अस्सल ग्रामीण जीवनाचा भाष्यकार

डॉ. मनोहर जाधव
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण साहित्य चळवळीची बांधणी आणि मांडणी केली. खेड्यातील लिहिणाऱ्या तरुण लेखकांना या चळवळीने आत्मभान दिले, आत्मविश्वास दिला, हे त्यांचे मोठेच योगदान आहे.

सत्तरच्या दशकात मराठी साहित्यविश्वात अनेक उल्लेखनीय घडामोडी घडत होत्या. नवीन साहित्यप्रवाह मुसंडी मारून प्रस्थापित साहित्यव्यवहाराला हादरा देत होते. दलित साहित्यप्रवाहाने या काळात एक चळवळ उभारून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. दलित साहित्यातील विद्रोह आणि नकार आक्रमकपणे व्यक्‍त होत होता. दलित साहित्यप्रवाहापाठोपाठ ग्रामीण साहित्यप्रवाहाने उचल खाल्ली. महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीतील अनेक लहान-मोठे लेखक या प्रवाहात सहभागी झाले. मात्र दलित साहित्यप्रवाहाप्रमाणे या लेखकांची भाषा आक्रमक नव्हती, तर समन्वयाची होती. बघता बघता या प्रवाहाने चळवळीचे स्वरूप धारण केले. अनेक ठिकाणी कार्यशाळा, संमेलने घेतली जाऊ लागली. अशी चळवळ निर्माण व्हावी आणि खेड्यापाड्यांतील लेखकांनी आपल्या जीवनानुभवाचा आविष्कार आपल्या पद्धतीने, आपल्या भाषेत करायला हवा असं वाटणाऱ्या लेखकांपैकी एक प्रमुख लेखक होते आनंद यादव. अर्थातच यादवांनी पुढाकार घेऊन या चळवळीची बांधणी आणि मांडणी केली. चळवळीचे नेतृत्वही त्यांच्याकडे चालत आले. त्या काळात रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशीव यांच्यासारखे अनेक नवे-जुने लेखक या चळवळीत सहभागी झाले. खेड्यातील लिहिणाऱ्या तरुण लेखकांना या चळवळीने आत्मभान दिले. आत्मविश्वास दिला. बोलीभाषेत आपल्या अस्सल अनुभूतीचा आविष्कार आपण करू शकतो आणि त्यातूनच चांगली निर्मिती होऊ शकते, याची या चळवळीतील लेखकांना ओळख पटली. खुद्द आनंद यादव यांनी ‘गोतावळा’ ही कादंबरी लिहून एक उदाहरण घालून दिले. पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरातील बोलीभाषेचा चपखल वापर करून यादवांनी या कादंबरीतील नारबाचे आणि त्याच्या भावविश्वाचे अस्सल दर्शन घडवले. येऊ घातलेल्या यंत्रयुगामुळे कृषीसंस्कृतीत, तेथील मानवी जीवनात, शेतीशी संबंधित प्राणीसृष्टीची कशी परवड होऊ घातली आहे याचे हृदयस्पर्शी चित्रण यादवांनी या कादंबरीत रेखाटले. यादवांची ही कादंबरी बहुचर्चित ठरली नसती तरच नवल. 

कथा, कविता, खंडकाव्य, कादंबरी, ललितगद्य, नाटक, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांतर्गत यादवांनी उल्लेखनीय लेखन केले. त्या काळात ‘सत्यकथे’सारख्या बहुचर्चित मासिकात यादवांनी सातत्याने लेखन केले आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ‘गोतावळा’ ही लक्षवेधी कादंबरी असली तरी ‘झोंबी’ या कादंबरीने खऱ्या अर्थाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. या कादंबरीला साहित्य अकादमीसारख्या संस्थेने सन्मानित केले आणि म्हणून ही कादंबरी अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आणि साहजिकच यादवांना व्यापक प्रमाणात वाचकाश्रय मिळाला. ‘झोंबी’मधून जो आंद्या (आनंद) चित्रित झाला तो महाराष्ट्राच्या कृषीसंस्कृतीतील, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा प्रतिनिधी म्हणूनच समोर आला. त्यामुळे अनेक तरुणांनी या कादंबरीची पारायणं केली. ‘झोंबी’तील नायकाशी ही तरुण पिढी समरस झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मान लाभावा, असे अनेक लेखकांप्रमाणे यादवांनाही वाटत होते. त्यात अस्वाभाविक असे काही नव्हते; पण प्रवरानगरच्या साहित्य संमेलनाने त्यांना हुलकावणी दिली आणि परभणी येथील संमेलनाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. २००९ च्या महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून ते निवडून आले; पण अध्यक्षपदाच्या सन्मानापासून वंचित राहिले. त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवर वारकरी संप्रदायाने आक्षेप घेतले आणि साहित्यविश्व ढवळून निघाले. या संदर्भात प्रारंभी काही भूमिका घेऊ पाहणारे यादव पुढे गोंधळून गेले. इतके की अध्यक्षपदाच्या सन्मानासाठी, आपली कादंबरी क्षमायाचना करीत त्यांनी मागे घेतली; पण वातावरण तापत गेल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अध्यक्षाविनाच महाबळेश्वरचे संमेलन पार पडले. मराठी साहित्यविश्वातील ही अभूतपूर्व, पण अनेक प्रश्न उपस्थित करणारी घटना होती. जी ग्रामीण साहित्यचळवळ त्यांनी बांधली होती, त्यातील एकाही जवळच्या सहकाऱ्याने या संदर्भात जाहीर भूमिका घेतली नाही. त्याला अनेक कारणे होती. त्या कारणांची मीमांसा करण्याची ही जागा आणि वेळ नव्हे. मराठीतील काही लेखकांना आपल्या निर्मितीसंदर्भात सामाजिक रोषाला सामोरे जावे लागले आहे. बा. सी. मर्ढेकर, विजय तेंडुलकर, ह. मो. मराठे असे लेखक या संदर्भात चटकन आठवतात. या लेखकांनी कच न खाता, धीराने ते या प्रसंगांना, कोर्टकचेऱ्यांना सामोरे गेले. पुढे लेखक म्हणून यांची भूमिका समाजमान्य झाली; पण यादवांना या संघर्षात उतरता आले नाही. कारणे काहीही असोत; पण लेखकाला आणि मुख्य म्हणजे चळवळीतील लेखकाला भूमिका घेता आलीच पाहिजे; पण यादवांच्याबाबत ते होऊ शकले नाही, याची बोचणी यादवांप्रमाणेच अनेक रसिकांना लागून राहिली. यामुळे पुढे यादव खचले असावेत. या घटनेनंतर त्यांनी फारसे लेखनही केले नाही. तथापि, त्यांनी केलेल्या लेखनाकडे मराठीच्या वाङ्‌मयेतिहासाला दुर्लक्ष करता येणार नाही. एका सर्जनशील लेखकाच्या वाट्याला असे एकटेपण यावे ही गोष्ट आपल्या साहित्य आणि सामाजिक व्यवहारावर झगझगीत प्रकाशझोत टाकते. येणाऱ्या पिढीने याबाबत विचार आणि चिंतन करणे गरजेचे आहे.

Web Title: Senior writer anand yadav