाय म्हणून लहान मुलांचा स्क्रीनटाइम मर्यादित ठेवायला हवा. रात्री झोपण्याच्या एक तास आधी त्यांच्या हातातून मोबाईल काढून घ्यायला हवा. कारण त्यांच्या वापरानंतर मुलांना नीट झोप लागू शकत नाही. माणसाच्या आयुष्यात झोपेला किती महत्तव असते, ते वेगळे सांगायला नको. मुलांना ऑफलाइन खेळ खेळण्याची सवय बालपणापासूनच लावायला हवी. मोबाईल वापराचे दुष्परिणाम मुलांना समजून सांगायला हवेत. ते विविध प्रकारे माहिती देऊन पटवून सांगावेत. मुलांच्या समोर पालकांनीही मोबाईलचा वापर कमी करायला हवा.

मोबाईल हा विकासाचा महत्‍वाचा टप्पा आहे. त्याचे महत्व नाकारून चालणार नाही. पण दुष्परिणामही काळजी वाटावे, असे आहेत. ते वाढण्याआधी जागे व्हायला हवे. शास्त्रज्ञ या विषयांवर बोलू लागले आहेत. विकसित राष्ट्रांत या विषयांवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू झाले आहे. अमेरिकेत टीव्हीवर लहान मूल मोठे होईपर्यंत हिंसाचाराच्या अनेक घटना डोळ्यांखालून घालत असल्याचा एक अभ्यास समोर आला आहे. असे असेल तर सतत डोळ्यांसमोर येणार्या पडद्यावर जे काही चालले आहे. ते मुलांच्या जडणघडणीत येणार हे नक्की. त्यामुळे या माध्यमांवरील आशयाचा विचार व त्यांचा वापर मर्यादित करायला हवा. पालकांनी अधिक सजग व्हायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com